मुंबईतील पुनर्स्थापित झालेली प्रसिद्ध ठिकाणे

पुरी ते मुंबई या प्रवासात या बेटावर अनेक राजकिय, भौगोलिक, सामाजिक व सांस्कृतीक स्थित्यंतरे झाली.

मुंबईतील पुनर्स्थापित झालेली प्रसिद्ध ठिकाणे

प्रचंड प्रमाणात घडलेल्या स्थित्यंतरामुळे मुंबई हिच पुर्वीची पुरी होती हे सिद्ध करणारे पुरावे दृष्टीआड झाले. अशाच काही स्थळांचे उदाहरण आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

शिवडीचा किल्ला

मुंबई बेटावर पुर्वेस शिवडी हे गाव आहे व या गावाचे नाव शिवडी पडण्याचे कारण म्हणजे पुर्वी या गावात एक शिवमंदिर होते मात्र परचक्रात हे मंदिरही उध्वस्त करण्यात आले. या मंदिराचे स्थान म्हणजे सध्या जिथे शिवडीचा किल्ला आहे तेच असुन पुर्वी या मंदिराचे अवशेष या किल्ल्यावर दिसायचे असा उल्लेख राईज ऑफ बॉम्बे या ग्रंथात आला असुन याच मंदिराच्या अवशेषांवर शिवडीचा किल्ला उभारण्यात आला होता.

मुंबादेवी

ग्रामदैवत मुंबादेवी हे अशाच प्रकारचे दुसरे उदाहरण, मुंबादेवीचे मुळ मंदिर हे पुर्वी मुंबईचा सध्याचा फोर्ट विभाग आहे तेथे कांपाच्या मैदानात फांशी नामक तळ्याजवळ होते मात्र फोर्टचा विस्तार करण्यासाठी ब्रिटिशकाळात तिथली वस्ती हलवली तेव्हा जुनी बांधकामे नष्ट करण्यात आली तेव्हा या मंदिराचा कुणीही वारस न सापडल्यामुळे मुळ मंदिर तोडले जाऊन मुर्तीस सध्या जेथे मुंबादेवी मंदिर आहे त्या जागेवर घेऊन जाण्यास परवानगी दिली व कारभार पांडूशेट सोनार यांच्या हाती सोपवला तेव्हापासुन सध्याच्या मंदिराची वहिवाट त्यांच्या घराण्यात चालू आहे.

काळबादेवी

काळबादेवीचे मुळ मंदिरही ब्रिटिशकाळात अशाच प्रकारे रस्त्याच्या रुंदीकरण काम करण्यासाठी तोडले गेले व त्यास नवीन जागा देऊन जिर्णोद्धार करण्यासाठी खर्च दिला व मंदिराची वहिवाट जोशी नामक घराण्याकड सोपवली होती.

महालक्ष्मी

महालक्ष्मीच्या मंदिराबद्दलही अशीच कथा प्रसिद्ध आहे, ब्रिटिशकाळात वरळीचा बांध जेव्हा बांधायला घेतला तेव्हा एक-दोन वेळा बांधकाम मध्येच कोसळले. या बांधकामाचा इंजिनियर एक प्रभु होता त्यास एके दिवशी महालक्ष्मीने दृष्टांत दिला की, माझी मुर्ती वरळीच्या खाडीत असून तिला काढून माझे देवालय बांधशील तरच हा बांध पुर्ण होईल. मग त्या गृहस्थाने खाडीतुन मुर्त्या शोधून त्या ठिकाणी परत मंदिर बांधले तेव्हा कुठे या बांधाचे काम पुर्णत्वास गेले. महालक्ष्मीची मुर्ती हि खाडीत सापडण्याचे कारण म्हणज पुर्वी या मंदिराचा झालेला विध्वंस हे स्पष्ट लक्षात येऊ शकते. तेव्हा असेच प्रकार मुंबईतल्या इतर अनेक ठिकाणी घडले नसावेत हे कशावरुन?