बहुरुपी रामकथा (संपादन - डॉ अरुणाताई ढेरे)

रामकथांचा विविधांगी परिचय डॉ अरुणाताई ढेरे यांनी " बहुरूपी रामकथा" या पुस्तकातून वाचकांसमोर मांडला आहे. आपल्या मनावर पूर्वापार झालेले संस्कार, धारणा किंवा " हे आपले भलतेच काहीतरी" असली वाक्ये काही काळासाठी का होईना बाजूला ठेवत, एक गोष्टीच्या विविध बाजू लक्षात घेत, साहित्याच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक नक्की वाचावे.

बहुरुपी रामकथा (संपादन - डॉ अरुणाताई ढेरे)
बहुरुपी रामकथा

 महर्षि वाल्मिकीनी रामायण लिहिण्याच्या आधीपासूनच     समाजात रामकथा मौखिक स्वरूपात अस्तित्वात होती. विविध गुणांनी युक्त असणाऱ्या एखाद्या थोर पुरुषाचे चरित्र काव्यबद्ध करावे असे वाल्मिकींच्या मनात आले. (क्रौंच पक्षाचा वध आणि त्यांचा विलाप ही देखील एक कथा) त्यांच्या मनातील थोर पुरुषाच्या ठायी असणारी सर्व गुणवैशिष्ट्ये त्यांनी नारदाला सांगितली. आणि नारदाने रामाच्या अंगी ही सर्व गुणवैशिष्ट्ये होती असे सांगितले. यातून रामायण हे महाकाव्य जन्माला आले.

तसे तर आपण रामायण आणि त्यातील कथा सहजपणे सांगू शकतो. लहानपणापासून ऐकलेल्या याच कथा आपण पुढील पिढीला देखील सांगतो. आणि आपली एक धारणा असते की आपण जे ऐकत, सांगत आहोत ते सर्व वाल्मिकीनी रामायणात लिहिलेले आहे. पण आपल्यापैकी कितीजणांनी वाल्मिकी रामायण वाचले आहे. मी देखील नाही वाचले. मुळात रामायणाचे युद्ध होते, रावण मारतो, राम सीता लक्ष्मण हे अयोध्येला परत येतात. आणि रामाचा राज्याभिषेक होतो. इथेच वाल्मिकींचे रामायण संपते. मग नंतर सीतेचा त्याग, तिचे शेवटी भूमीत समावणे हे कोठे आहे ? या उत्तर रामायणातील कथा येतात, त्या वेगवेगळ्या रामायणातून. वाल्मिकी लिखित रामायण हे एकमेव रामायण नाही. त्यानंतरच्या काळात देखील वेगवेगळ्या व्यक्तींनी, वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या प्रदेशात , वेगवेगळी रामायणे लिहिली गेली. भारताच्या  विविध प्रदेशातील लोककथामधून रामाच्या संदर्भात विविध कथा ऐकायला मिळतात. इतकेच काय तर नेपाळ, जावा, सुमात्रा , चीन या देशांत देखील रामकथा प्रसृत झाली. ही विविध रामायणे का लिहिली गेली याची देखील अनेकविध कारणे दिली गेली आहेत. या सर्व रामायणांचे थोडक्यात केलेले संकलन म्हणजे " बहुरुपी रामकथा " हे पुस्तक. 

अध्यात्म रामायण, अद्भूत रामायण, आनंद रामायण, वेदांतसार रामायण, उत्तर रामचरित या सर्वांचा परामर्श या पुस्तकात आहे. याचबरोबर प्रदेशानुसार रचलेले रामायण , जसे की आसामचे माधवकांदली रामायण, ओडिशाचे जगमोहन रामायण, बंगालचे कृतीवासी, चंद्रावती रामायण , आंध्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, काश्मीर या भागातील रामायण तसेच चिनी, फारसी या रामायणाचा थोडक्यात अभ्यास व त्यातील कथा या पुस्तकात येतात. संत साहित्यातील रामकथा, भास, कालिदास यांचे रामायण, गदिमांचे गीतरामायण या सर्वांची वैशिष्ट्ये यात आहे.परंतू या केवळ रामकथा नाहीत. तर त्याकाळातील समाजव्यवस्था, विविध परंपरा यांचे चित्रण देखील यातून पहायला मिळते. त्याकाळातील साहित्य परंपरा, लेखनवैशिष्ट्ये यांचा आढावा देखील याद्वारे लेखकांनी घेतला आहे.   

मूळ वाल्मिकी रामायण २४,००० श्लोकांचे आहे. परंतु ही श्लोकांची संख्या नंतरच्या रामायणात लाखो-कोटींच्या घरात गेली. साहजिकच कथांचा विस्तार वाढला. आपण ज्या कथा वाल्मिकी रामायणाचा भाग समजतो त्यापैकी कित्येक कथा या वाल्मिकी रामायणात नाहीतच. समुद्रावर सेतू बांधताना दगडावर राम लिहिल्याने दगड पाण्यावर तरंगले, त्यात खारीचा वाटा, ब्रम्हहत्येचे प्रायश्चित म्हणून रामाने शिवलिंग स्थापन केले, अहिरावण - महिरावण , लक्ष्मण रेषा, सीताहरणाच्या वेळेस असणारी माया सीता, शबरीची उष्टी बोरे हे प्रसंग वाल्मिकी रामायणात येत नाहीत. हे इतर वेगवेगळ्या रामायणात आहेत. आणि हे सर्व प्रसंग बहुरूपी रामकथा या पुस्तकात संदर्भासहित येतात.

अनेक कथा प्रचलित रामायणापेक्षा खूप वेगळ्या आहेत. जसे की थाई रामायणात हनुमान ब्रह्मचारी नाही. विदेशी रामायणात हनुमान समुद्रावरून उडान घेत असताना एक मत्स्यकन्या त्याच्यावर भाळते आणि त्यांचा गंधर्व विवाह होतो. त्यांना मुले होतात असा उल्लेख येतो. भारतीय चौकटीत मात्र हे बसत नाही. मग इथे हनुमान समुद्र लांघून जात असताना त्याच्या घाम समुद्रात पडला. तो नेमका एक मगरीने गिळला आणि तिला मुलगा झाला.तो मकरध्वज . हनुमान इतका तेजस्वी होता की त्याच्या घर्मबिंदूत देखील वीर्याचा अंश होता असे हे विवेचन. आणखी एका लोककथेनुसार हनुमान सूर्यदेवाकडे शिक्षण घेत असतो. तेव्हा ६४ कलापैकी ६० शिकवून होतात. परंतु उरलेल्या चार गृहस्थाश्रमासंबंधी असल्याने सूर्यदेव त्या शिकवायला तयार नव्हते. यातून मार्ग म्हणून सूर्यदेवाची कन्या जी नैष्ठिक ब्रम्हचर्य पालन करत होती, तिच्या सोबत हनुमानाचा विवाह लावण्यात आला. आजही मछलीपट्टणम भागात सुवर्चला आणि अंजनेय यांची मंदिरे आहेत. तेथे त्यांचा विवाह उत्सव साजरा केला जातो.

जैन परंपरेतील पद्मचरित्र सांगते की सीता ही रावण आणि मंदोदरीची मुलगी. परंतु तिच्यामुळे कुळाचा नाश होईल अशी भविष्यवाणी झाल्याने रावणाने बाळ सीतेचा त्याग केला. आसाम, ओडिशा या पूर्व भारतात कार्बी जमातीचे लोक स्वतःला वाल्मिकीचे वंशज मानतात. तर जनक हा शेतकरी आणि सीता त्याची मुलगी अशी धारणा तेथील गीतांमधून दिसून येते. या भागात घरोघरी हातमाग असतात. कापड विणताना, बसण्यासाठी म्हणून सीतेला सुवर्णमृगाचे कातडे हवे होते, असा उल्लेख यांच्या गीतांमधून येतो. कवी भास यांनी त्यांच्या लेखनात कैकयीची वेगळी बाजू मांडली आहे. जी इतर कुठे सहज दिसत नाही. रामासाठी तिने वनवास का मागितला याचे स्पष्टीकरण ती भरताला देते. रामाने वनवासात जाणे हे त्याचा जीव वाचवण्यासाठी होते, अशी तिची यामागची भूमिका आहे.       चिनी कथांबाबत बोलायचे झाले तर चिनी प्रवासी, बौद्ध धर्मप्रसारक यांच्या मार्फत भारतातील कथा चीन मध्ये गेल्या. आणि वेगवेळ्या भारतीय देवता चिनी संस्कृतीचा भाग झाल्या. त्यांना चिनी नावे दिली गेली. चिनी भाषेतील लियेऊ तुत्सी किंग हे अनाम पुराणाचे अनुवादित पुस्तक रामायण साधर्म्य असणारे आहे. यातील पत्रांना नावे नाहीत. या पुस्तकातील नायक रामाप्रमाणेच राज्य सोडून वनात जातो. फक्त वडिलांची आज्ञा म्हणून नाही तर मामाने त्यांच्या राज्यावर आक्रमण केले म्हणून राज्य सोडतो. वनात गेल्यानंतर नागांचा राजा नायिकेला पळवून नेतो. तिला परत आणण्यासाठी नायक वानरांच्या राजाची मदत घेतो. समुद्रावर बांध घालतो. नागांच्या राजाला मारून नायिकेला परत आणतो. दोघे आपल्या राज्यात परत आल्यावर प्रजा नायिकेबद्दल शंका घेते. तेंव्हा धरणी दुभंगून नायिका त्यात सामावली जाते. अशी कथा चीनमध्ये आहे. मुघल शासक अकबराच्या दरबारी मकबतखाना नावाचा चित्रकार आणि भाषांतरकारांचा एक गट होता. यांनी अनेक संस्कृत ग्रंथांचे फारसी मध्ये भाषांतर केले. त्यापैकी रामायण देखील आहे. ' राझ्मनामा'(युद्धाचे पुस्तक) किंवा 'रामायण-ए-मसिही'  या नावाने हे ओळखले जाते.

अशा प्रकारे रामकथांचा विविधांगी परिचय डॉ अरुणाताई ढेरे यांनी " बहुरूपी रामकथा" या पुस्तकातून वाचकांसमोर मांडला आहे. आपल्या मनावर पूर्वापार झालेले संस्कार, धारणा किंवा " हे आपले भलतेच काहीतरी" असली वाक्ये काही काळासाठी का होईना बाजूला ठेवत, एक गोष्टीच्या विविध बाजू लक्षात घेत, साहित्याच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक नक्की वाचावे.
 

- वैशाली राऊत