मुंबईचा प्राचीन इतिहास - भाग ५

अपरादित्यानंतर त्याचा पुत्र हरिपाल व त्याच्यानंतर मल्लिकार्जुन हे एकामागुन एक गादीवर आले, हरपाल व मल्लिकार्जुनाचे नाते स्पष्ट नाही मात्र हरपालदेवास महानंद नामक एक भाऊ होता त्याचा मल्लिकार्जुन हा पुत्र असावा.

मुंबईचा प्राचीन इतिहास - भाग ५

हरपालदेवाची तिन दानपत्रे ठाणे जिल्ह्यात सापडली आहेत. हरिपालानंतर मल्लिकार्जुन जेव्हा गादीवर आला तेव्हा दक्षिणेत कदंब व होयसळ यांच्या तुंबळ युद्ध झाल्याने उत्तर कोकणास त्या बाजुने धोका नव्हता मात्र उत्तरेस गुजरातमध्ये एक संकट कुमारपाल चालुक्याच्या रुपाने आकार घेत होते व लवकरच हे संकट उत्तर कोकणावर तुटून पडले. ही घटना पुढीलप्रमाणे घडली. 

एक दिवस कुमारपाल आपल्या राजसभेत सेनापतींसह बसला असता एका भाटाने उत्तर कोकण राजा मल्लिकार्जुनची प्रशस्ती त्याला ऐकवली. या प्रशस्तीमध्ये मल्लिकार्जुनाने धारण केलेल्या राजपितामह या उपाधीचे वर्णन होते. कुमारपालाला हे सहन न होऊन त्याने उत्तर कोकणावर हल्ला करण्याचा निश्चय केला. याचवेळी त्याचा अम्बड नामक एक सेनापती त्याच्यासमोर हात जोडून उभा राहिला व ही मोहीम आपण फत्ते करुन मल्लिकार्जुनाच्या अभिमानाचे मर्दन करु अशी ग्वाही कुमारपालास दिली. मल्लिकार्जुनाने आपले अनेक सेनानी व सैन्य अम्बड सोबत देऊन त्यास उत्तर कोकणावर रवाना केले. उत्तर कोकणातल्या कलविण नदीच्या तिरावर अम्बडच्या सैन्याचा तळ पडलेला असतानाच मल्लिकार्जुनास पुर्वीच या हल्ल्याची बातमी लागून त्याने या तळावर जोरदार हल्ला चढवला त्यामुळे अम्बड ला सैन्यासहित तेथून पळ काढावा लागला. 

मात्र कुमारपाल या पराजयाने न खचता त्याने परत एकदा आपले सैन्य सिद्ध केले व गुजरात तथा राजस्थान मधील इतर राजांचे सहाय्य मागुन परत एकदा अम्बडला प्रचंड सैन्यासह कोकणावर रवाना केले. यावेळी अम्बडने कावेरी नदी पार करुन एक वेगळाच मार्ग तयार केला व त्याच मार्गाने सैन्यासह मार्गक्रमण केले व उत्तर कोकणात येऊन पोहोचला. उत्तर कोकणातले अनेक मोर्चे मारत कुमारपालाचे सैन्य राजधानी ठाणे येथे येऊन पोहोचले यावेळी स्वतः मल्लिकार्जुन युद्धसज्ज होऊन व आपले धनुष्य व बाण घेऊन हत्तीवर बसुन मैदानात उतरला व ज्याअर्थी तो धर्नुर्विद्येत कुशल असल्याने त्याने कुमारपालाच्या अनेक सैनिकांची कत्तल केली मात्र एका बेसावध क्षणी हत्तीवर असल्याने शत्रुचा एक बाण लागून मल्लिकार्जुन जमिनीवर कोसळला व अम्बडने त्याचे शिर कापुन ते कुमारपालास प्रदान केले. कुमारपालानेही खुष होऊन मल्लिकार्जुनाने धारण केलेली राजपितामह हि पदवी अम्बडला दिली. या घटनेचा उल्लेख कुमारपालचरित्रात असून यामध्ये पुरीचा उल्लेख “शतानंदपुरी जलाधिवेष्टीते” असा आहे अर्थात पाण्याने वेढलेली शत आनंद देणारी पुरी या वर्णनावरुन पुरी म्हणजे मुंबई होती हे लक्षात येते. या युद्धानंतर कुमारपालाच्या सैन्याने व त्यास सहाय्य करणाऱ्या राज्यांच्या सैन्याने पुरीत व स्थानकात बरीच लुट करुन शहरे बेचिराख करुन टाकली व जाताना बरिच संपत्ती आपल्यासोबत अणहिलपुर येथे नेली. 

प्रबंधचिंतामणी नामक ग्रंथात मात्र मल्लिकार्जुनास चौहाणराजा सोमेश्वर जो कुमारपालाच्या सैन्याचा सहाय्यकर्ता होता त्याने मारले असा उल्लेख आहे. याशिवाय परमार यशोधवल यानेही या युद्धात कुमारपालास सहाय्य केले. आबुच्या तेजपालप्रशस्तीमध्ये पुढीलप्रमाणे उल्लेख आहे “जेव्हा यशोधवल क्रोधाविभुत होऊन समरभुमीत संलग्न झाला तेव्हा कोंकणनरेशाच्या बायका आपल्या कमळ समान नेत्रांतुन अश्रुपात करायला लागल्या” मल्लिकार्जुनचा अंत सन १९६० च्या आसपास झाला असावा. कुमारपालाने जरी मल्लिकार्जुनाचा अंत केला तरी त्याचे अस्तित्व उत्तर कोकणावर अल्पकाळच राहिले कारण लगेचच मल्लिकार्जुनाचा पुत्र दुसरा अपरादित्य गादीवर येऊन त्याने कारभार हाती घेतला पुरीतील परळ भागात त्याचा सन १९८७ सालचा एक शिलालेख आढळला आहे. कुमारपालाचा परत पराभव केल्यावर त्याने महाराजाधिराज व कोंकणचक्रवर्ती अशा पदव्या घेतल्या. 

द्वितीय अपरादित्यानंतर त्याचा पुत्र केशिदेवराय दुसरा गादीवर आला. त्याने अनेक वर्षे राज्य केले. केशिदेवरायानंतर त्याचा पुत्र सोमेश्वर हा गादीवर आला. सोमेश्वर हा उत्तर कोकणच्या शिलाहार शाखेचा अंतिम सम्राट. याच्या काळात देशावर देवगिरीच्या यादवांचे राज्य प्रबळ होत होते व अर्थात त्यांचे लक्ष आता कोकणावरही गेले. यादव नृपती कृष्ण याने सोमेश्वराच्या काळात उत्तर कोकणावर स्वारी केली मात्र या स्वारीचा यादवांना फार फायदा झाला नाही मात्र आपल्या काकाचे उरलेले काम त्याच्या महादेव नामक पुतण्याने करायचे ठरवले व उत्तर कोकणावर प्रचंड मोठ्या सैन्यासह व गजदलासह हल्ला केला. सोमेश्वराची या अस्तित्वाच्या लढाईत हार होऊ लागली तेव्हा त्याने ठाण्याहून निवडक सैन्यासह पुरीकडे प्रयाण केले कारण यादवांकडे आरमार नव्हते. मात्र यावेळी भर समुद्रातच सोमेश्वर आपल्या जहाजासह बुडून मरण पावला व ३०० वर्षांहून अधिक काळ पुरीकोकणावर अधिराज्य गाजवणारे शिलाहार साम्राज्य सोमेश्वरासहितच समुद्रतळाशी गेले. 

या युद्धप्रसंगाचा उल्लेख हेमाद्रीच्या राजप्रशस्तीमध्ये येतो तो पुढीलप्रमाणे ‘ये भोज देवानृपते प्रतापी जग्राह वाहं मदमन्दसत्वरू सार्ध जनन्या सह जिवितेन सोमेश्वरस्यापी जहार राज्यम, तदिय गंध द्विप गंड पालीद्य निष्टन दानाम्बूद्य तरंगिणीषूद्यद्य सोमः समुद्रप्लवद्य पशेलोपी ममज्ज सैन्ये सहं कुंकुणेश’ अर्थात कोकणचा राजा सोमेश्वर हा पोहण्यात उत्कृष्ट असुनही महादेवाच्या गजदलातील हत्तींच्या गंडस्थळातून वाहणाऱ्या पाण्यात आपल्या सैन्यासह वाहून गेला. देवगिरीकरांनी उत्तर कोकणच्या शिलाहारांवर केलेले आक्रमण फक्त शिलाहार साम्राज्याचा अध्याय कायमस्वरुपी संपवणारे ठरले नाही तर सोबत पुरीच्याही अध्यायाची समाप्ती करणारे ठरले कारण या काळानंतर पुरीचे स्वतंत्र नामोल्लेख परत दिसले नाहीत.