पेणचे ग्रामदैवत श्री रामेश्वर व श्री दुर्गामाता मंदिर

मंदिराच्या भिंतींवर मंदिराची जुनी छायाचित्रे दिसून येतात. एका भिंतीवर शंभर वर्षांहून जुने रोमन लिपीतील घड्याळ आहे जे आजही सुरूच आहे.

पेणचे ग्रामदैवत श्री रामेश्वर व श्री दुर्गामाता मंदिर
पेणचे ग्रामदैवत श्री रामेश्वर व श्री दुर्गामाता मंदिर

गणेश मूर्तींचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातल्या पेण शहराचे ग्रामदैवत म्हणजे श्री रामेश्वर व श्री दुर्गामाता. पेण शहरातील देऊळवाडा या नावाने प्रसिद्ध अशा ठिकाणी श्री रामेश्वर व श्री दुर्गादेवी मंदिर असून हे मंदिर मध्ययुगीन स्थापत्यशैलीचा अद्वितीय नमुना आहे.

या मंदिराचे दर्शन होताच प्रथम मनात भरते ती त्याची भव्यता. एका मोठ्या पाषाणी जोत्यावर हे मंदिर उभारले गेले असून मंदिराचे सभागृह व गर्भगृह दोन्ही अतिशय विस्तीर्ण आहेत.  मंदिरास पाषाणी शिखर असून सभागृहास लाकडी कौले आहेत.

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेस असून आत शिरताना आपल्याला मंदिराचा बांधकाम काळ सांगणारा एक जीर्ण शिलालेख दृष्टीस पडतो. सभागृहात प्रवेश केल्यावर तेथील लाकडी व आजही सुस्थितीत असलेले बांधकाम पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. मंदिरात शंभर वर्षांहून जुनी काचेची विविधरंगी झुंबरे दिसून येतात. 

मंदिराच्या भिंतींवर मंदिराची जुनी छायाचित्रे दिसून येतात. एका भिंतीवर शंभर वर्षांहून जुने रोमन लिपीतील घड्याळ आहे जे आजही सुरूच आहे.

संभागृहात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस म्हणजे पश्चिम दिशेस मंदिराच्या गर्भगृहाचे दार असून मंदिराच्या गर्भगृहात एकूण तीन अनेक देवतांची मंदिरे आहेत मात्र दोन मुख्य मंदिरे ही ग्रामदेवता दुर्गामाता आणि ग्रामदैवत रामेश्वर यांची आहेत. ही मंदिरे अनुक्रमे गर्भगृहाच्या डाव्या आणि उजव्या कोपऱ्यात आहेत. 

दुर्गामातेची मूर्ती अतिशय रेखीव असून श्री रामेश्वराचे स्वयंभू असे लिंग भव्य आहे व येथील वातावरण अतिशय धीरगंभीर असे आहे.

आधुनिक युगात जीर्णोद्धाराच्या नावाखाली अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने बांधण्यात आलेल्या जुन्या मंदिरांच्या जागी नव्या स्थापत्य शैलीची मंदिरे बांधण्यात येत असली तरी जुन्या स्थापत्यशैलीची सर नव्या मंदिरास येत नाही. असे असले तरी शेकडो वर्षे जुन्या स्थापत्य शैलीचे श्री रामेश्वर व श्री दुर्गादेवी मंदिर पेण वासियांनी जपले आहे ते पाहून पेणकरांच्या जुने जपण्याच्या सवयीला सलाम करावासा वाटतो.

पेण नगरीचे प्रमुख धार्मिक स्थळ असलेल्या श्री रामेश्वर व श्री दुर्गामाता मंदिरास धार्मिक पर्यटनाची आवड असलेल्या प्रत्येकाने एकदातरी भेट द्यायलाच हवी.