मुंबईचा प्राचीन इतिहास - भाग ६

हा भाग जिंकल्यावर यादवांनी आपल्या अच्युत नायक नामक महाप्रधानाची उत्तर कोकणाचा देशाधिकारी म्हणुन निवड केली.

मुंबईचा प्राचीन इतिहास - भाग ६

इतिहास, पर्यटन व माहितीपर व्हिडीओज पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा.

इतिहास, पर्यटन व माहितीपर व्हिडीओज पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा.

यावेळी त्याने आपले केंद्रस्थान साष्टी बेटावरील ठाणे हेच ठेवले जे शिलाहारांचे मुख्य कटक होते. मात्र शिलाहारांनी उत्तर कोकणाची जि पुरी-कोकण हि ओळख अगदी शेवटपर्यंत कायम ठेवली ती ओळख यादव काळात पुर्णपणे पुसली जाऊन उत्तर कोकणास ठाणे-कोकण हे नाव प्रचलित झाले. 

ठाणे-कोकण असा उल्लेख असलेली अनेक तत्कालिन साधने व लेख उपलब्ध आहेत ज्यात प्रामुख्याने महिकावतीची बखर व नागाव येथिल हंबिररावाचा शिलालेख यांचा समावेश होतो. यादवकाळात पुरी विस्मृतीत जाण्यास अनेक कारणे आहेत मात्र यातील प्रमुख कारणे म्हणजे एकतर यादव सत्तेचे केंद्रस्थान हे कोकणात नसुन देवगिरी येथे होते व यादवांचा तसा कोकणाशी फारसा संबंध शिलाहार साम्राज्य लयास जाईतोवर आला नव्हता याशिवाय शिलाहार काळातच उत्तर कोकणाचे सत्ताकेंद्र साष्टी बेटावरील ठाणे येथे गेल्यामुळे पुढे यादवांच्या सेनाधिकाऱ्यांनिही तेच स्थान गृहित धरुन पुरी कोकणाची ओळख ठाणे-कोकण अशी केली. 

तसेच रामदेव यादवाच्या काळात आरमार किती प्रबळ होते याचिही माहिती मिळत नसल्याने तसेच पुरी द्विपसमुहास फक्त जलयानाचाच वापर करुन जाता येत असल्याने कोकणावरील यादव काळाच्या अमलावेळी या बेटाकडे साफ दुर्लक्ष झाले असावे. शिलाहार साम्राज्याचा अंत यादवांनी केल्यानंतर उत्तर कोकणात जे अराजक निर्माण झाले त्याचा सर्वाधिक फटका पुरी बेटास बसुन त्याचे होते नव्हते तेवढे ऐश्वर्य व ओळख पुर्णतः लयास गेली. 

अच्युत नायक नामक प्रांताधिकारी अथवा देशाधिकारी या यादवांचा प्रतिनिधी म्हणुन उत्तर कोकणावर अमल करत असला तरी त्यानेही पुरीकडे साफ दुर्लक्ष करुन साष्टी-ठाणे हेच आपल्या हलचालींचे प्रमुख केंद्र बनवले व त्यामुळे पुरी बेटावर काही लोकांची छोटी छोटी राज्ये निर्माण झाली व याचबरोबर आजुबाजुच्या छोट्या छोट्या टोळ्या व पश्चिम समुद्रावरील चाचे लुटारु यांचा उपद्रव सारखा या बेटास होऊ लागल्यामुळे बेटावरील रहिवाशी आपल्या सुरक्षितेसाठी साष्टी बेटावर तसेच उत्तर कोकणातील इतर ठिकाणी रहावयास गेले व पुरीचे रुपांतर उजाड व वैराण अशा यमपुरी मध्ये झाले.