शिवथरघळ - एक आनंदवनभुवन

समर्थ रामदास स्वामींच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या व दासबोधाचा श्रीगणेशा जेथे म्हटला गेला ती महाड तालुक्यातील शिवथरघळ हे रायगड जिल्ह्यातील एक भूनंदनवनच आहे.

शिवथरघळ - एक आनंदवनभुवन
छाया - नीलांजन सासमाळ

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

जमिनीच्या थरातील मऊ माती पाण्याचा मारा व वाऱ्याने झिजली जाऊन नैसर्गिकरित्या ही घळ तयार झाली. शिवथरघळीत दिवसा गारवा व रात्री उब असते. शांतता मिळवण्यासाठी, नव्या योजना आखण्यासाठी व आत्मपरीक्षण करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींना अशा घळी योग्य का वाटत असत याचा अनुभव येथे भेट दिल्यावर आपणास येतो.

शिवथर घळीच्या उजव्या बाजूस अतिशय उंचीवरून कोसळणारा जलप्रपात आपल्या धीरगंभीर अशा ध्वनीने पर्यटकांना मंत्रमुग्ध करीत असतो. धुळ्याचे इतिहास अभ्यासक शंकरराव देव यांनी १९३० साली या दुर्गम स्थानाचा शोध लावला. सुमारे १८ मीटर लांब व २२ मीटर रुंद अशा शिवथरघळीत एका वेळी १२५ व्यक्ती बसू शकतात. 

शिवथरघळीस सुंदरमठ असेही सार्थ नाव आहे. घळीच्या माथ्यावर कसबे शिवथर हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे गाव आहे. हा भाग पूर्वी जावळीच्या खोऱ्यात अंतर्भूत होता व कसबे शिवथर येथे जावळीचे चंद्रराव मोरे यांचे वास्तव्य होते. त्यांच्या वाड्याच्या जोत्याच्या अवशेष आजही कसबे शिवथर गावात पाहावयास मिळतात. वाड्याच्या जवळच पाण्याचे एक टाके व खडकेश्वराचे मंदिर आहे.

घळीच्या माथ्यावरून वाघजाई मंदिर, कावळ्या किल्ला, वरंधा घाट, आंबेनळी घाट, गोप्या घाट व सुपेनाळ हा विस्तीर्ण परिसर दृष्टीपथात येतो. 

चाफळ येथे राममंदिर बांधून तेथे उत्सव सुरु केल्यावर समर्थांचे शिवथरघळ येथे अदमासे १० वर्षे वास्तव्य होते. घळीत डोंगराच्या जवळ सध्या मोठा सभामंडप असून बाजूच्या कपारीत गुहा आहेत. मुख्य गुहेत रामदास स्वामी दासबोध सांगत आहेत व त्यांचे शिष्य कल्याणस्वामी तो लिहीत आहेत असा प्रसंग साकारणारी मूर्ती आहे. बाजूच्या गुहेत राम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती आहेत.

सध्या येथे सुंदरमठ समितीने निवास तसेच भोजन इत्यादींची व्यवस्था केली आहे. समितीतर्फे १९८४ पासून मे महिन्यात शाळकरी मुले व नोव्हेंबरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संस्कारवर्ग सुरु असतात. माघ शुद्ध ४ ते ९ या कालावधीत दासबोध जन्मोत्सव येथे उत्साहात साजरा केला जातो.

शिवथरघळीच्या आसपास सुनेभाऊ गावातील समर्थ मंदिर, महाराष्ट्राचा मानबिंदू दुर्गदुर्गेश्वर रायगड, प्रतापगड व महाड शहर ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाड शहरावरून ३३ किलोमीटर अंतरावर असलेली शिवथरघळ मुंबईहून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून २०० किलोमीटर अंतरावर आहे. महाड येथून पूर्वेकडे शिवथरघळ येथे जाण्यास फाटा आहे व वाहने थेट घळीपर्यंत जाऊ शकतात. याशिवाय महाड भोर मार्गावरील वरंधाघाटाच्या जवळ असलेल्या माझेरी गावाहून ३ ते ४ किलोमीटर पायी प्रवास करून आपण शिवथरघळ येथे जाऊ शकतो.

पर्यटनस्थळ व तीर्थस्थळ एकाच वेळी पहावयाचे झाल्यास शिवथरघळीशिवाय दुसरा पर्याय नाही. मुंबई पुण्याहून एकाच दिवसात पाहून होण्याजोगी निसर्गरम्य शिवथरघळ ही तरुणांबरोबरच प्रौढांसही आकर्षीत करण्यासारखीच आहे.