गुरु गोविंदसिंह - शिखांचे दहावे गुरु

शिखांचे दहावे गुरु म्हणून गुरु गोविंदसिंह यांचे नाव आदराने घेतले जाते. गुरु गोविंदसिंह यांचा जन्म बिहार राज्यातील पाटणा येथे १६६६ साली झाला.

गुरु गोविंदसिंह - शिखांचे दहावे गुरु

गुरु गोविंदसिंग यांच्या वडिलांचे नाव गुरु तेज बहादूर (गुरु तेग बहादूर) तर आईचे नाव गुजरी असे होते. त्यांचे घराणे हे सोढी वंशातील असून त्यांचे मूळ नाव गोविंद राय असे होते.

गुरु गोविंदसिंग यांचे लग्न लाहोर येथील हरिवंश खत्री यांच्या कन्येशी झाले होते. गोविंद सिंह यांचे वडील गुरु तेज बहादूर यांनी धर्मांतर करण्यास नकार दिला म्हणून मुघल बादशाह औरंगजेब याने निर्घृण हत्या केली. त्यावेळी आपल्या वडिलांसोबत झालेल्या अन्यायाविरोधात लढा देण्याचा त्यांनी निश्चय केला.

आपल्या अनुयायांना त्यांनी वीरवृत्तीचा अंगीकार करण्याचे शिक्षण दिले, वीरवृत्तीचा अंगीकार करूनच आपण आपल्या धर्माचे रक्षण करू शकतो हे त्यांनी आपल्या अनुयायांच्या मनावर बिंबवले आणि तलवार व घोडे इत्यादी युद्धसाहित्य जमा करणे सुरु केले. सुरुवातीस त्यांनी गोवधबंदी करून धर्मरक्षक ही पदवी धारण केली व समस्त जनांस एकीचा उपदेश दिला.

गुरु गोविंदसिंहांनी आपल्या अधर्माविरोधातील युद्धात चंडी देवतेस आपले उपासक बनवले व सर्वांना इतिहासातील आदर्श व्यक्तींच्या चरित्राची माहिती देऊन त्यांनी प्रेरणा देण्यास सुरुवात केली. दयाराम खत्री, धर्मा जाट, हिम्मत कहार, साहेबा नापीक आणि मोहकम धोबी हे त्यांचे पट्टशिष्य जे धर्मासाठी प्राणही देण्यास तयार झाले होते. गुरु गोविंदसिंहांनी आपल्या शिष्यांस खूप सन्मानाने वागवले. जातपात सोडून फक्त धर्मासाठी सर्वांनी एक व्हावे ही त्यांची विचारसरणी होती.

गुरु गोविंदसिंहांनी जो संप्रदाय निर्माण केला त्याचे नाव खालसा असे दिला, खालसा या शब्दाचा अर्थ एकी असा होतो आणि प्रत्येकास सिंह ही पदवी दिली व सिंहासारखे लढावयास शिकवले.

पुढे मोगलांबरोबर प्रत्यक्षात युद्ध सुरु झाले व मोगलांना प्रत्येक युद्धात त्यांनी उत्तम प्रत्युत्तर दिले. या युद्धांमध्ये सुरुवातीस त्यांची दोन मुले धारातीर्थी पडली यावेळी त्यांच्यावरही प्राणघातक प्रसंग आला होता मात्र वेषांतर करून त्यांनी शत्रूस चकवा दिला. मोगलांनी पुढे गोविंदसिंहांच्या आणखी दोन मुलांना भिंतीत चिणून क्रूरपणे मारले व गुरु गोविंदसिंह यांची माता गुजरीदेवी यांनाही अटक करण्यात आली मात्र मोगलांच्या अटकेत राहण्यापेक्षा धर्मासाठी प्राण देणे श्रेयस्कर असे समजून त्यांनी तुरुंगातच आपल्या प्राणाची स्वआहुती दिली.

पुढे गोविंदसिंह यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथे निवास केला मात्र शत्रू कायम त्यांच्या मागे होतेच कारण गोविंदसिंहांनी मोगलांच्या विरोधातील लढाईत अनेकांना मारले होते त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी अनेक जण टपून बसले होते. 

एक दिवस अताऊल्ला पठाण व त्याचा भाऊ गुलखा पठाण हे गुप्तपणे नांदेड येथे गुरु गोविंदसिंह राहत असलेली ठिकाणी पोहोचले व गुरु गोविंदसिंह झोपेत असतानाच त्यांच्या पोटात कट्यारीचा वार केला. अताऊल्ला पठाण व त्याचा भाऊ गुलखा पठाण या दोघांचे वडील एका लढाईत गुरु गोविंदसिंह यांच्या हातून मारले गेले असल्याने बदलाच्या भावनेने त्यांनी हे भ्याड कृत्य केले.

कट्यार पोटात घुसल्यामुळे गुरु गोविंदसिंह यांना जाग आली व त्यांनी तलवार हातात घेऊन एकाच घावात गुलखा पठाणाचे दोन तुकडे केले यावेळी अताऊल्ला पठाण पळून गेला. गुरु गोविंदसिंह यांच्यावर झालेला वार हा खोल असल्याने जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होऊन ७ ऑक्टोबर १७०८ साली वयाच्या ४१ व्या वर्षी गुरु गोविंदसिंह यांचे नांदेड येथील अविचल या गोदावरीच्या तीरावरील गावात निधन झाले.

गुरु गोविंदसिंह हे संत व योद्धा होतेच मात्र ते एक उत्तम कवीसुद्धा होते. त्यांना संस्कृत व फारशी भाषा अवगत होती ब्रज भाषेवरही त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. त्यांनी जाप, सर्वलोहप्रकाश, चंडी चरित्र, सुनीतिप्रकाश, ज्ञानप्रबोध, प्रेम सुमार्ग, बुद्धिसागर, विचित्र नाटक आणि गुरु ग्रंथसाहेब या पवित्र ग्रंथातील काही भाग असे विपुल लिखाण केले होते.

शीखपंथात केस, लोखंडी कडे, कंगवा, कच्छ व कट्यार हे पंचकन धारण करण्याची प्रथा गुरु गोविंदसिंह त्यांच्यापासूनच सुरु झाली जी आजही पाळली जाते. आपल्या महान विचारांनी राज्यक्रांती घडवणारे एक अद्वितीय पुरुष म्हणून गुरु गोविंदसिंह यांचे महत्व खूप मोठे आहे.