मुंबईत मिळालेल्या प्राचीन नाण्यांचे रहस्य

सन १८८१ साली दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरातील कावेल या भागात एका गटारासाठी खोदकाम करत असताना सहा फुट खोल खड्डयात नाण्यांचा साठा सापडला.

मुंबईत मिळालेल्या प्राचीन नाण्यांचे रहस्य

सदर नाणी तज्ञांनी तपासुन पाहिली असता ती इसवी सनाच्या सहाव्या शतकात होऊन गेलेल्या कलचुरी सम्राट कृष्णराज याची निघाली. ज्या खड्डयात हि नाणी सापडली तो खड्डा कंपाऊंड वॉलच्या सिमेवरच होता जि कॅवेल लेन पासून काळबादेवी रस्त्याच्या पश्चिमेकडे होती व तिथूनच मुंबादेवीस जाण्यास फाटा फुटत होता.

या नाण्यावंर ब्राह्मी लिपीत

“परममहेश्वर मातापित्रपादान्युध्याता श्रीकृष्णराजा”

अशी अक्षरे कोरलेली असून मागिल बाजुस नंदीचे चित्र होते. यावरुन ही नाणी महिष्मतीच्या कलचुरी वंशाचा पहिला सम्राट कृष्णराज याची होती हे निष्पन्न झाले.

कृष्णराजाचा काळ हा इ.स.५५९ ते इ.स.५७५ मानला जातो व या वंशात शंकरगण व बुद्धराज हे राजे त्याच्यानंतर झाले. कृष्णराजाच्या काळातही पुरीस महत्त्व होते हे त्याच्या याच बेटावर सापडलेल्या नाण्यांवरुन व या बेटावर अनेक वर्षे त्यांची सत्ता होती हे त्याच द्विपसमुहातील घारापुरी बेटावर बांधल्या गेलेल्या शैव लेण्यांवरुन स्पष्ट होते.

कलचुरी हे शैव पाशुपत पंथाचे अनुयायी होते व घारापुरी बेटावरील या लेण्या पाशुपत पद्धतीच्याच असल्याचे अभ्यासकांनी सिद्ध केले आहे. यांनी आपल्या व्यवहारात त्रैकुटक अथवा कलचुरी कालगणनेचा वापर केला होता यावरुन या दोनही राजसत्ता एकाच वंशाच्या वेगवेगळ्या शाखा होत्या हे स्पष्ट होते कारण त्रैकुटक राजा विक्रमसेनाच्या माटवण (रत्नागिरी) येथे सापडलेल्या ताम्रपटात त्रैकुटकनाम कलचुरीनाम असा उल्लेख आढळल्याने त्रैकुटक व कलचुरी हे एकच असावेत या निष्कर्षास बळकटी येते.