पाताळेश्वर लेणी - पुण्याचा प्राचीन वारसा

पुण्यात असे एक विलक्षण स्थळ आहे जे कदाचित पुण्यातील सर्वात जुने प्रेक्षणीय स्थळ म्हणावे लागेल ते स्थळ म्हणजेच पाताळेश्वर.

पाताळेश्वर लेणी - पुण्याचा प्राचीन वारसा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात नानाविध प्रेक्षणीय स्थळे आहेत. यामध्ये प्राचीन,मध्ययुगीन आणि आधुनिक पर्यटन स्थळांचा समावेश होतो. मात्र पुण्यात असे एक विलक्षण स्थळ आहे जे कदाचित पुण्यातील सर्वात जुने प्रेक्षणीय स्थळ म्हणावे लागेल. ते स्थळ म्हणजेच पाताळेश्वर. पुण्याच्या डेक्कन परिसरातील जंगली महाराज रस्त्यावरच पाताळेश्वर हे प्राचीन स्थळ आहे. पुण्यासारख्या महानगराच्या गजबजाटात इतके शांत स्थळ असेल अशी कल्पना नवख्या माणसास अगदी या स्थळाच्या बाजूने गेला तरी येऊ शकत नाही. 

म्हणावयास पाताळेश्वर हे मंदिरही आहे व लेणीसमूह सुद्धा. पूर्वी या संपूर्ण परिसरास भांबुर्डा या नावाने ओळखत व हा परिसर अतिशय दाट अरण्याने वेढला होता. त्याकाळी पुणे शहर व भांबुर्डा या दोहोंच्या मधून मुठा नदी जात असल्याने भांबुर्डा हे एक वेगळे गाव होते मात्र आधुनिक युगात हा परिसरात पुणे शहराचाच एक भाग झाला. पूर्वी भांबुर्डे हे गाव लाकडीपूल, लॉईडपूल व दगडी पूल अशा तीन पुलांनी पुण्यास जोडले जात होते. पूर्वी येथे दर बुधवारी व रविवारी गुरांचा मोठा बाजार भरत असे याशिवाय अतिशय सुंदर निसर्ग व वातावरण असल्याने अनेक ब्रिटिश लोकांचे बंगले याच परिसरात होते. याच भांबुर्ड्यात सपाट खडकामध्ये खोदकाम करून पाताळेश्वर या लेण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. जुन्या काळी पाताळेश्वरास पांचाळेश्वर असेही नाव असल्याचे उल्लेख मिळतात. 

सपाट खडकाळ जमीन खोदून या लेण्या तयार करण्यात आल्यामुळे येथे जाणाऱ्याला काही पायऱ्या खाली उतरून या लेण्यांत प्रवेश करावा लागतो. लेण्यांचा परिसर विस्तीर्ण व गोलाकार आहे. पाताळेश्वरच्या शैलगृहाचे संपूर्ण खोदकाम ३०.५० मीटर रुंद व ४८.८० मीटर खोल आहे. चौरसाकृती प्रांगणाच्या मधोमध १२ खांबांवर उभारलेलं उतरत्या छपराचा नंदी मंडप असून त्यामधील नंदी अतिशय भव्य आकाराचा आहे. नंदीमंडपासमोर आयताकृती मंडप असून एकूण आठ स्तंभ रांगा आहेत. मंडपाच्या मागे एकाला एक जोडलेली अशी तीन गर्भगृहे येतात, यातील मध्यभागी असणाऱ्या गर्भगृहात शिवलिंग स्थापित असून मंडपाच्या बाजूस असणाऱ्या भिंतींवर शैव व वैष्णव संप्रदायातील दृश्ये कोरलेली आहेत. 

पाताळेश्वर या लेण्यांची निर्मिती कुठल्या राजवंशाच्या आश्रयाखाली झाली याची ठोस माहिती मिळू शकली नसली तरी लेण्यांची स्थापत्यशैली राष्ट्रकूट स्थापथ्यशैलीसोबत मेळ खाते याशिवाय उत्तर कोकणचा शिलाहार राजा अपराजित याने आपल्या राज्याचा पुण्यापर्यंत विस्तार केला होता त्यावेळी त्याने हे लेणे बांधले असावे असाही एक समज आहे कारण शिलाहार हे राष्ट्रकूट घराण्याचे एकनिष्ठ मांडलिक होते. पाताळेश्वर लेण्यांची रचना अंबेजोगाई येथील लेण्यांप्रमाणे असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

पाताळेश्वर लेण्यांचा परिसर निरव शांततेचा अनुभव मिळवून देणारा असून येथे काही काळ व्यतीत केल्यावर मनास एक वेगळाच आनंद मिळून जातो. बाजूलाच असलेले जंगली महाराजांचे निसर्गरम्य मंदिरही अतिशय प्रेक्षणीय असून पुण्यास भेट देणाऱ्या पर्यटकांनी आवर्जून पाहावेच असे हे पर्यटन स्थळ आहे.