सरदार वाघोजी तुपे

पायदळाचे हजारी सरदार म्हणून काम सुरु केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघोजी तुपे त्यांची कोकणात नेमणूक केली.

सरदार वाघोजी तुपे

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात त्यांना असंख्य इमानदार माणसांची साथ लाभली व यापैकी एक म्हणजे सरदार वाघोजी तुपे. 

वाघोजी तुपे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कान्होजी जेधे यांच्या कार्यकाळात केली. त्याकाळी कान्होजी जेधे यांच्या जीवास जीव देणाऱ्या सहाय्यकांपैकी एक म्हणजे वाघोजी तुपे आणि कावजी कोंढाळकर हे होते.

कान्होजी जेधे यांच्यासोबत वाघोजी तुपे, कावजी कोंढाळकर यांच्यासहित आणखी दहा असे मिळून एकूण बारा सहाय्यक होते व त्यांना बारा मूळवे असे म्हटले जाई.

एके समयी कान्होजी जेधे यांचे जे वतन होते त्यावरून मोठा वाद झाला यावेळी प्रकरण लढाईपर्यंत गेले व या लढाईत वाघोजी तुपे यांचे मोठे बंधू मारले गेले. 

कालांतराने मावळातले दोन मातब्बर देशमुख कान्होजी जेधे आणि बांदल देशमुख यांच्यात काही कारणांवरून एक लढाई झाली व ही लढाई कासारखिंड या ठिकाणी झाली होती. या लढाईत सुद्धा वाघोजी तुपे यांनी चांगली कामगिरी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांच्यामध्ये जे प्रतापगडचे युद्ध झाले त्यामध्ये कान्होजी जेधे यांच्या कडून वाघोजी तुपे यांनी सुद्धा या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने भाग घेतला होता आणि या युद्धात केलेली कामगिरी पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे यांच्याकडून वाघोजी तुपे यांना आपल्याकडे मागून घेतले आणि त्यांना हजारी पायदळाचे सरदार म्हणून नेमले.

पायदळाचे हजारी सरदार म्हणून काम सुरु केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघोजी तुपे त्यांची कोकणात नेमणूक केली. याकाळात कोकणात शाईस्तेखानाच्या आदेशानुसार कारतलबखान, नामदारखान, ताहेरखान, बलाकी आदी मोगल सरदार उत्तर कोकणातील कल्याण सुभ्यात धुमाकूळ घालून आपली ठाणी बसवत होता.

यावेळी ताहेरखान याने पेणच्या दक्षिणेकडील महलमिरा डोंगरावर आपली छावणी टाकली होती आणि एके दिवशी त्याने अचानक पेणमध्ये उतरून येथील गोटेश्वर हे मंदिर उध्वस्त केले.

यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मिरगड व रत्नगड या महलमिरा रांगेतील दोन किल्ल्यांना वेढा घालून मेहेरखान आणि बलाकी या सरदारांची नाकेबंदी केली.

याच काळात महाराजांनी नेतोजी पालकर यांच्यासहित उंबरखिंडीवर छापा मारून करतालबखानाची फजिती केली आणि कावजी कोंढाळकर यांनी रत्नगडवर हल्ला करून मेहेरखानाला पळवून लावले. 

नामदारखानाला धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पेणच्या महालमिरा डोंगरात नामदार खानावर छापा घालण्यास नेतोजी पालकर आणि वाघोजी तुपे याना पाठवले या युद्धात नामदारखानाचा पराभव होऊन तो नागोठण्याहून पेणमार्गे नदीची वाट धरून पळून गेला.

१६६२ साली मोगलांच्या ताब्यात गेलेल्या पेणच्या गढीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला केला व यावेळी वाघोजी तुपे सुद्धा सोबत होते. गढीचा रक्षक एक मोगल सरदार असून त्याच्यासोबत मोठी कुमक होती. मराठे गढीजवळ गेले त्यावेळी मोठे युद्ध झाले आणि दोन्ही बाजूंचे अनेक सैन्य पडले.

स्वतः मोगल सरदार आणि वाघोजी तुपे यांच्यात तुंबळ लढाई होऊन दोघेही जबर जखमी झाले मात्र सत्तावीस जखमा होऊनही वाघोजी तुपे यांनी शेवटचा एक वर मोगल सरदारावर केला आणि त्याला ठार मारले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या महत्वाच्या काळात त्यांना साथ देणारे वाघोजी तुपे हे खऱ्या अर्थी एक निष्ठावंत सरदार होते.