घारापुरी - समुद्रस्थित अद्वितीय शिवमंदीर
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले व रायगड जिल्ह्याच्या हद्दीत येत असलेले घारापुरी हे जगप्रसिद्ध बेट जगभरातल्या पर्यटकांचे आकर्षण आहे ते येथील हिंदू शैव लेण्यांमुळे. या लेण्यांची किर्ती जगभरात एवढी दिंगत आहे की १९८७ साली या बेटास युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा देण्यात आला. घारापुरी येथे जाण्यासाठी मुंबई तथा रायगड जिल्ह्यातून लाँचेस उपलब्ध आहेत मात्र मुंबईहून या बेटास भेट देणार्यांची संख्या जास्त असल्याने लॉन्चेसची संख्याही मुबलक असते.
घारापुरी हे फार प्राचिन असे बेट आहे, एवढे की इसवी सनाच्या ५ व्या शतकात या लेण्या तयार करण्यास घेतल्या असाव्यात असे अनेक संशोधकांचे म्हणणे आहे याशिवाय कोकणाची प्राचिन राजधानी पुरी म्हणजे घारापुरीच असावी असे मानणारा इतिहास अभ्यासकांचा एक मोठा गट आहे या दाव्यास प्रबळ पुष्टी येथील प्राचिन लेण्या देतात या लेण्या घारापुरी या दोन डोंगरांनी वेढलेल्या समुद्रस्थित बेटावर सुमारे साठ हजार स्केअर फुटात पसरल्या असून यात हिंदू, बौद्ध तसेच काही उपासनी व निवासी लेण्यांचाही समावेश आहे.
या लेण्यांची निर्मिती कुठल्या राजवंशाने केली हे अजुनही सिद्ध झाले नसले तरी वाकाटक, नळ, चालुक्य, कलचुरी, त्रैकुटक, मौर्य , राष्ट्रकुट तथा शिलाहार या राजवंशांपैकी एका काळात या लेण्याचे काम करण्यात आले असावे. मात्र यापैकी बहुतांशी राजघराणी एकाच धर्माची असल्यामुळे व धर्म अथवा पंथ जरी वेगवेगळे असले तरी तत्कालिन धार्मिक व पांथिक सहिष्णूतेमुळे जरी एका राजघराण्याने लेण्यांचे काम सुरु केले व कालांतराने ते राज्य नष्ट होऊन दुसर्या राजघराण्याचे अस्तित्व त्या परिसरावर आले तरी या लेण्यांच्या निर्मितीमध्ये ते घराणे सुद्धा हातभार लावत असे हे पाहता संशोधकांनी या लेण्यांचा निमिर्ती कालखंड इ.स.४५० ते इ.स. ७५० च्या आसपास निश्चीत केला आहे. सातवाहनांनतर वाकाटक, नळ व चालुक्य या घराण्यांनी कोकणावर राज्य केले याच वेळी या परिसरावर मौर्यांचा सुद्धा अंमल होता मात्र बदामी चालुक्य घराण्याच्या किर्तीवर्मा याने कोकणच्या मौर्यांचा पराभव केला मात्र या पराभवानंतरही या लेण्यांचे काम चालूच राहिले असले पाहिजे.
पोर्तुगिजांच्या ताब्यात काही काळ मुंबईसहित हे बेट असल्यामुळे या लेण्यांची दुर्दशा झाली, हि दुर्दशा निसर्गापेक्षा पेक्षा मानवनिर्मित जास्त होती, मुळातच आक्रमक व मुर्तीभंजक प्रवृत्तीच्या पोर्तुगिजांनी या लेण्यांची तोडफोड करुन नेमबाजीसाठी या कलाकृतींचा वापर केल्यामुळे ज्या कलाकृतीं तयार करण्यासाठी जे असंख्य हात शेकडो वर्षे राबले त्याच कलाकृती काही काळातच उध्वस्त करण्याचे अनेक प्रयत्न झाले. पोर्तुगिजांच्या काळात या बेटास एलिफंटा हे नाव मिळाले कारण या ठिकाणी पुर्वी असलेल्या एका विशाल हत्तीच्या शिल्पामुळे होय हा हत्ती ब्रिटीशांनी कालांतराने मुंबईस नेला मात्र आजही या बेटाला एलिफंटा या नावानेही ओळखले जाते.
घारापुरी लेणी समुहात एकुण सात लेण्या आहेत. यापैकी पाच लेण्या पश्चिमेकडील टेकडीवर तर उरलेल्या दोन या पुर्वेकडे आहेत. पश्चिमेकडील लेण्यांपैकी प्रथम क्रमांकाची लेण्यांमध्ये शिवाची विवीध रुपे साकारण्यात आली आहेत. याच लेणीमध्ये एक शिवमंदीर आहे याच शिवमंदीराच्या द्वारावरिल द्वारपाल तसेच दुसरीकडील टेकडी व ढगांचे अंकण आणि त्याकाळच्या स्त्रीयांची केशरचना या स्थापत्यशैलीवरील चालुक्य्-गुप्त कलाशैलीचा आभास निर्माण करतात. मुख्य लेणीच्या उत्तर भागातील एक गर्भगृह व कक्ष हे सहा स्तंभांच्या रांगेमध्ये विभागले गेले आहे. यात उत्तम श्रेणींच्या प्रतिमा फलकांचे चित्रण भिंतीवर करण्यात आले आहे व यामध्ये शिवाची अर्धनारीनटेश्वर, नटराज, योगीश्वर, शिव-पार्वती, गंगाधर, अंधकासूर वध, कल्याण सुंदर आणि रावणानुगृह इत्यादी रुपे साकारण्यात आली आहेत. याच लेणीच्या छतावर पुर्वी विवीध रंगांनी चित्रण करण्यात आले होते मात्र ते आता नष्ट झाले आहे.
या लेण्यांमधली सर्वाधिक प्रसिद्ध कलाकृती म्हणजे शिवाची तीन रुपे अर्थात ब्रह्मा, विष्णू व रुद्र यांचे एकत्रीकरण असलेली त्रिमुर्ती, यामुर्तीमध्ये शिवाची कर्ता, संरक्षक व संहारक अशी तीन रुपे साकारण्यात आली आहेत. ही मुर्ती सुद्धा पोर्तुगिजांच्या कचाट्यातून सुटली नव्हती मात्र पुढील काळात ब्रिटीशांनी शिल्पमहर्षी बाळाजी तालिम यांची मदत घेऊन या त्रिमुर्तीची व इतर कलाकृतींची दुरुस्ती केली सध्या पहावयास मिळणारी मुर्ती ही दुरुस्त करण्यात आलेली मुर्ती आहे.
घारापुरी या बेटावर लेण्यांसोबतच ईसवी सन पुर्व तिसर्या शतकातला एक बौद्ध स्तुप, इसवी सनाच्या चौथ्या शतकातील पश्चीमी क्षत्रपांची नाणी व महिशासुरमर्दिनी, चतुर्मुखी प्रतिमा, ब्रह्मा व गरुड यांची काही शिल्पे सापडली आहेत जे या ठिकाणाचे प्राचिनत्व सिद्ध करतात. या बेटाच्या तीन बाजुंना जि बंदर गावे आहेत ती अनुक्रमे राज बंदर, शेत बंदर व मोरा बंदर अशी आहेत. यातील मोरा बंदर हे नाव प्राचिन मौर्य बंदर या नावास दर्शविते, शेत बंदर हे क्षेत्र बंदर व राज बंदर या नावातच या ठिकाणाचे राजकिय महत्त्व अधोरेखीत होते. याच राजबंदराच्या प्रवेशद्वारात येथिल प्रसिद्ध असे हत्तीशिल्प सापडले होते जे सध्या मुंबई येथील डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात पहावयास मिळते. नुकतीच या बेटावर शिश्याची सातवाहन कालीन नाणी सापडल्याने या बेटाच्या इतिहासालाही वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
सन ११७४ साली ब्रिटीशांनी घारापुरी बेट घेतले, या बेटाची भौगोलिक रचना पाहता चारही दिशांच्या आसमंतावर चौफेर टेहळणी करता येत असल्याने मुंबई बेटाच्या संरक्षणासाठी हे बेट मोक्याचे होते. या बेटावरुन शत्रूवर चारही दिशांनी मारा करता यावा म्हणुन इंग्रजांनी १९०४ व १९१७ साली तोन प्रचंड पोलादी तोफा या बेटाच्या माथ्यावर बसवल्या व काही खंदक तसेच भुयारे तयार केली याशिवाय काही लष्करी वास्तुंचिही निर्मिती करण्यात आली आजही ही सर्व ठिकाणे घारापुरीच्या सर्वोच्च माथ्यावर म्हणजे 'कॅनॉन हिल्स' येथे पहावयास मिळतात. माथ्यावरुन वातावरण चांगले असल्यास महामुंबई, न्हावा-शेवा, जे.एन्.पि.टी, करंजा, मोरा, उरण असा चौफेर दिशांवरील सुरेख नजारा दृष्टीपथात येतो.
संपुर्ण घारापुरी बेटाचा परिचय करुन घेतल्यावर आपल्याला लक्षात येते की प्राचिन काळी या बेटास अग्रहारपुरी अथवा गृहपुरी असे नाव असावे ज्याचा कालांतराने घारापुरी या शब्दात अपभ्रंश झाला असावा याशिवाय या बेटास गिरीपुरी म्हटले गेल्याचे उल्लेखही आढळतात. तत्कालिन पोर्तुगिज साधनांमध्ये या बेटाला 'पोरी' असेही म्हटल्याचे उल्लेख आहेत. यावरुन कोकणाची प्राचिन राजधानी 'पुरी' म्हणजे घारापुरीच असावी असाही कयास अनेक अभ्यासकांनी बांधला. कदाचित कोकणाची प्राचिन राजधानी म्हणुन प्रसिद्ध असलेली प्राचिन पुरी ही विवीध बेटांमध्ये विभागली जाऊन या परिसरास पुरी द्विपसमुह असे नाव मिळाले असावे व या समुहांपैकीच घारापुरी अर्थात गृहपुरी हे एक बेट असावे हे येथील वैभवशाली अशा प्राचिन वारश्यामुळे लक्षात येते. घारापुरी बेटावर आजही अनेक पुरातन वस्तू सापडत आहेत ज्या या परिसराची प्राचिनता सिद्ध करण्यास हातभार लावत आहेत, यापुढेही यासंदर्भात अनेक नवीन दावे निर्माण होतील व नवीन शोध लागतील मात्र या बेटावरील अद्वितीय लेण्या हीच या बेटाची सर्वात मोठी ऐतिहासिक ओळख आहे जिचे श्रेय या लेण्यांची निर्मिती करणार्या अज्ञात राजवंशाला व त्या वंशाच्या आश्रयाखाली बहरलेल्या त्या अज्ञात कलाकारांच्या समुहास द्यावे लागेल.