आफताब - एक काल्पनिक सत्य

मला रात्रीपर्यंत कोकणात पोहोचायचं होतं.. गाड्यांची चुकामूक झाल्यास संपुर्ण रात्र लोणावळ्यात काढावी लागणार होती...सकाळीच अलिबाग येथे मिटींग ठरवली असल्याने ती चुकवणे योग्य नव्हते...

आफताब - एक काल्पनिक सत्य

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

शिवाजीनगर स्टेशनवरुन लोकल जेव्हा लोणावळ्याच्या दिशेला निघाली तेव्हा पावसामूळे अंधारुन आलं होतं..

मला रात्रीपर्यंत कोकणात पोहोचायचं होतं.. गाड्यांची चुकामूक झाल्यास संपुर्ण रात्र लोणावळ्यात काढावी लागणार होती...सकाळीच अलिबाग येथे मिटींग ठरवली असल्याने ती चुकवणे योग्य नव्हते...

मुळा पुल लागल्यावर लोकलच्या खिडकीतून बाहेर नजर टाकली, एरवी नालासदृश वाटणारी मुळा नदी तिच खरं रुप दाखवत दिमाखात वहात होती.लोकलने देहूरोड पास केल्यावर वेग घेतला, गर्दीही आता जाणवण्याइतपत कमी झाली होती...

आषाढातला इंदरमावळ हिरवागार दिसत होता..वर आकाशातून निळ्या रंगाची एक गर्द छटा पुर्‍या आसमंतात पसरली होती. हिरवीकच्च शेतं, नद्या, नाले, ओढे तुडूंब भरुन वाहात होते, जणू माझ्यासारखीच कुठे पोहोचण्याची त्यांना घाई असावी. कामशेत जवळ इंद्रायणी नदीने साथ पकडली. नदी काठोकाठ भरली होती..मात्र संथ वाहात होती...इंदर मावळावर राज्य करणारी इंद्रायणी..तिला कुठेही जायची घाई नव्हती..हा तिचाच इलाका होता...

हा नजारा पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे दरवाज्यात उभे राहण्याची इच्छा झाली पण गेल्या दोन दिवसांचा सर्दीतापाचा असर शरिरावर अजुन जाणवत होता..इच्छा आवरती घेतली...

कामशेट स्टेशनाच्या अलिकडेच एका प्रचंड केशर वृक्षाखाली उभी असलेली व नेहमीच माझ्या आकर्षणाचा विषय ठरलेली एक अज्ञात समाधी मात्र दरवाज्यातून पाहण्याचा मोह आवरता आला नाही... नदीकाठच्या जंगलावर आल्हाददायक चांदण पडलेलं, जिकडे तिकडे गुढरम्य वातावरण होते...आणि त्या सुंदर केशर वृक्षाखाली ती अज्ञात समाधी...इंद्रायणीच पाणि तिच्या पायाला स्पर्श करित होतं..

मावळातील नद्या एरवी खळखळाटी मात्र पावसाळ्यात त्या शांतपणे वाहू लागतात.. त्यांच वाहण एक गुढ संगितच असतं..अशात लोकलचा आवाज त्या सुरात मंद नाद मिळवत होता...गाडीने बघता बघता मळवळी गाठले, डाव्या हाताला इंदरमावळाला पवनमावळापासून वेगळं करणारी विसापुर व लोहगड या बेलाग दुर्गांची जोडी पाहण्याचा प्रयत्न केला, पण दोघाही भावंडानी स्वतःला धुक्याच्या शालीत लपेटून घेतलं होतं...

मी परत सिटवर बसलो. स्टेशनावर गाडीने पासिंग साठी दहा मिनीटांचा ब्रेक घेतला. काही लोक उतरले..आता कोणी चढणारं नव्हतं..

अशातच चिमुकल्या पावलांनी एका बालकाने गाडीत प्रवेश केला..पाच्-सहा वर्षाचा असावा तो!

अंगात मळकट शर्ट आणि हाफचड्डी, अनवाणी, डोक्यावरचे केस बरेच दिवस न कापल्याने कपाळापर्यंत आलेले आणि हातात त्याचे शरिर माऊ शकेल अशी एक रिंग...

'तो एक भिकारी होता!'

आल्या आल्या तो माझ्या समोरच असलेल्या पॅसेजमध्ये बसला.. त्याच्या जवळ असलेल्या रिंगेमधून त्याचे लवचिक अंग सफाईदारपणे पार करण्याचे दोन्-तीन खेळ त्याने केले..मला त्याचे कौतुक वाटले.. मी विचार करित होतो, या गोड मुलावर ही वेळ यावी? इतक्यात त्याचा चिमुकला हात पुढे झाला..मी त्याच्या हातात दोन रुपयांचे नाणे टेकवले...

तो हसला...मी त्याला नावं विचारले..

तो म्हणाला 'आफताब'

आणि तो पुढे निघून गेला.

लोकलने मळवळी स्टेशन सोडून लोणावळ्याच्या दिशेने प्रवास सुरु केला होता.

मी परत दरवाज्यात आलो. लोणावळा परिसरावर धुक्याचे आच्छादन पसरले होते. मी दरवाज्यातून माझे शरीर बाहेर काढले..दवाबिंदूंनी माझ्या चेहर्‍यावर मंद शिडकावा केला..

डब्यात लोक कमी उरले असल्याने त्या छोकर्‍याचे काम बहुधा लवकर झाले असावे..तो आता मी ज्या ठिकाणि अगोदर बसलो होतो त्याच जागी येऊन बसला...

बसल्या बसल्या त्याचा खिडकीशी चाळा चालू होता...इतक्या मागच्या एकाने त्याच्यावर एक जोरदार शिवी हासडली..

तो एकाएकी शांत झाला..माझ्यामते शिवी देण्यासारखे त्याने काहीच केले नव्हते..

थोड्यावेळाने तो उठून दरवाज्यात आला..

दरवाज्यात अगदी माझ्या शैलीत माझ्याकडे पहात उभा राहीला...

मी हसलो..विचारलं..

'अकेला है? साथी नही कोई?'

'नही है'

'कहांसे आता है?'

'हडपसर से'

समोरच्या डब्यातल्या दरवाज्यातून एक व्यक्ती वाजवीपेक्षा बाहेर डोकावत होती..पथदिव्याची धडक लागून कदाचीत तिचा स्वर्गवास होण्याची शक्यता होती...

मी ओरडलो ' ऐ क्या कर रहा है?'

आफताब हसला आणि म्हणाला ' उसे मरना है तो मरने दो ना , अपना क्या जाता है? अपने को तो जिना है ना?'

मी स्मितहास्य करित म्हणालो 'हं जिना है, बडा आदमी बनना है..बहोत पैसा कमाना है.है ना?'

तो लाजला...

धुक्यामुळे समोरचं काहीच दिसत नव्हतं

आफताबच्या चेहर्‍यावर मात्र उत्सुकता दिसत होती.

'ये सब क्या है?' त्याने विचारलं

'आसमान निचे उतर आया है!' मी म्हणालो..

रेल्वे रुळाच्या बाजुला असणारे सिग्नलचे लाल, हिरव्या, नारंगी रंगाचे दिवे खुप आकर्षक दिसत होते..

' ये उपर जो दिया है वो उडनतश्तनी है ना?' त्याने परत प्रश्न विचारला!

मला खरं उत्तर द्यावस वाटल पण मी ते टाळलं...

'हं'

'आसमान निचे आया है तो उसके साथ वो भि निचे आये है' त्याने स्वतःच स्पष्टीकरण दिलं

गाडीने लोणावळा स्टेशन गाठलं होत.. मी बॅग घेऊन खाली उतरलो...

आफताब माझ्या मागोमाग उतरला..जणू काही तो माझ्यासोबतच आला होता..

'वापस कब जायेगा?'

'९.३० कि लोकल है ना, उससे जाउंगा'

'फिर खाना?'

'हां...आते वकत थोडा खाया'

तो मला कुठल्याच कोनातून भिकारी वाटत नव्हता.

मुळात एखाद्या कोवळ्या बालकाला त्याचे आई-वडील असे रात्री-बेरात्री भिक मागायला पाठवू कसे शकतात?

अचानक 'ससून मधून नवजात अर्भक पळवले' अशा आशयाच्या बातम्या माझ्या डोळ्यासमोर तरळू लागल्या..

माझ्या डोळ्यात पाणी आले..

टेलिव्हिजन व लागणार्‍या लहानग्यांच्या विवीध स्पर्धा आणि त्यात विवीध वेशभुषा करुन कला सादर करणारी ती चिमुकली आणि आफताब यांच्यात मला समानता दिसु लागली..

पण मी लगेच भानावर आलो कारण हा रियालिटी शो नव्हता तर रियालिटी होती

आफताब सारख्या मुलांच पुढे काय होत माहित नाही.. त्यांची गरज संपल्यावर त्यांच्या अवयवांची विक्री केली जाते अथवा त्यांना परदेशात विकलं जातं.. पण ही मुल परत कधीच दिसत नाहीत..

चालत चालात आम्ही प्लॅटफॉर्म पुलाखाली आलो..

'चल आफताब अब मुझे जाना होगा'

'जा रहे है आप?'

' हा मुझे निचे कोंकण मे जाना है! दुर का सफर है!'

'ठिक है' तो शांतपणे म्हणाला

मी खिशातून २० रुपयाची नोट काढली आणि त्याला दिली

'कुछ खाले, आज जल्दी घर जा, चल फिर मिलेंगे'

'चलेगा'

डोळ्यातलं पाणी लपवत मी पुल चढू लागलो..

पुल पार करुन मी दुसर्‍या प्लॅटफॉर्मवर आलो..

आफताब आता आधीच्या प्लॅटफॉर्मवर राहिला होता...

त्याला फिर मिलेंगे म्हणालो खरं पण कसं या प्रश्नाच उत्तर माझ्याकडे नव्हतं..

असे अनेक आफताब दररोज आपल्या आजुबाजुला दिसतात...प्रेमाचे दोन शब्द ऐकावयास मिळाले तरी त्यांच्यासाठी खुप असतात, आपली हि माणुसकीच त्यांच्या जन्मभर लक्षात राहते..मात्र आपण ते जाणिवपुर्वक टाळतो..

तो गोड चेहरा पुन्हा दिसेल की नाही याची मला शाश्वती नव्हती..

त्याला शेवटचं पाहून घ्यावं यासाठी मी पलिकडल्या प्लॅटफॉर्मवर एक नजर टाकली

पण त्या दाट धुक्यात आफताब दिसेनासा झाला होता!