मुंबई - पश्चिम समुद्राची लक्ष्मी

मुंबईचा पुरी या नावाने प्रथम उल्लेख इसवी सनाच्या सहाव्या शतकातील कर्नाटकातील बदामीजवळील ऐहोले येथील एका मंदिरात सापडतो.

मुंबई - पश्चिम समुद्राची लक्ष्मी

इतिहास, पर्यटन व माहितीपर व्हिडीओज पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा.

इतिहास, पर्यटन व माहितीपर व्हिडीओज पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा.

हा उल्लेख सदर प्रांताचा सम्राट पुलकेशी दुसरा याने उत्तर कोंकण सम्राट सुकेतुवर्मन मौर्य याच्यावर केलेल्या हल्ल्यासंदर्भात आहे. पुलकेशीची कोकण मोहिम इ.स. ५११ च्या सुमारास झाली असावी. या काळी कोकणात मौर्यांची एक शाखा राज्य करत होती त्यांची राजधानी अर्थात पुरी ही होती. या पुरीच्या अखत्यारित जो प्रदेश येत असे त्यास पुरीकोकण ही संज्ञा होती. पुरी कोकणात जो प्रदेश ढोबळपणे समजला जातो तो सध्याचा ठाणे जिल्हा, मुंबई द्विप, रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचा उत्तर भाग येतो मात्र मौर्यांच्या काळात हि सिमा किती होती हे सांगणे अशक्य आहे. पुलकेशीच्या कोकणावरील स्वारीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.  

“कोंङ्कणेषु मदादिष्ट चण्डदण्डाम्बुवीचिभिः।, उदस्तास्तरसा मौर्यपल्वलाम्बुसमृद्धयः । (॥), अपरजलधेर्लक्ष्मी, यस्मिन्पुरीपुरमितप्रभे मदगजघटाकारैन्नावां शतैरवमृदनति जलदपटलानीकाकि (की) पर्णन्नवोत्पलमेचकजलनिधिरिव व्योम व्योन्नस्स्यद्य”  

अर्थ - महापराक्रमी अशा पुलकेशीने मदयुक्त गजपंक्तीप्रमाणे आकार असणाऱ्या शंभराहून अधिक जहाजांच्या आधारे पश्चिम समुद्रलक्ष्मी पुरी नामक राजधानीला वेढा दिला असता मेघ समुदायाने व्याप्त आणि ताज्या उत्पलाप्रमाणे निलवर्ण असे आकाशही समुद्रासारखे झाले व समुद्रही आकाशस्वरुप झाला व कोकण प्रांतात त्याच्या (पुलकेशीच्या) आदेशात वागणाऱ्या सैन्यरुपी पर्वतप्राय लाटांनी एखाद्या डबक्यातील तरंगाप्रमाणे हलणाऱ्या मौर्य सैन्याच्या समृद्धीला खाली बसवले!

ज्याअर्थी या मोहिमेत शंभराहून अधिक जहाजांनी पुरीस वेढा दिल्याचा उल्लेख आहे त्याअर्थी ही पुरी तिनही बाजुंनी समुद्रवेष्टीत होती हे स्पष्ट आहे तसेच वासुदेव भावे यांच्या मते जर ऐहोले प्रशस्तीमधील मदगजघट या शब्दाचा अर्थ जसाचा तसा घेतल्यास या मोहिमेत पुलकेशीने गजदळाचाही वापर केला होता असा तर्क लावता येतो व मुंबईचा प्राचिन आकार पहाता ती तिनही बाजूंनी समुद्रवेष्टित असल्याचे दिसून येते. कवी रविकिर्ती याने पुरीचे वर्णन अतिशय समर्पकरित्या व दुरदृष्टी ठेऊन केले आहे कारण तेव्हापासुन आजतागायत पश्चिम समुद्राची लक्ष्मी ही मुंबईच आहे व तिच्याइतके भरभराटीस आलेले उत्तम बंदरवजा शहर संपुर्ण कोकणपट्टीत दुसरे कुठलेही नसावे.

वरील शिलालेखातील वर्णनानुसार त्याकाळी आरमारांचा प्रभावी वापर होत होता हे लक्षात येते व मौर्यांनी ज्याअर्थी पुरीस आपली राजधानी केले होते त्याअर्थी त्यांच्याकडेही प्रबळ आरमार असावे हे निश्चीत आहे. ऐहोले प्रशस्तीतील वर्णनानुसार विचार केला तर पुरी ही पुलकेशीच्या आरमाराने घेरलेली वर्णित झाली आहे, मुंबईच्या भुगोलाचा विचार केल्यास मुंबईही तिनही बाजुंनी पश्चिम समुद्राने वेढली गेली आहे तसेच चौथी म्हणजे उत्तरेकडील बाजु ही माहिमची चिंचोळी खाडी असून पुढे साष्टी बेटाची सुरुवात होते व ऐहोले प्रशस्तीमधील मदगजघट या शब्दाचा अर्थ जसाचा तसा घेतल्यास या मोहिमेत पुलकेशीने गजदळाचाही वापर केला होता असा तर्क लावल्यास साष्टी बेटावर या गजदळाने वेढा देऊन नौका दलाने पुरीस तिनही बाजुंनी कोंडले असावे.

या भयानक वेढ्यातुन सुकेतुवर्मन निसटणे अशक्य होते व शेवटी त्यास आपल्या प्राणांची आहुती देऊन सुटका करुन घ्यावी लागली. यावरुन एक लक्षात येते की पुरी हे बेट राजधानी म्हणुन कितिही उत्तम असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने तेवढे चांगले नव्हते त्यामुळे शिलाहारांना सुद्धा पुढे पराभवाचे विदारक असे अनुभव आल्याने त्यांनी पुरी ही परंपरागत नाममात्र राजधानी ठेऊन आपला सर्व कारभार सुरक्षित आणि पुरीपासून जवळच अशा साष्टी बेटाच्या पुर्वेस स्थानक अर्थात ठाणे येथे हलवला.