पुरी ते मुंबई

शिलाहार कालीन साधनांत कवडीद्विप हा उल्लेख बऱ्याचदा येतो व अनेक अभ्यासकांच्या मते कवडीद्विपाचा अर्थ उत्तर कोकण असा होतो.

पुरी ते मुंबई

मात्र कवडीद्विप म्हणजे उत्तर कोकण नसुन पुरी द्विपसमुहाचेच नाव असावे, तेव्हा ते कसे काय याची शहनिशा करु. इसवी सनाच्या ९ व्या शतकात राष्ट्रकुटांनी उत्तर कोकणचा अधिभार त्यांचे मांडलिक शिलाहारांकडे दिला.

या शाखेचा प्रथम पुरुष म्हणजे कपर्दी. कपर्दी या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतल्यास जटाधारी असा होतो अर्थात हे शिवाचे दुसरे नाव आहे. कपर्दीचा अर्थ कवडी असाही होतो कवडी म्हणजे लहान (लघु), कपर्दीकडे उत्तर कोकणचा अधिभार आल्यामुळे अर्थात पुरी द्विपसमुहातील बेटे सुद्धा त्याच्या अधिपत्याखाली आली व पुरी द्विपसमुह व ठाणे व आजच्या रायगड जिल्ह्याचा भाग मिळून तेव्हाचा पुरी कोंकण होत असे.

कपर्दी हा उत्तर कोकण शाखेच्या शिलाहार वंशाचा उत्तर कोकणावर राज्य करणारा पहिला सम्राट असल्यामुळे मौर्य सत्तेनंतर नाममात्र उरलेल्या या द्विपसमुहास कपर्दीद्विप अथवा कवडीद्विप या नावांनीसुद्धा ओळखू लागले. हे कवडीद्विप कुठले तर सध्याच्या मुंबईची सात मुख्य बेटे ज्यात खुद्द मुंबई, कुलाबा, छोटा कुलाबा, माहिम, माझगाव, परळ व वरळी तसेच विस पंचविस कोसांच्या आत असलेली घारापुरी, बुचर, मिडल ग्राऊंड, ऑयस्टर रॉक, इस्ट ग्राऊंड, क्रॉस आयलंड इत्यादी बेटे मिळून तेव्हाचे कवडीद्विप अथवा पुरी होत असे याशिवाय पुरीच्या आसपास असलेल्या वसई, साष्टी (ठाणे), करंजा इत्यादी बेटेही तेव्हा कवडीद्विपात समाविष्ट होत असावित कारण हि सर्व खऱ्या अर्थी द्विपप्राय बेटे आहेत.

गोवेकर कदंब षष्टदेवाने उत्तर कोकणावर काढलेल्या मोहिमेचा उल्लेख जयकेशीच्या नरेंद्र शिलालेखांत आला आहे त्यामध्ये त्याने कवडीद्विपांचा उल्लेख केला आहे. यात या मोहिमेसंदर्भात असे म्हटले आहे की,

“विभावम स्विकृत आश्चर्य शौर्यम कवडीद्विपा मुम्मादियागेपलवम द्विपमग्लम कोंडू लंकेवरमतल्ता बहिनासमतातिगालिम्दम सेतुवम कट्टी कप्पवन उग्रासुर”

अर्थात जेव्हा त्याने (षष्टदेव) मुम्मुणीवर हल्ला करुन कवडीद्विप ताब्यात घेतले व आसपासची काही द्विपे जिंकली त्याच वेळी त्याने तेथून लंकेपर्यंत जहाजांचा पुल उभारला व तेथील लोकांवर कर लादला. नरेंद्र शिलालेखातच जयकेशीस सव्वालाख कवडीद्विपावर राज्य करणारा राजा दाखवला आहे याशिवाय देगाव येथील जयकेशीच्या शिलालेखात त्याचे कवडीद्विपाच्या नृपतीचा काळ असे वर्णन केले आहे.

कवडीद्विपाचा थेट अर्थ घेतल्यास छोटे द्विप असा अर्थ होतो व समस्त उत्तर कोकण हे द्विपप्राय नाही त्यामुळे उत्तर कोकणातील समुद्रालगतच्या पुरी प्रभुती टापुंना कवडीद्विप असे म्हटले गेले असावे.

इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात भारत भेटीस आलेल्या ग्रिक भुगोलतज्ञ टॉलेमी यान मुंबई द्विपसमुहांस हेप्टेनेशिया संबोधले होते त्यामुळे या द्विपसमुहाचे सर्वात जुने उपलब्ध नाव हेच म्हटले पाहिजे.

इसवी सनाच्या चैथ्या शतकात हा द्विपसमुह मौर्यांच्या अपरांत शाखेची राजधानी असून यांच्या द्विपप्रायतेमुळ पुरी या नावान ओळखला जात असे व ही ओळख पुढे शिलाहार काळापर्यंत कायम होती मात्र शिलाहार काळात यास कपर्दीद्विप, कवडीद्विप अशा नावांनीही संबोधण्यात येत असे.

शिलाहार साम्राज्याच्या पतनानंतर जेव्हा बिंबाने याच बेटावर माहिम येथे राज्य स्थापिले तेव्हा या बेटास महिकावती असे म्हटले जाऊ लागले याशिवाय बिंबस्थान असेही एक नाव प्रचलित होते. यादव सम्राट रामदेवाचा मुलगा भिमदेव याने जेव्हा याच बेटावर कब्जा मिळवला तेव्हा यास भिमपुरी या नावानेही ओळखले जात असे.

पुढे मुसलमान काळात मिरत ई अहमदी नामक ग्रंथ लिहीला गेला त्यात मानबाई हे नाव सापडते ते याच बेटाचे असे अभ्यासकांचे मत आहे व याच काळात मुंबादेवीची स्थापना झाल्याने ते संयुक्तिकही वाटते. पुढे पोर्तुगिज येथे आले तेव्हा या बेटाची रचना पाहून बॉम (उत्तम) बे (बेट) असे नाव दिले.

बुनबहिया, बुनबे अशी नावेही पोर्तुगिज काळात उल्लेखली गेलेली आढळतात. मराठ्यांच्या साधनांत बेटाचा मुंबई अथवा मुंबै असा सापडतो. पोर्तुगिज येण्याअगोदर तर या बेटावरुन वस्ती खुपच तुरळक होऊन येथे जगण्याचे प्रमाण कमी असल्याने यास कित्येक जण यमपुरीही म्हणत. ब्रिटीशांनी या बेटास बॉम्बे हेच नाव वापरले व ते अगदी मागिल काही काळापर्यंत प्रचलीत होते मात्र सध्या या बेटास मुंबई याच नावाने ओळखले जाते.