रायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प

दुतर्फा अशा या बाजारपेठेच्या पश्चिम दिशेस असलेल्या दुकानांच्या रांगेत एका ठिकाणी एक अद्भुत शिल्प दृष्टीस पडते व ते शिल्प म्हणजे एक नागशिल्प.

रायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

समस्त शिवप्रेमींचे श्रद्धास्थान व स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड महाराष्ट्रातील अथवा भारतातीलच नव्हे तर एक जागतिक दर्जाचे स्थळ आहे त्यामुळे रायगड किल्ल्याचे दर्शन घेण्याकरिता दूरदूरहून लोक येत असतात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला हे राजधानीचे स्थळ म्हणून निवडण्याचे कारण म्हणजे त्याची उत्तुंग उंची आणि नैसर्गिक संरक्षणव्यवस्था हे होतेच मात्र या शिवाय रायगड किल्ल्याचा आकार सुद्धा विस्तीर्ण असल्याने राजधानीस आवश्यक अशा सर्व वास्तूंची निर्मिती या ठिकाणी करता येणे शक्य होते.

रायगड किल्ल्यावर राजधानीस साजेशा अशा ज्या असंख्य वास्तू आहेत त्यापैकी एक वास्तू म्हणजे किल्ल्यावरील बाजारपेठ. रायगडावरील बाजारपेठ ही नगारखानाच्या उत्तरेस असून दोन्ही बाजूना दुकाने व मध्ये एक प्रशस्त मार्ग अशी या बाजारपेठेची रचना आहे.

बाजारपेठेत एका बाजूस २२ व दुसऱ्या बाजूस २२ अशी एकूण ४४ दुकाने ती एकमेकांना एका भिंतीने जोडली गेली आहेत. सध्या या दुकानांची जोती, पायऱ्या व भिंती दिसून येतात आणि अनेक पर्यटक रायगड किल्ल्याच्या दर्शनास आल्यावर ही बाजारपेठ हमखास पाहतात. 

दुर्तफा अशा या ४४ दुकानांच्या मध्ये जो प्रशस्त मार्ग आहे तो अदमासे ४० फूट रुंद आणि ७०० फूट लांब आहे.  रायगडाच्या बाजारपेठेचे वैशिट्य म्हणजे या दुकानांच्या ओट्यांची उंची अशी ठेवली गेली होती की प्रसंगी येथे घोड्यावर बसूनही खरेदी करता यावी.

दुतर्फा अशा या बाजारपेठेच्या पश्चिम दिशेस असलेल्या दुकानांच्या रांगेत एका ठिकाणी एक अद्भुत शिल्प दृष्टीस पडते व ते शिल्प म्हणजे एक नागशिल्प. एका भव्य आयताकृती शिळेवर हे सुबक नागाचे शिल्प असून हा नाग फणा उभारलेला आणि वेटोळे सोडलेला असा आहे.

या नागशिल्पाचे नीट निरीक्षण केल्यास नागाच्या फण्यावर एकूण सात मुखे दिसतात व त्यामुळे हे शिल्प हे शेषनाग या नागदेवतेचे असावे हे स्पष्ट होते. रायगडावरील बाजारपेठ प्रथमच पाहणारी माणसे अचानक समोर आलेली ही नागमूर्ती पाहून चकित होतात यामध्ये काहीच आश्चर्य नाही कारण बाजारपेठेमध्ये या नागशिल्पाचे प्रयोजन काय हा प्रश्न अगदी रायगडास वारंवार भेट देणाऱ्यांनाही पडत असतो.

या नागशिल्पाच्या प्रयोजनाचे जे मुख्य कारण इतिहास अभ्यासक व स्थानिकांनी सांगितले आहे ते म्हणजे या बाजारपेठेत पूर्वी नागप्पा अथवा शेषाप्पा नामक एका व्यापाऱ्याचे दुकान होते व हा व्यापारी नागपूजक असल्याने त्याने आपल्या नागदेवतेची प्रतिमा त्याच्या दुकानांमध्ये स्थापन केली होती. व्यापाऱ्याचे नाव नागप्पा अथवा शेषाप्पा असे असल्याने त्याच्या नावातच नागवंशीय विशेषण दिसून येते त्यामुळे ही कथा खरी असावी असा निष्कर्ष काढता येतो. 

रायगड किल्ल्याच्या बाजारपेठेतील ही नागमूर्ती नागप्पा अथवा शेषाप्पा नामक व्यापाऱ्याचे चिन्ह म्हणून स्थापित झाली आहे हे तर आपण जाणून घेतलेच मात्र हा नागप्पा अथवा शेषाप्पा कोण होता याची माहिती बहुतांशी कुणालाच नसते कारण आजही शिवकालीन इतिहासातील अनेक पैलू अज्ञातच आहेत.

तूर्तास नागप्पा अथवा शेषाप्पा यांची माहिती वाचावयास मिळत नसली तरी जुन्या ऐतिहासिक साधनांत खोल शोध घेतल्यास जी दुर्मिळ माहिती आढळते त्यावरून आपण काही निष्कर्ष काढू शकतो. यासाठी प्रथम आपण १८८५ साली इतिहास अभ्यासक गोविंदराव जोशी यांनी नागप्पाविषयी काय सांगितले होते याची माहिती घेऊ.

गोविंदराव यांचे मते बाजारपेठेतील एक दुकान हे नागप्पा नामक व्यापाऱ्याचे असून तो अतिशय प्रामाणिक आणि सत्यवादी होता. नागप्पास शेषाप्पा या नावानेही ओळखले जात असे आणि हा नागप्पा कोणी सामान्य व्यापारी नसून त्याच्याकडे राजधानीच्या जामदारखान्याचा कारभार होता.

या अत्यंत जुन्या माहितीवरून नागप्पा अथवा शेषाप्पा याची माहिती व त्याचा हुद्दा आपणास समजला असेलच मात्र यापुढे जाऊन आपण नागप्पा अथवा शेषाप्पा याविषयी ऐतिहासिक साधनांत शोध घेतला असता एक महत्वाची माहिती आढळते की, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या कारकिर्दीत श्रीगोंदा येथे एक धनिक सावकार होता व त्याचे नाव शेषाप्पा नाईक असे होते व मालोजीराजे भोसले व शेषाप्पा नाईक या दोघांमध्ये खूप चांगला सलोखा असून मालोजीराजे शेषाप्पा यांच्यावर खूप विश्वास ठेवत.

मालोजीराजे यांनी आपल्या कारकिर्दीत अतिशय परिश्रम घेऊन भोसले घराण्याचा उत्कर्ष केला त्यावेळी त्यांना जी धनप्राप्ती झाली त्याची जबाबदारी त्यांनी शेषाप्पा नाईक यांच्याकडेच दिली होती. मालोजीराजे यांच्या काळातील शेषाप्पा आणि रायगडच्या जामदारखान्याचे कारभारी शेषाप्पा उर्फ नागप्पा यांच्यात नक्कीच काहीतरी संबंध असावा कारण शिवाजी महाराजांनी जामदारखान्याचा कारभार त्यांच्याकडे दिला होता त्यावरून शिवाजी महाराज हे शेषाप्पा यांना उत्तमरीत्या ओळखत होते हे समजते आणि दुसरा निष्कर्ष हा सुद्धा काढता येतो की रायगडाच्या जामदारखान्याचा कारभार हा नागप्पा नाईक यांच्याकडे असून ते शेषाप्पा नाईक यांचे पुत्र अथवा नातू असावे कारण दोघांच्या नावात साम्य आहे.

राजधानी रायगडाच्या उत्कर्षाची साक्षीदार अशी ही नागमूर्ती आजही आपला उपेक्षित इतिहास कथन करण्याचा प्रयत्न करीत बाजारपेठेत उभी आहे. या लेखावरून रायगड किल्ल्यावरील बाजारपेठ आणि नागप्पा उर्फ शेषाप्पा नाईक तसेच तेथील नागशिल्प याबद्दल विपुल माहिती प्राप्त झाली असेल अशी आशा आहे.