ठग - स्वातंत्र्यपूर्व काळातील एक उपद्रवी समूह
ठग हा शब्द संस्कृत भाषेतील स्थग या शब्दापासून निर्माण झाला आहे. आपली ओळख जगाच्या नजरेत पूर्णतः गुप्त ठेवून गुन्हा करणे हे ठगांचे मुख्य वैशिट्य.

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
ठग हा शब्द आजही आपल्या अनेकदा कानावर येत असतो. बातम्यांमध्ये 'एखाद्याने दुसऱ्यास ठगवले' अशा ओळी वाचावयास अथवा ऐकावयास मिळत असतात. मात्र या काळातील ठगांचा पूर्वीच्या ठगांशी दुरयान्वये संबंध नसतो कारण जुन्या काळात 'ठग' ही एका विशिष्ट पद्धतीने कार्य करणाऱ्या लुटारूंची टोळी होती.
ठग हा शब्द संस्कृत भाषेतील स्थग या शब्दापासून निर्माण झाला आहे. आपली ओळख जगाच्या नजरेत पूर्णतः गुप्त ठेवून गुन्हा करणे हे ठगांचे मुख्य वैशिट्य व ठग हे एकट्याने नव्हे तर समूहाने गुन्हा करीत. गुन्ह्याचा प्रमुख उद्देश हा लूट मिळवणे हा असे मात्र लूट केल्यावर पुरावे मागे राहून आपली खरी ओळख कळू नये यासाठी ठग हे आपल्या गुन्ह्यात हिंसेचा वापर करण्यात आघाडीवर होते.
ठग ही एकाअर्थी एक प्रथा होती व ती कुणालाही करता येत नसे. यासाठी प्रथम दीक्षा घ्यावी लागत असे. सर्व ठग हे कालीचे भक्त असायचे. ठगांच्या समूहात प्रवेश करण्यासाठी चेल्यास गुरूच्या मार्गदर्शनाखाली देवीस प्रसाद द्यावा लागत असे व प्रसाद दिल्यावर ठगास दीक्षा मिळत असे. एकदा की ठग म्हणून कारकीर्दीस सुरुवात केली तर अगदी मरेपर्यंत ठग म्हणूनच राहिले पाहिजे असा नियम असे. ठगांमध्ये सर्व जाती व धर्माचे लोक प्रवेश घेऊ शकत मात्र देवीची उपासना करणे त्यांच्यासाठी अनिवार्य असे.
ठगांच्या सामूहिक मोहीमा होत यावेळी मोहीम सुरु करण्यापूर्वी मुहूर्त, शकुन, अपशकुन इत्यादींची ते बारकाव्याने पाहणी करीत व जर त्यांच्या दृष्टीने चांगला मुहूर्त नसेल तर ते मोहिमेवर जात नसत. कधी कधी मुहूर्त काढूनही मोहीम फसली तर ते मुहूर्तच चुकीचा होता असे समजत यावरून शकुन अपशकुनावर व नशिबावर त्यांचा किती विश्वास होता हे समजून येते.
ठग लोकांची एक सांकेतिक भाषा असे व खुणाही सांकेतिकच असत. वेगवेगळे वेष परिधान करून बाहेर पडावयाचे आणि एकमेकांपासून थोडे लांब राहून सावज शोधून सांकेतिक भाषेत किंवा खुणा करून कशा प्रकारे कार्य करायचे याची योजना ते सुरु करीत.
ठग हे सावधरीत्या कार्य करीत असल्याने ते दरोडेखोरांसारखे समूहास लुटत नसत मात्र एकटा दुकटा सावज पाहून आपले कार्य सुरु करत. एखादा एकटा वाटसरू रस्त्यात गाठून सहप्रवासी म्हणून त्याच्यासोबत चालू लागत आणि गप्पा मारीत मारीत प्रवास करीत असताना एखादी निर्मनुष्य जागा म्हणजे रान, ओढा किंवा विहिर सापडली की त्वरित त्या प्रवाशाच्या गळ्यास रुमालाचा फास घालून एवढ्या जोराने ओढत की तो प्रवासी लगेच मरून पडत असे.
यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी ते खड्डा तयार करून ते प्रेत पुरून टाकत व त्यावर काटेरी झाडे व झुडुपे टाकत जेणेकरून कोल्हे व कुत्रे ते प्रेत उकरून काढू नयेत. अशा प्रकारे मारलेल्या सावजाचे सर्व ऐवज ताब्यात घेऊन ठग पसार होत असत व दुसऱ्या मोहिमेपर्यंत आपल्या गावात येऊन एक सामान्य आयुष्य जगण्याची सुरुवात करीत. ठग हे आपल्या गावात व गावाच्या परिसरात बिलकुल मोहीम करीत नसत कारण अशाने त्यांची ओळख कळणे सोपे होणार होते त्यामुळे गावात एखादा छोटा व्यवसाय फक्त नावाला ते करीत मात्र मुख्य उत्पन्न हे ठगीचेच असे.
ठग हे केव्हाकेव्हा कुठल्या यात्रेतही समूह समूहाने घुसून आपले कार्य करीत असत. ठगांचा उपद्रव पुढे जास्तच वाढू लागल्यावर ब्रिटिशांनी ठगांच्या बंदोबस्तासाठी एक विशेष खाते तयार केले व त्याचे नेतृत्व विल्यम बेंटिक या अधिकाऱ्याकडे दिले. या खात्याने ठगांची माहिती काढून एक एक करून त्यांना पकडण्यास सुरुवात केली व त्यांच्याकडून टोळी प्रमुख व सदस्य यांची माहिती काढून त्यांना कैद करून त्यांच्या गुन्ह्यानुसार फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा देणे सुरु केले.
पकडलेल्या ठगांनी जर टोळीबद्दल चांगली माहिती दिली तर त्यांना माफीचे साक्षीदार करून त्यांना बक्षीस देऊन सोडले जात असे व अशा रीतीने ठगांचे समूह एक एक करत नाहीसे झाले व ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या अडचणींमुळे ही प्रथा पुढे कायमचीच बंद पडून वाचलेले ठग सामान्य आयुष्य स्वीकारून आपली उपजीविका करू लागले.