रायगड किल्ल्याचा खुबलढा बुरुज
रायगड खिंडीत आल्यावर प्रथम दिसून येतो तो म्हणजे चीत दरवाजा. हा दरवाजा आता नामशेष झाला असून येथून किल्ल्यावर जाण्याचा पायऱ्यांचा मार्ग सुरु होतो.
रायगड किल्ल्यावर जाण्याचे जे दोन प्रमुख मार्ग आहेत ते चीत दरवाजा आणि नाना अथवा नाणे दरवाजा या नावाने ओळखले जातात म्हणजेच सदर मार्गांनी किल्ल्यावर जाताना हे दोन दरवाजे प्रथम लागतात.
पूर्वी किल्यावर जाण्यासाठी पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावातून चढाई करावी लागत असे मात्र आधुनिक काळात रायगड खिंडीपर्यंत डांबरी रस्ता झाल्याने ८८० मीटर उंच अशा रायगड किल्ल्याचा ४४९ मीटर उंच भाग गाडीमधूनच पार होतो.
रायगड खिंडीत आल्यावर प्रथम दिसून येतो तो म्हणजे चीत दरवाजा. हा दरवाजा आता नामशेष झाला असून येथून किल्ल्यावर जाण्याचा पायऱ्यांचा मार्ग सुरु होतो.
चीत दरवाजापासून काही अंतर वर चढून गेल्यावर एक बुरुज दिसून येतो. या बुरुजास खुबलढा बुरुज या नावाने ओळखले जाते. जुन्या लेखकांनी या बुरुजाचा उल्लेख खुलाबत बुरुज असाही केलेला आढळतो. खूबलढा चा अर्थ जो बुरुज खूप लढला.
इतिहासकाळात रायगड किल्ल्यावर अनेक आक्रमणे झाली व किल्ल्यावर जाण्यासाठी शत्रूस सर्वप्रथम चीत दरवाजा आणि खुबलढा बुरुजाचा भक्कम पहारा भेदणे क्रमप्राप्त असायचे आणि रायगड किल्ल्यावर ठिकठिकाणी असलेला जबरदस्त पहारा भेदणे ही अशक्यप्राय गोष्ट व ही बाब पराक्रमाने नाही तर फक्त फितुरीनेच शक्य होती.
इतिहासातील अशा अनेक लढाया खुबलढा बुरुजाच्या आसमंतात होऊन येथील पहाऱ्याने शत्रूंशी मोठा लढा दिल्याने या बुरुजास खुबलढा असे नाव मिळाले असावे.
खुबलढा बुरुजाची उंची समुद्रसपाटीपासून ४५४ मीटर असून खुद्द खुबलढा बुरुजाची उंची २७ फूट आणि घेर ५० फूट आहे. बुरुजाच्या डाव्या बाजूने किल्लयावर जाणारी वाट आहे.खुबलढा बुरुज ज्या ठिकाणी आहे तो भाग किल्ल्याच्या मूळ भागापासून थोडा विलग झाला आहे व येथून किल्ल्याचे खूप सुंदर असे दर्शन होते.
खुबलढा बुरुजाची रचना अशा ठिकाणी केली होती की या ठिकाणी येइपर्यंत शत्रूची दमछाक होईल व पुढे त्याचा समाचार योग्य पद्धतीने घेता येईल. आजही पायथ्यापासून खुबलढा बुरुजापर्यंत चढाई करताना अंतर कमी असले तरी चांगलीच दमछाक होते.
तेव्हा असा हा रायगड किल्ल्याच्या इतिहासातील एक महत्वाचा खुबलढा बुरुज आपला इतिहास सांगत उभा आहे व हा इतिहास जाणून घेण्यासाठी त्याच्या अंतरंगात शिरणे गरजेचे आहे.