रहस्यमयी शिवगुंफा - आंब्रड कुडाळ

शिवगुंफा हे साक्षात नवनाथांचे वास्तव्याचे स्थान असल्याने व या ठिकाणी प्राचीन ऋषीमुनींनी तपश्चर्या केल्याने हे स्थळ अतिशय पवित्र मानले जाते.

रहस्यमयी शिवगुंफा - आंब्रड कुडाळ

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात एक प्राचीन रहस्य आहे व ते म्हणजे रहस्यमयी शिवगुंफा.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील आंब्रड या ठिकाणी ही रहस्यमयी व प्राचीन शिवगुंफा आहे.

आंब्रड गावाच्या शेजारी असलेल्या एका वनाच्छादित टेकडीवर ही शिवगुंफा असून समुद्रसपाटीपासून १३५ मीटर उंच टेकडीवर चढण्यासाठी जांभ्या दगडात पायऱ्या बांधल्या आहेत.  टेकडीच्या माथ्यावर आल्यावर आपल्याला शिवगुंफा मंदिर ट्रस्टचे कार्यालय व इतर काही घरे दिसून येतात.

माथ्यावर ठिकाणी वाघोबा मंदिर आहे. मंदिरामध्ये मध्यभागी एक शिवलिंग असून समोर वाघोबाची मूर्ती दिसून येते.

येथून काही अंतर पुढे गेल्यावर गुहेकडे जाण्याचा मार्ग सुरु होतो.

वाटेत एक छोटेखानी मंदिर दिसून येते व या मंदिरात पादुका दिसून येतात.

पुढे एके ठिकाणी ठिकाणी शिवगुंफेचे प्रवेशद्वार दिसून येते. गुंफेचे प्रवेशद्वार जांभ्या खडकातील बांधकामाने सुरक्षित केलेले दिसून येते.

प्रवेशद्वारावरील आदेश गुरुदेव हे शब्द या स्थळावरील नाथपंथाचा प्रभाव दर्शवितात.

पृथ्वीच्या गर्भात असलेली ही शिवगुंफा पाहून प्रथमदर्शनी आश्चर्यचकित व्हायला होते. गुंफेमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस एक ध्यानस्थ मुद्रेतील नाथपंथीय योगींची मूर्ती दिसून येते.

शिवगुंफेस देवभूमी असे म्हटले जाते कारण या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी नवनाथांचे वास्तव्य होते.

मधल्या काळात या शिवगुंफेचा इतिहास अज्ञात होता मात्र १९८५ साली राऊळ महाराज यांना झालेल्या दृष्टांतामुळे ही गुंफा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. राऊळ महाराजांना झालेल्या दृष्टान्तानंतर येथे उत्खनन करण्यात आले व तब्बल २०० मीटर लांब अशी शिवगुंफा जगाच्या नजरेत आली.

या संपूर्ण गुहेचे एकूण सात भाग आहेत असे म्हटले जाते. सुरुवातीच्या उत्खननात गुहेचा एकच भाग उजेडात आला मात्र कालांतराने गुहेचे इतर भाग सुद्धा उजेडात आले.

शिवगुंफा हे साक्षात नवनाथांचे वास्तव्याचे स्थान असल्याने व या ठिकाणी प्राचीन ऋषीमुनींनी तपश्चर्या केल्याने हे स्थळ अतिशय पवित्र मानले जाते.

शिवगुंफेचा अंतर्भाग विस्तीर्ण असून आत जाणारे अनेक मार्ग येथे दिसून येतात. भाविकांना अंधारात दिसावे यासाठी दिव्यांची सोय करण्यात आली आहे.

अंतर्भगात आधारासाठी काही स्तंभ सुद्धा निर्माण केल्याचे दिसून येतात यावरून ही गुहा नैसर्गिक व यातील काही काम मानवनिर्मित आहे असे जाणवते.

गुहेच्या अंतर्भागात जसजसे जावे तसतसा अंतर्भाग विस्तीर्ण होऊ लागतो व जमिनीच्या गर्भातील हे रहस्य पाहून आश्चर्यचकित व्हायला होते.

गुहेच्या अंतर्भागात वटवाघळांचे वास्तव्य असून या प्रवासात त्यांचे अस्तित्व जाणवून येते.

सदर गुहेचे उत्खनन १९८५ साली झाले असले तरी मूळ गुहा अजून मोठी असून अजून उत्खनन केल्यास संपूर्ण गुहा प्रकाशझोतात येईल असे म्हटले जाते.

२००६ साली येथे श्री सीताराम लक्ष्मण हनुमान आणि शिव पंचायतन प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला व त्याची माहिती असलेला शिलालेख येथे दिसून येतो.

यावेळी भारताच्या विविध भागातून ९० जगद्गुरू येथे आले होते यावरून या शिवगुंफेचे धार्मिक महत्व लक्षात येते.

ही रहस्यमयी शिवगुंफा एवढी विस्तीर्ण आहे की तिला अंतच नसावा असे काही क्षण वाटते.

शिवगुंफेत शिवलिंग, पाषाणरुपी शनिदेव मंदिर, ब्रह्मदेव, नवनाथ, रामयज्ञ, याग व शेषनाग आदी तीर्थ आहेत.

निसर्गाचा अद्भुत चमत्कार असलेली ही शिवगुंफा पाहण्यासाठी देश विदेशातून भाविक, अभ्यासक, संशोधक येत असतात.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपास आला आहे व या जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारी रहस्यमयी शिवगुंफा ही प्रत्येकाने एकदातरी पाहायलाच हवी.