मुंबईस पुण्याला जोडणाऱ्या रेल्वेची कहाणी

भारतातील पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई ते ठाणे ह्या मार्गावर धावली. १८५४ला रेल्वे कल्याणपर्यंत व पुढे १८५६ला खोपोली पर्यंत आली. त्याचदरम्यान पुणे ते खंडाळा रेल्वेमार्गाचे बांधकाम सुरु करण्यात आले. १५ जून १८५८ रोजी ह्या मार्गाचे उद्घाटन झाले. - दीपक पटेकर

मुंबईस पुण्याला जोडणाऱ्या रेल्वेची कहाणी

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

प्राचीन भारतातील व्यापारी मार्गांतील एक महत्वाचा घाट म्हणजे बोरघाट. ह्या घाटच्या माथ्यावर लोणावळा-खंडाळा ही शहरे वसली आहेत. किंबहुना ह्या घाटमार्गा मुळेच ह्या लहान गावांना शहराचे रुप मिळाले आहे. ह्या घाटमार्गामुळे ह्या परिसरात अनेक किल्ले, महत्वाच्या लेण्या आढळतात.

१८२६ पूर्वी बोरघाटातील वाहतूक बैलगाडी, घोडागाडी, पालखी ह्यांनी होत असे. १८२६ साली कॅप्टन ह्युगच्या (Captain Hughe) देखरेखीखाली येथे पक्क्या रस्त्याचे बांधकाम सुरु झाले. १९ जानेवारी १८३० मध्ये हा रस्ता वाहतुकी साठी खुला करण्यात आला. पण , ह्या रस्त्याचे औपचारीक उद्घाटन १० नोव्हेंबर १९३० रोजी त्यावेळचे मुंबईचे इंग्रज गव्हर्नर जॉन माल्कम (Sir Jhon Malcolm) यांच्या हस्ते झाले.

भारतातील पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई ते ठाणे ह्या मार्गावर धावली. १८५४ला रेल्वे कल्याणपर्यंत व पुढे १८५६ला खोपोली पर्यंत आली. त्याचदरम्यान पुणे ते खंडाळा रेल्वेमार्गाचे बांधकाम सुरु करण्यात आले. १५ जून १८५८ रोजी ह्या मार्गाचे उद्घाटन झाले.

१८५८ साली मुंबईतील भायखळा स्थानकावरुन निघालेली आगगाडी दादर - माहिम - कुर्ला - भांडुप - ठाणे - कल्याण - बदलापुर - नेरळ ह्या स्थानकावर थांबून खोपोलीस येत असे. (तेव्हा कर्जत स्थानक नव्हते.) हा मुंबई ते खोपोली प्रवास ३ तास ४५ मिनिटांचा असे. खोपोलीतून बोरघाटामार्गे खंडाळ्यास जाण्यासाठी 'ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनी' ने वाहतूकी साठी पालखी, गाडी व तट्टू असे तीन पर्याय प्रवाश्यांसाठी उपलब्ध करुन दिले होते. ह्यासाठी वेगवेगळे दर आकारले होते.

ह्या प्रवाशांना खंडाळ्यास पोहचण्यासाठी २ तास ४५ मिनिटांचा वेळ उपलब्ध असे. खंडाळ्याहून आगगाडी निघाल्यानंतर २ तास २० मिनिटांनी पुण्यास पोहचत असे. अश्या मुंबई-पुणे गाड्या दिवसातून ३ वेळा सुटत असे

बोरघाटातून रेल्वेमार्ग बांधण्याचा विचार कंपनी १८५० पासून करत होती. १८५२ ते १८५५ साली घाट परिसराच्या सर्वेक्षणाचे काम सुरु होते. प्रत्यक्षात रेल्वेमार्गावरील काम जानेवारी १८५६ला सुरु झाले. कर्जतच्या पुढे पळसदरी ते खंडाळा अश्या नव्या नियोजीत मार्गावर काम सुरु झाले. सुरुवातीला हे काम फॅविएल ह्या इसमाकडे सोपवले होते. १८५९ साली फॅविएलने हे काम अर्धवट सोडले. त्यानंतरचे काम सॉलोमन ट्रेडवेल (Solomon Tredwell) ह्या ब्रिटिश कंत्राटदाराकडे देण्यास आले. कंपनीचा मुख्य अभियंता जेम्स बर्कले (James John Berkley) हा सुरुवाती पासून ह्या कामात सहभागी होता. नोव्हेबर १८५९ मध्ये ट्रेडवेलने अपुरे काम पूर्ण करण्यासाठी घेतले, पण ह्याच काळात खंडाळा परिसरात कॉलराची भयानक साथ पसरली होती. ह्यातच साथीची लागन होऊन ट्रेडवेलचे ३० नोव्हेंबर १८५९ रोजी खंडाळा येथे निधन झाले. ह्या कॉलराचा परिणाम कामगारांवरही झाला होता.

ॲडमसन (Swainson Adamson) व क्लाउसर (George Louis Clowser) ह्या ट्रेडवेलच्या सहकाऱ्यांनी हे काम चालू ठेवले .जेम्स बेर्कलेही त्यांच्या सोबत होता. येथे सुरुवातीला २५००० कामगार काम करत होते , पुढे १८६१ साली ही संख्या ४२ हजारावर पोहचली.

येथील डोंगरातील खडक फोडून बोगदे खणण्याचे काम १८७०० कामगार ७७ बिट्रिश तंत्रज्ञांच्या देखरेखीखाली करत होते.

अडमसन व क्लाउसर ह्या उत्साही कंत्राटदारांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बोगदे, पेल, भराव, बांधकाम हे कामे पूर्ण होऊन १८६१ साली रेल्वेचे रुळ टाकण्यास सुरुवात झाली व पुढिल वर्षी हेही काम पुर्ण झाले. हे काम पुर्ण होण्यास सव्वासात वर्षे लागली. १४ मार्च १८६३ रोजी पहिले रेल्वे इंजिन ह्या मार्गावर धावले. पण ह्याचे औपचारीक उद्घाटन ३० एप्रिल १८६३ रोजी मुंबईच्या गव्हर्नरने केले.

घाटमार्ग सुरु होऊनही पर्जन्यामुळे नुकसान होत होते. तेथे सुधारणा करुन मे १८६३ ला ह्या मार्गावरुन प्रथम मालगाड्या धावू लागल्या.

खंडाळ्याच्या जवळच्या मंकी हिल पासुन पुढे खंडाळा स्थानकापर्यंतची चढण ही अतिशय अवघड होती.

घाटातील पहिला अपघात हा २६ जून १८६५ रोजी झाला. खंडाळ्याहुन निघालेली गाडी आवाक्याबाहेर जाऊन अतिवेगाने ती रिव्हर्सिंग स्टेशनवर आदळून पलिकडे टेकडीवर कोसळली. ह्यात १८ भारतीय प्रवासी दगावले. ह्या अपघायाचे कारण असे की पहाटे रुळावर दव पडून गाडीची चाके घसरत गेली.

१९२९ साला पर्यंत घाटाखालून येणारी गाडी सरळ न जाता रिव्हर्सिंग स्टेशनवर जात असे. ( रिव्हर्सिंग स्टेशन सध्याच्या अमृतांजन पुलाच्या वरील जागेवर होते , येथून सध्या खंडाळ्यातून येणारा रस्ता असून जो पुढे द्रुतगती मार्गास मिळतो.) रिव्हर्सिंग स्टेशनवर गाडीचे इंजिन वळवून ते गाडीच्या मागच्या बाजूस जोडले जात असे. सध्याच्या द्रुतगती मार्गाच्या बोगद्यातून रेल्वेमार्ग होता व तेथुन गाडी खंडाळ्यास येत असे. पुढे १९३०-३१ साली २५ व २६ क्रमांकाचे बोगदे खोदण्यात आले. ह्यामुळे गाडी थेट खंडाळ्याला येऊ लागली. ह्यापुर्वी गाड्या कोळश्यावर चालत असे , १९२९ पासुन गाड्या विजेवर चालू लागल्या.

लोणावळा स्थानक १९०७ साली सुरु करण्यात आले. त्यामुळे ह्या मार्गावरील सर्व गाड्या लोणावळा स्थानकावर थांबू लागल्या.

- दीपक पटेकर