माहूरगड - साडेतीन शक्तिपीठांपैकी एक

माहूर येथे जी अनेक प्रसिद्ध स्थळे आहेत त्यापैकी श्री गुरुदेव दत्तात्रेयांचे स्थान, श्री रेणुकादेवीचे स्थान, श्री अत्रीऋषी व श्री अनुसया मातेचे स्थान आणि माहूरगड हा किल्ला प्रमुख आहेत.

माहूरगड - साडेतीन शक्तिपीठांपैकी एक
माहूरगड - साडेतीन शक्तिपीठांपैकी एक

महाराष्ट्राच्या नांदेड तालुक्यातील माहूर हे गाव एक तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले रेणुका देवीचे स्थान याच ठिकाणी असल्याने माहूर क्षेत्री दर्शनास दरसाल हजारो लोक जात असतात.

माहूरगडाच्या पायथ्याशी वसलेल्या माहूर येथून दोन मैलांच्या अंतरावर पैनगंगा ही प्रसिद्ध नदी वाहते. पूर्वी माहूर हे गाव दाट जंगलाने वेढलेले होते व येथे येणारे रस्ते हे डोंगर दऱ्यांतून जात असत व या अरण्यात हिंस्त्र पशु बऱ्याच प्रमाणात होते. मात्र आधुनिक काळात दळणवळणाच्या सोयी सुधारल्यानंतर येथे येण्यासाठी चांगले मार्ग तयार झाले आहेत.

माहूर हा भाग पूर्वीच्या दंडकारण्यात येत असे. साक्षात श्री रामांनी या परिसरात काही काळ निवास केला होता व कालांतराने अनेक ऋषी, तपस्वी येथे तपश्चर्येसाठी येत असत. माहूर येथील श्री दत्तस्थानाचे दर्शन घेण्यास श्रीराम आले असता परिसरातील माणसेच नव्हे तर झाडे, प्राणी, नद्या, पर्वत सुद्धा रामाचे दर्शन घेण्यास आतुर झाले आणि सर्वांच्या मुखातून श्रीराम, श्रीराम असे उद्गार बाहेर पडले व आजही येथील काही झाडांवर रामनाम आढळते.

माहूर येथे जी अनेक प्रसिद्ध स्थळे आहेत त्यापैकी श्री गुरुदेव दत्तात्रेयांचे स्थान, श्री रेणुकादेवीचे स्थान, श्री अत्रीऋषी व श्री अनुसया मातेचे स्थान आणि माहूरगड हा किल्ला प्रमुख आहेत. या शिवाय श्री परशुराम मंदिर, श्री कालेश्वर मंदिर, श्री मातृतीर्थ, श्री महाकाली मंदिर, महानुभाव पंथ स्थान आदी प्रख्यात तीर्थस्थाने या ठिकाणी आहेत.

माहूरगडावरील सुप्रसिद्ध स्थान म्हणजे श्री परशुराम यांची माता श्री रेणुकादेवी हिचे मंदिर. रेणुकादेवी महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाची कुलदेवता आहे. या मंदिराची उभारणी देवगिरीच्या यादवांनी केली असी म्हटले जाते.

माहूर येथे येण्यासाठी प्रथम नांदेड येथे येऊन नांदेड वरून माहूर गावं व माहूर गावातून माहूरगड असा प्रवास करावा लागतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले माहूरगड हे स्थान प्रत्येकाने एकदातरी पाहायलाच हवे.