वालुकेश्वर व बाणगंगा - मुंबईच्या प्राचीन ठेव्यांचे स्मारक

वालुकेश्वराबद्दल गोवींद माडगावकर आपल्या मुंबईचे वर्णन या पुस्तकात म्हणतात मुंबई बेटाच्या नैऋत्य दिशेच्या शेवटास टेकडी आहे तिस वालुकेश्वर म्हणतात. यापुढे ते म्हणतात ते विशेष नोंद घेण्यासारखे आहे काही वर्षांपुर्वी या देवळाचा पाया दिसत होता, परंतु हल्ली तो सर्व खणुन काढून त्या जागेवर मोठा बुरुज बांधत आहेत, दांडीच्या शे दिडशे हातांच्या अलीकडच्या भागात लहान सपाटी आहे तेथे सध्याचे वालुकेश्वराचे व दुसरी दहाविस देवालये आहेत.

वालुकेश्वर व बाणगंगा - मुंबईच्या प्राचीन ठेव्यांचे स्मारक

आसमंतात शे पाऊणशे धर्मशाळा आहेत, तेथे ब्राह्मणांची वस्ती आहे. मध्यभागी मोठे तळे असुन त्यास बाणगंगा असे म्हणतात. प्रस्तुत उताऱ्यावरुन अनेक गोष्टी उजेडात येतात एक तर मंदिराचे मुळ बांधकाम नष्ट करण्यात आले व तिथे नवीन बांधकाम करण्यात आले अशाच प्रकारे मुंबईतील अनेक प्राचिन बांधकामे नष्ट करण्यात येऊन त्याजागी नवीन इमारती ब्रिटीशांनी उभारल्या नसाव्यात कशावरुन? 

माडगावकरांनी लिहिल्यानुसार सध्या जे वालुकेश्वराचे मंदिर म्हणुन प्रसिद्ध आहे ते मुळचे लक्ष्मणेश्वर असुन जिर्णोद्धार करण्यात आलेले आहे मात्र मुळचे वालुकेश्वर मंदिर पोर्तुगिजांनी पुर्णतः नष्ट करुन त्यातील शिल्पे व मुर्त्या भग्न करुन टाकल्या कारण त्याकाळी वालुकेश्वर मंदिराचा भला मोठा चौथरा दृष्टीस पडत असल्याचे माडगावकरांनी लिहिले असल्यामुळे मुंबईत पोर्तुगिज अथवा इतर परकिय सत्तांच्या काळात किती धार्मिक अत्याचार झाले याची प्रचिती येते. मात्र वालुकेश्वराचे हे स्थान, येथील एखाद्या मोठ्या नगरास शोभणारा पुरातन बाणगंगा तलाव व या परिसरातील वस्ती हि आजही प्राचिन काळातील एका नगराला साजेशी अशीच आहे. या वस्तीच्या संदर्भात माडगावकरांनी जे उद्गार काढले आहेत की या परिसरात ब्राह्मणांची वस्ती आहे त्यास दुजोरा शिलाहारकालिन एका दानपत्रात मिळतो ज्यात पुरी येथील नन्नपैय या ब्राह्मणाचा उल्लेख आहे व हा नन्नपैय याच परिसरात राहणारा असावा.

वालुकेश्वराबद्दल जुन्या साधनांत पुढीलप्रमाणे माहिती आहे वालुकेश्वर म्हणजे वाळूचा ईश्वर अर्थात लिंग. हे लिंग श्रीरामाने स्थापित केले. राम जेव्हा आयोध्येवरुन लंकेस जाण्यास लक्ष्मणासहित निघाले तेव्हा वालुकेश्वराच्या दांडीवर आले. रामाने पुजेकरिता लक्ष्मणाने काशिवरुन शिवलिंग आणावे अशी इच्छा व्यक्त केली मात्र राम येथे असताना लक्ष्मणास एथे येण्यास उशिर झाल्याने रामाने वाळुचेच लिंग तयार करुन पुजा केली व तिथेच त्याची स्थापना केली त्यामुळे त्यास वालुकेश्वर म्हणु लागले व कालांतराने काशीहून लक्ष्मणही एक लिंग घेऊन आला व तेही तेथेच स्थापुन त्यास लक्ष्मणेश्वर असे नाव दिले. रामास तहान लागल्याने त्याने बाण मारुन पाणी काढले, ते पाणी बाणाने काढल्यामुळे त्यास बाणतिर्थ, बाणगंगा किंवा पाताळगंगा असेही म्हटले जाते. 

हे झाले पौराणिक वर्णन, मात्र या मंदिराचे शिलाहारकालिन बांधकाम हे सन ११२७ साली झाले व ते लक्ष्मण प्रभु या शिलाहार दरबारातील मंत्र्याने केले मात्र हे मुळचे शिवलिंग पोर्तुगिजांच्या कारकिर्दीत फोडले गेले व सोबत मंदिरही धाराशयी करण्यात आले मात्र आजही हा परिसर आपल्या प्राचिन खुणा सांभाळून आहे. तुर्तास दिसणाऱ्या मंदिराचा जिर्णोद्धार रामा कामती याने सन १७१५ साली केला. वालुकेश्वर मंदिर परिसरात फेरफटका मारल्यास हळूहळू मुंबईच्या प्राचिनतेचे गुढ हळू हळू उलगडत जाते व मुंबई हिच प्राचिन काळातील पुरी हे पटू लागते. मधल्या काळात हा विशाल बाणगंगा तलाव स्वच्छ करण्यात आला तेव्हा अनेक प्राचिन मुर्त्या या तलावातुन बाहेर आल्या ज्या मध्ययुगात पोर्तुगिजांच्या रोषास बळी पडल्या होत्या. यापैकी काही महत्त्वाची शिल्पे म्हणजे संभाव्य कपर्दी शिलाहाराची मुर्ती, शिलाहारकालिन राजा आपल्या पुत्रास खेळवणारी मुर्ती व एका परदेशी प्रवाशाची मुर्ती जिच्यावर सांकेतिक लिपीत काही वाक्ये कोरलेली आहेत.

प्राचिन काळी किंवा आजही शिवमंदिराच्या आसपास उत्तरक्रिया केल्या जात असत त्यामुळे अनेक विरगळी अथवा स्मारके ही शिवमंदिराच्या आसपासच आढळतात त्याप्रकारे वालुकेश्वराच्या आसमंतात आढळलेली हि सर्व शिल्पे हि तत्कालिन शिलाहार सम्राटांची स्मारके वा समाध्या असाव्यात व कालांतराने परकिय राजवटींच्या हल्ल्यामध्ये हे अवशेष नष्ट करण्यात आले असावेत. मुंबईच्या आसमंतात शोध घेतल्यास आणखी बरीच रहस्ये बाहेर पडू शकतात मात्र याकरिता सकारात्मक निर्धाराची आवश्यकता आहे. वालुकेश्वर परिसर हा शिलाहारांच्या धार्मिक कार्याचे ठिकाण होते व आजही येथील वातावरण आपल्याला त्याच काळात घेऊन जाते. दिराईज ऑफ बॉम्बे या पुस्तकाचा लेखक एडवर्ड समर्पकरित्या म्हणतो

“Walkeshwar unto this day- Some Parts of Walkeshwar still conserve the calm of those old shilahar days- He who leaving behind bungalows of a modern century) directs his steps to the very foreshore will find a little colony of sanyasis) dwelling amid the tombs of brethren who have already passed beyond the bourne and whose spirits call unto the living in the soft wash of the sea and the sough of the wind in old trees.”