श्रीगुंडी - मुंबईच्या कुशीत लपलेले तीर्थस्थान
मुंबईच्या प्राचिनतेचा पुरावा देणारे आणखी एक स्थळ म्हणजे वालुकेश्वर अथवा मलबार हिल परिसरातील श्रीगुंडी हे धार्मिक स्थान.

सध्याच्या राजभवन परिसरात हे प्राचिन स्थान आहे उज्याचे नाव द्रविडी छाप दाखवते. श्री गुंडी चा अर्थ मंगल छिद्र. कुंडी हा द्रविडी शब्द असून त्यास तेलुगु मध्ये गुंडे व व तामिळमध्ये कुंडी असे म्हणतात.
शिलाहार हे सुद्धा दक्षिणात्य असल्याने येथील अनेक ठिकाणांवर दक्षिणेकडील छाप दिसुन येते. या ठिकाणाचा महिमा असा आहे की हिचे दर्शन घेतल्यास अथवा प्रदक्षिणा घातल्यास पापक्षालन होते.
पुर्वी हिचे दर्शन घेण्यास दुरदुरहून लोक येत असत. अनेक ऐतिहासिक व्यक्तींनी या स्थळास भेट दिल्याचे उल्लेख आहेत. हे स्थान अतिशय अवघड जागेवर असुन पावसाळ्यात अथवा खराब हवामानात येथे जाता येत नाही मात्र सध्या हा परिसर राजभवनाच्या अखत्यारित येत असल्याने फक्त गुरुपौर्णिमेच्या पहिल्या मंगळवारी असलेल्या जत्रेपुरताच एक दिवसासाठी सामान्य नागरिकांसाठी खुला केला जातो व इतर वेळी येथे कोणीही येऊ शकत नाही.
या ठिकाणी जाण्यास पुर्वी दगडात शिड्या कोरण्यात आल्या होत्या. मात्र तुर्तास मुंबईच्या प्राचिन इतिहासाचा आणखी एक महत्त्वाचा ठेवा लोकांच्या नजरेतुन लपवण्यात आला आहे.
ब्रिटीश काळात गिरगाव चैपाटीवरुन मलबार हिल ला जाणारी एक पुरातन पायऱ्यांची वाट पहायला मिळत असल्याचा उल्लेख राईज ऑफ बॉम्बे च्या लेखकाने केला आहे व असेही म्हटले आहे कि याच प्राचिन मार्गावरुन एकेकाळी शिलाहारांच्या सैन्याने मार्गक्रमण केले असेल. मुंबईच्या प्राचिन इतिहासाच्या अशाच अनेक खाणाखुणा आधुनिक काळात गुप्त झाल्या आहेत.