मुंबईचा प्राचीन इतिहास - भाग ४

अपराजितानंतर त्याचे वज्जड व अरिकेसरी हे राज्यावर आले. वज्जड हा पाच वर्षे कारभार करुन मृत्यू पावला त्यानंतर त्याचा पुत्र छित्तराज हा अल्पवयी असल्याने त्याचा काका अरिकेसरी हा कारभार पाहू लागला.

मुंबईचा प्राचीन इतिहास - भाग ४
मुंबईचा वाळकेश्वर व बाणगंगा तलाव परिसर

त्याने दक्षिण कोंकणाचा कांही भागही आपल्या राज्यास जोडला. छितराज सज्ञान झाल्यावर त्याने १०२५ च्या सुमारास राज्यकारभार स्वतःच्या हाती घेतला. त्याने आपणास महासामंताधीपती व महामंडलेश्वर अशा पदव्या लावल्या, तो चालुक्यांचाच मांडलिक असावा. छित्तराजाने एका ताम्रपटात त्याच्या राज्याचे वर्णन  “पुरीप्रमुखचतुर्दशसतिसमन्वितसमस्तकोंकणभुव” असे केले आहे. छित्तराजाच्या ताब्यात स्थानक (ठाणे),शुरिक (सोपारा) व चेमुली (चौल) ही गावें होती. छित्तराजाने भांडूप येथील ताम्रपटांत ब्राह्मणांना दिलेले शेत नीरा गावांत व साष्टी प्रांतांत होतें. छित्तराजास त्याकाळी बऱ्याच संकटांस तोंड द्यावे लागले. त्यावेळी कल्याणचे चालुक्य आणि परमार याचे हाडवैर माजले असून त्यांच्या आपसांत वारंवार लढाया चालत. छित्तराजाचे वडिल अपराजित याने पुर्वीच चालुक्यांचे अधिराज्य पुर्वीच कबुल केले असल्याने त्यांचा पक्ष धरण्याशिवाय छित्तराजास गत्यंतरच नव्हते. त्या योगानें परमार राजा भोज याचा रोष छित्तराजास ओढवून घ्यावा लागला. त्या रागांत भोजाने इ. स. १०१९ त उतर कोंकणावर स्वारी करून त्यावर आपले वर्चस्व बसविले. 

छित्तराजामागून त्याचा भाऊ मुंमुणी (इ. स. १०४०-७०) राज्यपदावर चढला. त्याच्या काळांत माळव्याचे परमार काही दिवस कमजोर होऊन दक्षिणेकडील गोवे प्रांतांतील कदंब शक्तीशाली झाले. हे कदंब सुद्धा शिलाहारांप्रमाणेच चालुक्यांचे मांडलिक मात्र चालुक्यांचे राज्य कमजोर झाल्यावर यांनी स्वतःस स्वतंत्र घोषित केले यांच्यातील षष्टदेव दुसरा हा मुंमुणीचा समकालिन होता. षष्टदेव हा गोव्याचा महामंडलेश्वर असून त्याजपाशी मोठे आरमार होते व याच आरमाराचा वापर त्याने उत्तर कोकणावरिल स्वारीसाठी केला. षष्टदेवाने समुद्रमार्गे गोव्याहुन पुरीकडे कुच केले व प्रथम त्याने शिलाहारांकडून दक्षिण कोकण ताब्यात घेतले व थेट उत्तर कोकणातील कवडीद्विपावर अर्थात पुरी या राजधानीवर हल्ला करुन ति सुद्धा ताब्यात घेतली याशिवाय त्याने कवडीद्विपालाच लागून असलेले साष्टी बेट जहाजांचा पुल उभारुन ताब्यात घेतले. या मोहीमेसंदर्भातील एका लेखात साष्टीचा उल्लेख लंका असा केला गेलेला आहे तसेच मुंमुणीच्या दिवेआगर ताम्रपटात त्यास “निशंक लंकेश्वर” असे म्हटले असून त्याची ठाणे ही राजधानी साष्टी बेटावर असल्याने उत्तर कोकणची राजधानी पुरी ही समुद्रवेष्टित असल्याने तिला लंकेची उपमा सदर ताम्रपटात दिली गेली असल्याचे दिसून येते. षष्टदेवाने उत्तर कोकण ताब्यात घेतल्याने नाईलाजाने मुंमुणीस त्याच्यासोबत तह करून आपल्या मुलीचे लग्न त्याच्यासोबत लावून देऊन उत्तर कोकणावरील आपला हक्क राखावा लागला. 

मुंमुणीनंतर त्याचा लहान भाऊ नागार्जुन हा गादीवर बसला मात्र नागार्जुनाच्या काळात शिलाहार सत्ता दुर्बल झाली व उत्तर कोकणाच्या सभोवतालच्या प्रदेशांतील अरब व इतर मांडलिक शिलाहारांशी फटकून वागू लागले याचा फायदा घेऊन गुहल्लदेव कदंबाने उत्तर कोकणावर स्वारी केली. यावेळी त्याला एका अरब मांडलिकाचे सहाय्य झाले. त्याने देश उध्वस्त करुन कोकणातील जनतेचा छळ सुरु केला मात्र नागार्जुनाचा पुत्र अनंतदेव याने या यवन आक्रमकांना हाकलून दिले. अनंतदेवाचा फक्त एक ताम्रपट खारेपाटण येथे मिळाला असून त्याने आपल्या मंत्र्याच्या जहाजांना पुरी, चौल, ठाणे, नागोठणे व सोपारा या बंदरांवर करमाफी दिल्याचा उल्लेख आहे. अनंतदेवाच्या कारकिर्दीच्या अखेरीस परत एकदा त्याचा गोवेकर कदंबांशी झगडा उत्पन्न होऊन गुहल्लदेवाचा पुत्र जयकेशी याने उत्तर कोकणावर स्वारी करुन अनंतदेवास ठार मारले व उत्तर कोकण आपल्या ताब्यात घेतले. इ. स. ११२५.२६ च्या नरेंद्र येथील शिलालेखात जयकेशीचा ‘कवडीद्वीपाधिपति’ म्हणून उल्लेख आहे. हे कवडीद्विप म्हणजेच पुरी द्विपसमुहाचे दुसरे नाव. 

अनंतदेव मरण पावल्यावर त्याचा पुत्र अपरादित्य ऊर्फ अपरार्क पहिला (१११०-४०) गादीवर आला मात्र जयकेशीने पुर्वी अपरादित्याचा पिता अनंतदेव यास ठार मारलेले असल्यामुळे अपरादित्यास कारकिर्दीच्या सुरुवातीस खुप दैन्यावस्था प्राप्त झाली. उत्तर शिलाहारांचा बराच मुलुख कदंबांच्या ताब्यात गेल्यामुळे अपरादित्याची स्थिती फार कष्टप्रद झाली. त्याचे मंत्री व मांडलिक शत्रूला मिळाले, बरेच सैन्य लढाईत मेले व खजिना रिकामा पडला. तरी त्याने न डगमगता सैन्याची पुन्हा जुळवाजुळव केली व आपल्या तलवारीच्या जोरावर व बाहुबळाने इ. स. ११२६ त जयकेशीचा पराभव करून कदंबांना कोंकणांतून हाकलून दिले व या कामी त्यास कोल्हापुरकर शिलाहारांची उत्तम साथ लाभली. कदंबांचा पराभव केल्यावर अपरार्काने आपले आसन चांगले स्थिर करून निरनिराळ्या राजदरबारी आपले वकिल ठेवले. अपरादित्य हा पराक्रमी व न्यायी राजा होता व सर्व कलांचा अधिपती होता. तो लेखक असुन याज्ञवल्क्य स्मृतीवर त्याने लिहीलेली अपरार्क टिका आजही काश्मिरात प्रमाण मानली जाते. काश्मीरांत सापडलेल्या मंखाच्या श्रीकंठचरित्रामध्ये अपरार्कराजाचा तेजकंठ नांवाचा वकील तेथील नृपती जयसिंगाच्या दरबारी नेमला होता. अपरार्क हा शूर कर्तबगार व विद्वान राजा इ. स. ११४० च्या सुमारास मरण पावला.