मुंबईचा प्राचीन इतिहास - भाग २

मुंबईचा प्राचीन इतिहास - भाग २
घारापुरी बेट

इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या अखेरीस त्रैकुटक साम्राज्य कोकणातून लोप पावले व त्यांचे मांडलिक असलेल्या मौर्यांच्या अखत्यारित कोकण प्रदेश आला. सुकेतुवर्मनचा फक्त एकशिलालेख पालघर जिल्ह्यातील वाडा येथे सापडला असून या शिलालेखात त्याचा उल्लेख ‘भोजनाम मौर्य धर्ममहाराज सुकेतुवर्मन’ असा केला असून हा शिलालेख येथील कोटेश्वर देवस्थानाच्याउभारणीसंदर्भातील असून सिंहदत्त व कुमारदत्त अशी नावेही यात सापडतात.अभ्यासकांचे मते वाड्यातील सध्याचे खांदेश्वर मंदिर हेच पुर्वीचे कोटेश्वर असावे. याच मौर्य काळात पुरीचा पहिलाथेट उल्लेख कर्नाटकातील बदामी येथील एका मंदिरा वरील शिलालेखात आढळतो. या शिलालेखात बदामीच्या प्रख्यात सम्राट द्वितीय पुलकेशी याची प्रशस्ती असून ती कवी रवीकिर्ती यानेलिहीली आहे.

इ.स. ५११ च्या सुमारास पुलकेशीने कोकणावर हल्ला करुन मौर्य राजास पराभुत केले होते या कोकणच्या मौर्य राजाचेनाव सुकेतुवर्मन असुन त्याची राजधानी पुरी होती. मौर्यांची ही अपरांतशाखा पाटलीपुत्र येथील मौर्य घराण्याचीच एक उपशाखा होती. बलाढ्य मौर्य साम्राज्याचे पतन झाल्यावर कोकणातील ही शाखा कधी स्वतंत्रपणे तर कधी इतर राजवटींच्या अधिपत्याखाली टिकावधरुन राहिली. मात्र पुलकेशीच्या स्वारीने मौर्य सत्तेचे कोकणावरील अस्तित्व संपवून टाकले.पुलकेशीच्या या मोहिमेत कोकणचा राजा सुकेतुवर्मन मौर्य ठार झाला. कोकणावरील या मौर्य सत्तेचीचिन्हे आजही घारापुरी येथील मोर बंदर व उरण येथील मोरा (मौर्य) बंदरांच्या नावांतून दिसते याव्यतिरिक्त पुर्वी चौल प्रांतातील कोर्लईसही मोरा असेही म्हणत असत. शेजवलकरांच्या मतेजावळी येथील मोरे हे या वंशातील असावेत कारण समुद्रकाठाच्या आतील प्रदेश म्हणजे रायरी, रायरेश्वर, महाबळेश्वर, सुधागड, जावळी आदी वन्य प्रदेश. सपाट प्रदेशातील सुपीक राज्यगेल्यानंतर या राजवंशाने अरण्यवास पत्करुन स्वसंरक्षण केले व नंतर हजार वर्षांनी ते पुन्हा राजे म्हणुन प्रसिद्ध झाले असे शेजवलकर सांगतात. 

पुलकेशीच्या कोकणावरील स्वारीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे ‘अपरजलधेर्लक्ष्मीयस्मिन्पुरीममितप्रभेद्य मदगजघटाकारैनावा शतेरवमृन्दतिद्य जलदपटलानीकाकीर्णे नवोत्पलेमचकम्य जननिधीरिव्यवोमव्योम्नः सभोभवदंबुधीरू’  अर्थ - महापराक्रमी अशा पुलकेशीने मदयुक्त गजपंक्तीप्रमाणे आकार असणाऱ्या शंभराहून अधिक जहाजांच्या आधारे पश्चिम समुद्रलक्ष्मी पुरी नामक राजधानीला वेढादिला असता मेघ समुदायाने व्याप्त आणि ताज्या उत्पलाप्रमाणे निलवर्ण असे आकाशही समुद्रासारखे झाले व समुद्रही आकाशस्वरुप झाला व कोकण प्रांतात त्याच्या (पुलकेशीच्या) आदेशातवागणाऱ्या सैन्यरुपी पर्वतप्राय लाटांनी एखाद्या डबक्यातील तरंगाप्रमाणे हलणाऱ्या मौर्य सैन्याच्या समृद्धीला खाली बसवले!  ज्याअर्थी या मोहिमेत शंभराहून अधिक जहाजांनी पुरीस वेढा दिल्याचाउल्लेख आहे त्याअर्थी ही पुरी तिनही बाजूंनी समुद्रवेष्टीत होती हे स्पष्ट आहे तसेच वासुदेव भावे यांच्या मते जर ऐहोले प्रशस्तीमधील मदगजघट या शब्दाचा अर्थ व्यंजनेने घेतल्यास या मोहिमेतपुलकेशीने गजदळाचाही वापर केला होता असा तर्क लावता येतो व मुंबईचा प्राचिन आकार पहाता ती तिनही बाजुंनी समुद्रवेष्टित असल्याचे दिसून येते. 

इसवी सनाच्या सहाव्या शतकात या द्विपांवर कलचुरी राजवंशाची सत्ता होती. कृष्णराज कलचुरी याची नाणी या बेटावर जमिनीत गाडलेली मिळाली आहेत. कृष्णराजाचा काळ हा इ.स.५५९ तेइ.स.५७५ मानला जातो व या वंशात शंकरगण व बुद्धराज हे राजे त्याच्यानंतर झाले. कृष्णराजाच्या काळातही पुरीस महत्त्व होते हे त्याच्या याच बेटावर सापडलेल्यानाण्यांवरुन सिद्ध होते व याबेटावर अनेक वर्षे त्यांची सत्ता होती हे त्याच द्विपसमुहातील घारापुरी बेटावर बांधल्या गेलेल्या शैव लेण्यांवरुन स्पष्ट होते. कलचुरी हे शैव पाशुपत पंथाचे अनुयायी होते.

इसवीसनाच्या ७व्या-८व्या शतकात उत्तर कोकण हरिश्चंद्रवंशिय राजांच्या अखत्यारित होते हे राजे बदामीच्या चालुक्यांचे मांडलिक होते. ठाणे जिल्ह्यात जो हरिश्चंद्रगड नावाचा किल्ला आहे तोकिल्ला यांचे मुळस्थान असावे कारण या किल्ल्यावर आजही पुरातन लेण्यांचे व मंदिराचे अवशेष आढळून येतात. याच हरिश्चंद्रिय राजवंशात भोगशक्ती नामक एक राजा आठव्या शतकात होऊनगेला व त्याजकडे उत्तर कोकणाचे अधिपत्य होते त्याचा ताम्रपट नाशिक जिल्ह्यातील आंजणेरी येथे सापडला असून त्यामध्ये चतुर्दशग्रामसहस्त्रसंख्य सकलमपी पुरीकोंकण भक्तमासित अर्थात१४०० गावांचा समावेश असलेल्या पुरी कोकण प्रदेशाचा स्वामी असा उल्लेख आला आहे यावरुन भोगशक्तीच्या काळात उत्तर कोकणाची राजधानी पुरीच होती हे लक्षात येते.  भोगशक्तीचेचदुसरे नाव पृथ्वीचंद्र असे असून तो राजा सिंहवर्म याचा पुत्र व राजा स्वामीचंद्र याचा नातु होता. राजा स्वामिचंद्रास पुलकेशीचा (द्वितिय) मुलगा विक्रमादित्य (प्रथम) आपल्या मुलाप्रमाणे वागवतअसे. पुलकेशीने मौर्यांचा पराभव करुन ताब्यात घेतलेल्या पुरीकोकण प्रदेशाचे अधिपत्य अशा रितीनेकाही काळ हरिश्चंद्रवंशिय राजघराण्याकडे टिकले. याच काळात दंतीदुर्ग नामक राष्ट्रकुटानेपल्लव व चालुक्य यांच्यात सारख्या होणाऱ्या लढायांचा फायदा घेऊन दोनही सत्ता कमकुवत करुन राष्ट्रकुट घराण्याची स्थापना केली.