मुंबईचा प्राचीन इतिहास - भाग ३

याच राष्ट्र्कुट घराण्यातील तृतीय गोविंद नामक राजाने त्याचा सेनापती ज्याचे नाव कपर्दी शिलाहार होते त्याने तृतीय गोवींदास उत्तर कोकण अर्थात पुरी कोकण जिंकण्यास मदत केल्याने संपुर्ण पुरी कोकणाचे अधिपत्य तृतिय गोवींदाने कपर्दीस दिले.

मुंबईचा प्राचीन इतिहास - भाग ३

कपर्दीनेही अर्थात आपल्या राजधानीचे प्रमुख स्थळ हे पुरीलाच केले. पुरी हा मुळात एक द्विपसमुह होता त्यामुळे कपर्दीवरुन म्हणा अथवा लघु बेटांचा समुह म्हणुन पुरी द्विपसमुहास कपर्दिकाद्वीप किंवा कवडीद्वीप असे म्हणत असत. कपर्दीच्या ताब्यात सध्याचा वसई, मुंबई, ठाणे, रायगड, जंजिरा व रत्नागिरी जिल्ह्याचा उत्तर भाग होता ज्यास पुरीकोकण ही संज्ञा होती. 

कपर्दीचे स्वतःचे असे लेख अजुन आढळले नसले तरी त्याचा पुत्र पुल्लशक्ती याच्या व त्यानंतरच्या शिलाहार राजांच्या लेखांत कपर्दीचा उल्लेख आला आहे. पुल्लशक्तीच्या कान्हेरी येथील शिलालेखात कपर्दीस कोंकणवल्लभ असे नामाभिमान आले असून पुल्लशक्ती हा पुरीप्रभुतीकोंकण विषयाचा स्वामी असल्याचा उल्लेख आहे व कान्हेरीचा उल्लेख कृष्णगिरी असा आलेला आहे. पुलशक्ति व कपर्दी दुसरा यांच्या वेळचे दोन लेख एक इ. स. ८५३ चा व दुसरा ८७७ चा-कान्हेरी लेण्यांत आहेत. त्यास लघु कपर्दी असेहि नाव दिलेलें कांहीं ताम्रपटांत आढळते.  दुस-या कपर्दीमागून त्याचा पुत्र वपुवन्न हा राजा झाला. व वपुवन्नानंतर गादीवर बसलेला त्याचा ज्येष्ठ पुत्र झंझ मोठा शिवभक्त निघाला. खारेपाटण येथील इ. स. १०९५ च्या ताम्रपटांत त्याने शंकराची बारा देवालये बांधल्याचे वर्णन आहे मात्र ही देवालये कुठली याचा शोध अजुनही लागलेला नाही. झंझाची मुलगी ही भिल्लम दुसरा यास दिली होती व तिची आई राष्ट्रकूट घराण्यांतील होती. झंझाचा भाऊ गोग्गीराज याची कन्या ही भिल्लमाची पट्टराणी होती. 

झंझ इ.स.९५० च्या सुमारास मरण पावल्यावर त्याचा भाऊ गोगी याजकडे राज्याधिकार आला. गोग्गी हे गोविंद शब्दाचे लाडके रुपांतर आहे. गोग्गीराज भीष्म-द्रोणाप्रमाणे शूर असल्याचे व त्याने आपल्या घराण्याची कीर्ति वाढविल्याचे ताम्रपटांत वर्णिले आहे. गोग्गीनंतरचा शिलाहार राजा पहिला वज्जड (वज्र) याच्या कारकिर्दीत (इ. स. ९६०-९७५) राष्टकूट साम्राज्याचा हास होऊन कल्याणच्या चालुक्य साम्राज्याची स्थापना झाली. यावेळी राष्ट्रकुटांच्या अनेक मांडलिकांनी चालुक्यांना साथ दिली मात्र उत्तर कोकणचे शिलाहार वज्जड व त्याचा पुत्र अपराजित हे शेवटपर्यंत राष्ट्रकुटांशी एकनिष्ठ राहिले. 

अपराजित हा फार पराक्रमी राजा निघाला, याने आपल्या राज्याच्या सिमा किती विस्तारल्या याची कल्पना त्याचे लेख पाहून येते. अपराजिताच्या राज्यात संयानभूमी (संजान), पूणकदेश (पुणे), चिपुलणविषय (चिपळूण) व संगमेश्वर, उत्तरेस लाट देशापासून दक्षिणेस चंद्रपुरपर्यंत पसरले होते. त्याशिवाय कोंकणास लागून देशावरचा मावळ वगैरे भागही त्याच्या राज्यांत होता. कारण सदर ताम्रपटाप्रमाणे त्याचे राज्य भिल्लमीय देशास म्हणजे यादव राज्याला भिडले होतें. पूणकदश (पुणे) देशावर असल्यामुळे पुण्यातील पाताळेश्वराचे लेणे शिलाहारांनी पुरीसभोवतालच्या जोगेश्वरी, मंडपेश्वर, घारापुरी येथील लेण्यांप्रमाणे खोदले असावे. त्याने स्वतःस महामंडलेश्वर व महासामंताधिपती अशी बिरुदे धारण केली होती राष्ट्रकुट साम्राज्य लयास गेल्यावरही त्याने चालुक्यांपुढे मान न वाकवता राष्ट्रकुट साम्राज्य लयास गेल्याबद्दल दुःख प्रदर्शित केले. अपराजिताने चालुक्यांविरुद्ध गोप राजा, ऐयप्पदेव राजा यांचे राज्य मिळवून दिले तसेच भिल्लमराजासही अभय दिले. उत्तर कोकणचे शिलाहार राज्य सम्राटपदास नेण्याचे अपराजित याचे प्रयत्न होते. 

चालुक्य सम्राट दुसरा तैलपासही अपराजितास नमवणे शक्य झाले नाही मात्र त्याचा पुत्र सत्याश्रय याने पित्याचे उरलेले काम पुर्ण करुन अपराजिताचा पराभव केला. यावेळी दक्षिण कोकणच्या रट्ट शिलाहाराची सत्याश्रयास मदत झाली कारण तो अगोदरच चालुक्यांचा मांडलिक झाला होता. सत्याश्रयाने या मोहिमेकरिता आपले आरमार सज्ज करुन दक्षिण कोकणच्या मार्गे उत्तर कोकणाकडे कुच केले याच वेळी त्याने आपले आणखी सैन्य जमिनीमार्गे उत्तर कोकणावर रवाना केले जेणेकरुन उत्तर कोकणास दोनही बाजूंनी वेढा घालता येणार होता. अपराजिताच्या काळात पुरी व स्थानक या दोन राजधान्या होत्या मात्र पुरीच्या दुर्गमतेमुळे बराचसा मुलकी कारभार हा स्थानक येथून होत असे. या मोहिमेच्या वेळीसुद्धा अपराजित हा ठाणे येथे होता मात्र सत्याश्रयाने अनेक मांडलिकांचे सहाय्य घेऊन अपराजितावर हल्ला केल्याने अपराजिताचा ठाणे येथे जमिनीवर पराभव होऊ लागल्याने त्याने समुद्रवेष्टित अशा पुरीचा आश्रय घेतला. मात्र सत्याश्रयाच्या सैन्याने पुरीसही वेढा घातल्याने व एकिकडे सत्याश्रयाची सेना व पश्चिमेस समुद्र असल्याने अपराजितास पराभवाचा स्विकार करुन अपराजितास खंडणी देऊन सुटका करून घेण्याची नामुष्की ओढवली. 

सत्याश्रयाच्या दरबारी रण नामक एक कन्नड कासार कवी आश्रयास होता त्याने गदायुद्ध अथवा साहसाभिमविजय नावाचे एक काव्य लिहीले आहे त्यामध्ये त्याने सत्याश्रयास भिमाची उपमा देऊन अपराजिताच्या पराभवाचे वर्णन पुढीलप्रमाणे केले. “सत्याश्रयाने कोकणाधिश अपराजित याचा पराभव केला तेव्हा तो समुद्रा कडिल राजधानी पुरी येथे पळून गेला मात्र एका बाजुस खरा समुद्र व एका बाजुस सत्याश्रयाचा सेनासमुद्र यांच्या कचाट्यात सापडून अपराजिताची अवस्था दोनही बाजुंनी जळणाऱ्या काडीवरिल किड्यासारखी झाली” ही समुद्राकडिल राजधानी मुंबईव्यतिरिक्त कुठली असणार? कारण स्थानक अर्थात ठाणे या राजधानीच्या अगदी शेजारीअसलेले शहर म्हणजे मुंबईच आहे. अपराजित २१ हत्तींच्या खंडणींच्या मानहानीनंतर अपराजित फार काळ जगला नाही.