अन्नपूर्णा देवी - प्रगल्भतेची अमर ज्योत

जन्मजात प्रगल्भता अंगी असलेल्या व रक्तबंधांमधूनच संगीताचा वारसा मिळालेल्या विदुषी अन्नपूर्णा देवी (मूळ नाव - रोशनआरा) यांचा जन्म चैत्री पौर्णिमेला मध्य प्रदेशातल्या मैहर शहरात २३ एप्रिल, १९२७ रोजी झाला.

अन्नपूर्णा देवी - प्रगल्भतेची अमर ज्योत

ह्या जगात अशा अगदी अल्प व्यक्ती असतात, ज्यांना प्रगल्भता हा गुण ईश्वरी कृपेने जन्मजातच प्राप्त झालेला असतो. आणि अशा व्यक्ती एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे जीवनात अनेकांची आयुष्ये सन्मार्गी लावतात.

अशी जन्मजात प्रगल्भता अंगी असलेल्या व रक्तबंधांमधूनच संगीताचा वारसा मिळालेल्या विदुषी अन्नपूर्णा देवी (मूळ नाव - रोशनआरा) यांचा जन्म चैत्री पौर्णिमेला मध्य प्रदेशातल्या मैहर शहरात २३ एप्रिल, १९२७ रोजी झाला.  मैहर घराण्याचे संस्थापक उस्ताद अलाउद्दीन खान ऊर्फ 'बाबा' आणि मदीना बेगम हे त्यांचे माता-पिता. अंगभूत संगीतज्ञान असणाऱ्या अन्नपूर्णादेवींना अगदी बालपणापासून त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन मिळाले. पंधरा वर्षांपेक्षा जास्त अशी अखंड कंठसंगीत साधना, त्याच बरोबरीने सतार व सुरबहार या दोन वाद्यांवर त्यांनी जीवापाड घेतलेली मेहनत आणि अखंड रियाझ यांच्या जोरावर त्यांनी पुढच्या आयुष्यात वडिलांसारखीच अजोड कामगिरी केली. स्वतःच्या वडिलांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून अखंड विद्यादान केले. स्वदेश व परदेशातील विद्यार्थी पारखून त्यांना संगीत शिकवले. या सर्व विद्यार्थ्यांवर त्यांनी मातृवत् प्रेमही केले. हे सर्व विद्यार्थी आजदेखील त्यांना ‘माँ ' म्हणून संबोधतात!

वडील उस्ताद 'बाबा' तथा अलाउद्दीन खान यांनी जशी कलाकारांची एक मोठी फळी तयार केली तशीच कामगिरी, तितक्याच प्रतिभेने, तन्मयतेने आणि कडक शिस्तबद्धतेत ‘माँ’नी केली. त्यांच्या शिष्यांना अखंड निस्वार्थीपणे विद्येचे दान दिले. स्वतःच्या वडिलांकडून मिळालेला एक सल्ला त्यांनी सतत ध्यानी ठेवलेला होता. उस्ताद अलाउद्दिन खान ह्यांनी दिलेला तो सल्ला म्हणजे - ‘संगीताचा उपयोग सार्वजनिक देखावा म्हणून नाही, तर स्वतःला एक मनुष्य म्हणून घडविण्याकरता आवर्जून केला पाहिजे’ हा होता. या पितृमंत्राचे तंतोतंत पालन त्यांनी आयुष्यभर सुख-दुःखाचे लपंडाव सुरू असतानाही केले.

त्यांचे कौटुंबिक सुख हिरावले गेले. जीवनाचे सर्वेसर्वा असणारे, वटवृक्षासारखी छाया देणारे वडील वृद्धापकाळाने हा इहलोक सोडून गेले आणि नंतर काही वर्षांतच स्वतःच्या मुलाच्या निधनाचा धक्का सोसावा लागला. तरीही संगीतावरील असीम निष्ठा व वडिलांच्या शब्दाचा मान त्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीतही कधी ढळू दिला नाही.  ‘गुरु माँ’ यांना काही कौटुंबिक कारणामुळे व्यासपीठाकडे पाठ फिरवावी लागलेली असतानाही त्यांनी स्वतःच्या पित्याप्रमाणेच संपूर्ण आयुष्य संगीतासाठीच वाहून घेतलं. अशा ह्या साक्षात् सरस्वतीस भारत सरकारने १९७७ साली कला क्षेत्रासाठीचा 'पद्मभूषण पुरस्कार' देवून यथोचित गौरव केला. गुरु माँ अन्नपूर्णा देवी यांच्या इतके शुद्ध सतारवादन व सुरबहारवादन इतर कुणी क्वचितच केलेले असेल.

आदरणीय गुरू माँनी बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. नित्यानंद हळदीपुर, मिलिंद शेओरे, सतारवादक पं. निखिल बॅनर्जी, शाश्वती घोष, अमित रॉय, सुधीर फडके, संध्या फडके-आपटे, हेमंत देसाई, प्रभा अगरवाल, ऋषिकुमार पंड्या, डॅनियल ब्रेडले, पीटर वैन गिल्डर तर सरोदवादनामध्ये पं. ज्योतिन भट्टाचार्य, उमा गुहा, पं. बसंत काबरा, पं. प्रदीप बरोट, स्तुती डे, सुरेश व्यास, अतुल मर्चंट, लिनता  वझे, उर्मीला आपटे अनेक शिष्योत्तम  घडवले.

‘गुरू माँ’चे हे कैवल्यात्मक चैतन्य रूप १३ ऑक्टोबर, २०१८ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी प्रातःसमयी मुंबई येथे अनंतात विलीन झाले. या प्रगल्भ संगीतवृक्षाच्या प्रेमळ छत्राखाली भारतीय शास्त्रीय संगीताला अक्षय स्वरूप लाभले. या सरस्वती मातेने दिलेला प्रगल्भतेचा आशीर्वाद असाच सतत आपल्याला मार्गदर्शन करत राहो, हाच जोगवा मैहरच्या त्रिकुटपर्वतवासिनी देवी शारदेच्या चरणी आज माँच्या ९४ व्या जन्मदिनानिमित्त मागतो!
 
- नंदन वांद्रे (बाणेर, पुणे.)