कृषी पर्यटन - काळाची गरज

पर्यटन विकास हे राज्याच्या तसेच देशाच्या आर्थिक उत्पन्नाचे साधन असल्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार पर्यटन विकासाला प्राधान्य देत असतात. काही देश आणि काही राज्ये तर फक्त पर्यटन या एकाच आर्थिक साधनावर अवलंबून आहेत व पर्यटन क्षेत्रास एखाद्या उत्पादन क्षेत्रासारखे महत्व देतात.

कृषी पर्यटन - काळाची गरज
कृषी पर्यटन

पर्यटन विकास हे राज्याच्या तसेच देशाच्या आर्थिक उत्पन्नाचे साधन असल्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार पर्यटन विकासाला प्राधान्य देत असतात. काही देश आणि काही राज्ये तर फक्त पर्यटन या एकाच आर्थिक साधनावर अवलंबून आहेत व पर्यटन क्षेत्रास एखाद्या उत्पादन क्षेत्रासारखे महत्व देतात.

उदा. थायलंड, सिंगापूर सारखे प्रदेश अगर भारतातील काश्मिर, केरळसारखी राज्ये किंवा गोवा राज्य.

पर्यटन हा व्यवसाय म्हणून लोकप्रिय होण्यासाठी त्या त्या देशांकडे वा राज्यांकडे नैसर्गीक सौंदर्य, वृक्षराजी, किनारे, ऐतिहासीक स्थळे अशी काही विशेषता असण्याची गरज असते किंवा आधुनिक कला, ऐषारामाची साधने असावी लागतात. या कारणांमूळेच जगात निरनिराळी ठिकाणे पर्यटनस्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत. उदा.रोम, इजिप्त, भारतातील गोवा व राजस्थानसारखे प्रांत, विविध थंड हवेचे प्रदेश, काश्मिर, केरळ, आग्रा, हैदराबाद, अजंठा, वेरुळ इ. या स्थळांना भेट देणार्‍या पर्यटकांमूळे आर्थिक उत्पन्नात भर पडत असल्यामुळे त्यांच्या विकासाला ते ते देश व राज्ये महत्व देतात.

परंतू औद्योगिक प्रगतीमुळे, कारखानदारीच्या वाढीमूळे पर्यावरणाचा जो र्‍हास होत आहे, ग्लोबल वार्मिंगचा जो प्रश्न निर्माण झाला आहे, हे हवामानाचे प्रदूषण निर्माण झाले आहे. नैसर्गीक जंगले व वनस्पतींचा र्‍हास झाला आहे. कार्बनडाय ऑक्साईडच्या वाढीमूळे हवा दूषित झाली आहे, पाण्याचा अभाव निर्माण झाला आहे, रोगराई वाढली आहे आणि या सर्वाला उपाय पर्यावरण रक्षण आणि समतोल हाच आहे. यासाठी कृषीपर्यटन हा उत्तम उपाय आहे. कृषीपर्यटनामूळे हरित क्रांतीस चालना मिळते, वृक्षलागवडीला प्रोत्साहन मिळते, निसर्गसौंदर्यात भर पडते, जिवनोपयोगी असे तृणधान्य, फळफळावळ, दुधदुभत्याचा व्यवसाय यांना चालना मिळते, प्रदूषण नाहीसे होते याखेरीज रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक प्रगतीही साधता येते आणि या अनुषंगाने पर्यटनासही चालना मिळते.

अशाप्रकारे कृषीपर्यटनामूळे पर्यटनविकास आणि पर्यावरण रक्षण व या दोन्हीमुळे आर्थिक प्रगती असा तिहेरी लाभ होतो. म्हणूनच कृषी पर्यटनाला हल्लीच्या काळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याखेरीज पर्यटनामूळे विभिन्न प्रांतातील लोकांमध्ये जी सांस्कृतिक देवाणघेवाण होते त्यामुळे परस्परांमध्ये एकात्मता निर्माण होते व देशातील विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लागते.

पर्यटन व पर्यावरण संरक्षण असे दोन्ही उद्देश सामावलेले कृषीपर्यटन सध्या सह्याद्रीतील मावळ प्रांतात जोर धरु लागले आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. मावळ प्रांताच्या धर्तीवर महाराष्ट्रातील इतर भागातल्या शेतकर्‍यांनी व स्थानिकांनी जर आपल्या मालकीच्या शेतामध्ये कृषीउत्पन्नाबरोबरच कृषीपर्यटनास वाव दिला तर विकासास चांगला हातभार लागेल. तो केवळ एक छंद नाही तर जीवनावश्यक असे कर्तव्य आहे अशा गांभीर्याने कृषीपर्यटन जोपासण्यास हवे.