किल्ले रायगडाचे टकमक टोक

रायगड किल्ल्यात महादरवाजामार्गे प्रवेश करून आपण जेव्हा गडाच्या माथ्यावर पोहोचतो तेथून डाव्या दिशेहून टकमक टोकाकडे जाण्याचा मार्ग आहे.

किल्ले रायगडाचे टकमक टोक
किल्ले रायगडाचे टकमक टोक

कुठलाही किल्ला पाहताना त्यावरील स्थळांचे दोन मुख्य गटांत वर्गीकरण होते व यातील पहिला गट म्हणजे मानवनिर्मित स्थळे तर दुसरा गट म्हणजे निसर्गनिर्मित स्थळे.

स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर असंख्य अशी मानवनिर्मित व निसर्गनिर्मित स्थळे आहेत व ही स्थळे स्वतःचा असा इतिहास जपून आहेत.

रायगड हा किल्ला निसर्गतःच अतिशय भव्य, उंच व दुर्गम असा असल्याने या किल्ल्यावरील निसर्गनिर्मित स्थळे सुद्धा दुर्गमच आहेत. किल्ल्यावरील साहसाच्या दृष्टीने प्रसिद्ध अशी जी स्थळे आहेत त्यामध्ये टकमक टोक, भवानी टोक आणि वाघ दरवाजा ही विशेष प्रसिद्ध आहेत व यापैकी टकमक टोक या स्थळांविषयी आपण या लेखाच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करू.

समुद्रसपाटीपासून अदमासे ८८० मीटर उंच अशा रायगड किल्ल्यास टकमक, हिरकणी, भवानी आणि श्रीगोंदे अशी जी चार टोके आहेत त्यापैकी टकमक हे वायव्य दिशेस असणारे टोक असून या टोकाची उंची समुद्रासपाटीपासून सरासरी ८२० मीटर आहे.

रायगड किल्ल्यात महादरवाजामार्गे प्रवेश करून आपण जेव्हा गडाच्या माथ्यावर पोहोचतो तेथून डाव्या दिशेहून टकमक टोकाकडे जाण्याचा मार्ग आहे. महादरवाजाची तटबंदी ही डाव्या बाजूने थेट टकमक टोकाच्या खालच्या अंगापर्यंत जाऊन भिडलेली आहे मात्र टकमक टोकास निसर्गतः संरक्षण असल्याने टोकास तटबंदी करण्याची गरजच नव्हती कारण हा कडा माथ्यापासून पायथ्यापर्यंत वक्राकृती रित्या असून येथून खाली उतरणे अथवा वर चढणे शक्यच नाही.

टकमक टोक हे रायगडाचे एवढे उठावदार टोक आहे की कित्येक मैलांवरून रायगडाकडे पाहिल्यास टकमक टोक लगेच दिसून येते व रायगड किल्ल्यास पूर्वी नंदादीप असे जे नाव होते त्या नंदादीपाचे टोक म्हणजेच टकमक टोक कारण टकमक टोकामुळे रायगडाचा आकार दुरून खरोखर एखाद्या नंदादीप्रमाणेच दिसून येतो.

टकमक टोकास टकमक हे नाव का मिळाले असावे याचा विचार केला असता टकमक या शब्दाचा अर्थ जाणून घ्यावा लागतो. टकमक म्हणजे ज्या ठिकाणी नजर खिळते असे काही, अर्थात कुठली अशी गोष्ट जी पाहताना नजर एकाच ठिकाणी स्थिर होते आणि संमोहित व्हायला होते आणि टकमक टोकावर गेल्यावर खरोखर हा अनुभव येतो त्यामुळे या टोकाचे टकमक हे नाव सार्थ ठरते. 

टकमक टोक हे दक्षिण दिशेहून उत्तर दिशेकडे जाते व दक्षिणेकडून उत्तरेकडे असा या टोकावर जाण्याचा मार्ग आहे. हा मार्ग सुरुवातीस रुंद व पुढे पुढे अरुंद होत जातो. रस्त्यात दोन्ही बाजूस भीषण असे कडे व सह्याद्रीचा घोंघावणारा पाहून हात पाय थरथरू लागतात. मार्गात सुरक्षिततेसाठी लोखंडी कठडे असले तरी कुठे पाय सरकला तर धडगत नाही असे वाटत राहते. कड्याच्या अगदी टोकाला कठड्यांच्या खाली एक छोटी जागा असून तिथे काही मोठे खडक आहेत व या खडकांचा आधार घेऊन कड्याचे व समोरील आसमंताचे निरीक्षण करता येते.

टकमक टोकास टकमक कडा असेही नाव असून इतिहासात याचा कडेलोटासाठी वापर केला गेल्याची माहिती मिळते मात्र शिवकालात या कड्याचा कडेलोटासाठी वापर केल्याचा उल्लेख सहसा आढळत नसला तरी छत्रपती संभाजी महाराजांनी काही राजद्रोही फितुरांना येथून कडेलोटाची शिक्षा फर्मावली असल्याची माहिती आढळते.

टकमक टोकाविषयी एक दंतकथा सुद्धा प्रसिद्ध आहे व ती कथा म्हणजे एकेदिवशी छत्रपती शिवाजी महाराज दुपारी गडावर फेरफटका मारण्यासाठी आले असता टकमक टोकावर उभे होते. यांच्यासहित काही माणसे सुद्धा होती. दुपारची वेळ असल्याने एकाने महाराजांच्या मस्तकी छत्र धरले मात्र कड्यावर सोसाट्याचा वारा व ते छत्र सुद्धा वजनदार असल्याने तो वारा त्या छत्रात शिरलं आणि पाहता पाहता तो माणूस छत्रासहित वर उडाला. 

यावेळी महाराजांनी त्यास छत्री न सोडण्याची सूचना केली व त्या मनुष्याने छत्री घट्ट पकडून ठेवली. हळूहळू वाऱ्याचा वेग कमी झाला आणि तो माणूस छत्रीसहित एका ठिकाणी सुखरूप उतरला. माणूस ज्या ठिकाणी उतरला त्या ठिकाणी निजामपूर नामक एक गाव आहे मात्र या घटनेनंतर या गावास छत्री निजामपूर या नावाने ओळखले गेले. 

ही दंतकथा किती खरी हे माहित नाही पण या टोकावरील प्रचंड वारा पाहता साधी छत्री घेऊन जरी माणूस उभा राहिला तर हा वारा त्यास छत्रीसहित वर उचलेल यात शंका नाही. कारण टकमक टोक हे गडाच्या वायव्य दिशेस आहे व वायव्य दिशा ही वायूची दिशा असल्याने साहजिकच या ठिकाणी वायूचे साम्राज्य आहे.

तेव्हा असे हे रायगड किल्ल्यावरील प्रसिद्ध स्थळ असलेले टकमक टोक याची देही याची डोळा पाहणे स्वर्गीय अनुभव असतो मात्र हे टोक पाहताना सुरक्षेची काळजी नक्की घ्या.