रायगड जिल्ह्यातील पांडवलेणी

महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासात लेण्यांना अढळ स्थान आहे. अजूनही प्रकाशझोतात न आलेल्या अनेक लेण्या महाराष्ट्रातील दुर्गम अशा भागांत आहेत ज्यांच्यावर प्रकाश पडणे अत्यंत आवश्यक आहे.

रायगड जिल्ह्यातील पांडवलेणी
पांडवलेणी

महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासात लेण्यांना अढळ स्थान आहे. महाराष्ट्राच्या दुर्गम अशा पर्वतरांगांमधील काळ्या कभिन्न कडेकपारींमध्ये हजारो वर्षांपूर्वी अज्ञात शिल्पकारांनी अत्याधुनिक साधने नसताना कोरून काढलेल्या या लेण्या आजही अनेक संशोधकांच्या अभ्यासाचा विषय झाल्या आहेत. महाराष्ट्रातील कार्ले, भाजे, बेडसे, ठाणाळे, वेरूळ, अजिंठा, घारापुरी, खडसांबळे, कान्हेरी, जोगेश्वरी, मंडपेश्वर, अरण्येश्वर या लेण्या व इतर अनेक लेण्या जगप्रसिद्ध आहेत. मात्र अजूनही प्रकाशझोतात न आलेल्या अनेक लेण्या महाराष्ट्रातील दुर्गम अशा भागांत आहेत ज्यांच्यावर प्रकाश पडणे अत्यंत आवश्यक आहे. 

रायगड जिल्ह्यातील पेण खोपोली मार्गावर वाकरूळ नावाचे एक छोटे गाव आहे. हेटवणे जलप्रकल्पामुळे प्रकाशझोतात आलेले हे गाव. रायगड जिल्ह्यातील दुर्गम अशा महालमिरा डोंगररांगेत निर्माण झालेला हेटवणे जलप्रकल्प रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक मानला जातो. या धरणातून संपूर्ण नवी मुंबईच्या पाण्याची गरज भागवली जाते. १४६ दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता असलेल्या हेटवणे धरणास एकूण सहा दरवाजे आहेत. भोगावती नदीवरील या धरणाच्या आसमंतात असलेल्या डोंगराळ प्रदेशात अनेक ऐतिहासिक व भौगोलिक आश्चर्ये आहेत. 

मिरगड व रत्नगड सारखे दुर्ग, व्याघ्रेश्वर सारखे धार्मिक स्थान व इतर अगणित धार्मिक स्थळे या आसमंतात पहावयास मिळतात. मात्र रायगड जिल्ह्याचा प्राचीन वारसा जपणारे एक अतिशय महत्वाचे मात्र अप्रसिद्ध असे ठिकाण याच परिसरात आहे ते म्हणजे खरबाची वाडी येथील पांडव लेणी. महाराष्ट्रासारखी विपुल लेणी इतर कुठल्याही भागात नाहीत. चैत्ये, विहार, पाषाणशिल्पे, गुहा या सर्व लेण्याच. प्रचंड कातळ कोरून काढलेल्या लेण्या. हे कामही साधे नव्हे. असंख्य कुशल कलाकारांचे हात शेकडो वर्षे चालले की या लेण्या तयार होत असत. प्राचीन काळापासून प्रदेशातून कोकणमार्गे सह्याद्री पार करून देशावर जाणाऱ्या व्यापारी रस्त्यांवर या लेण्या कोरल्या जात. त्याकाळी वाहने नव्हती पायी अथवा घोडे, बैलगाड्या घेऊन हा शेकडो मैलाचा प्रवास करावा लागे अशावेळी थांबण्याचे टप्पे असत आणि अशा टप्प्यांवर विश्रांती घेता यावी यासाठी या लेण्या कोरल्या जात. या लेण्यांना राजाश्रय असे. अनेक व्यापारी या लेण्यांच्या निर्मितीसाठी देणग्या देत असत. एखाद्या लेण्याचे काम सुरु असताना एक राजसत्ता संपून दुसरी आली तरी या लेण्यांचे काम अविरत चालू असे कारण या लेण्या तत्कालीन व्यापाराचा महत्वपूर्ण दुवा होत्या.

महाराष्ट्रात बौद्ध, जैन, हिंदू अशा अनेक संप्रदायाच्या लेण्या पहावयास मिळतात. सर्व भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या साक्षीदार असून आपले पूर्वज किती प्रगत व दूरदृष्टीपुरक होते हे या लेण्या पाहून लक्षात येते. वाकरुळ हुन खरबाची वाडी येथे जाण्यासाठी एक डांबरी रस्ता आहे. हा रस्ता पूर्णपणे डोंगराळ भागातून जात असून आदिवासी बांधवांची वस्ती असलेली अनेक गावे येथे आहेत. एक म्हैसवाडी च्या पुढे एक खिंड पार केली की आपण डोंगरमाथ्यावर येऊन पोहचतो येथून नजर टाकल्यास माणिकगड, सांकशी व रत्नगड हे किल्ले दृष्टीपथात येतात. काही अंतरावर खरबाची वाडी हे गाव आहे. हेटवणे प्रकल्पात अनेक गावे स्थलांतरीत झाली त्यापैकीच एक हे गाव असावे. गाव तसे छोटेच मात्र येथून डोंगर उतारावर आणखी एक वस्ती आहे तिथे गेल्यावर पांडव लेण्यांकडे जाण्यास रस्ता आहे. 

हा रस्ता पूर्ण उतरणीचा असून अर्धा तासाची चाल करून आपण एका ओढ्यात जाऊन पोहोचतो. रस्त्याचे नीट निरीक्षण केल्यास वाटसरूंसाठी तयार केलेल्या काही खोदीव पायऱ्या मध्ये मध्ये नजरेस येतात त्यावरून पूर्वी पेण मार्गे याच परिसरातून जाणारा एक प्राचीन मार्ग असल्याचे लक्षात येते. ओढ्यातून चालत चालत आपण हेटवणे धरणाच्या एका टोकाजवळ येऊन पोहोचतो आणि डाव्या बाजूस असलेल्या टेकाडावरील कातळात कोरलेली ही छोटेखानी पांडवलेणी आपल्या नजरेस पडते. 

डोंगराच्या कड्याचा दर्शनी भाग तासून या लेण्या तयार केल्या आहेत. आतमध्ये भलीमोठी चौकोनी आकाराची गुहा आहे ज्यामध्ये एकावेळी १५ माणसे राहू शकतील. प्रवेशद्वाराशी अलंकृत असे दोन स्तंभ आहेत ज्यांवर नक्षीकाम केले आहे. मुख्य गुहेच्या दोनही बाजूना एक माणूस उभा राहू शकेल अशा आयत्याकृती पोकळ्या कोरण्यात आल्या आहेत. लेणीमध्ये तिच्या बांधकामाचा काळ नमूद करणारा शिलालेख सापडत नाही असे असले तरी इतर लेण्यांप्रमाणेच सातवाहन काळात या लेण्या कोरल्या गेल्या असाव्यात असा निष्कर्ष लेण्यांची रचना पाहून काढता येतो. स्थानिक रहिवाशी लेण्यांना पांडव लेण्या असे म्हणतात. लेण्याच्या उजव्या बाजूस काही अंतरावर चालत गेल्यास कड्यात कोरलेल्या चार ते पाच पायऱ्या स्पष्ट दिसून येतात यावरून समजते की पेणवरून जो रस्ता निघायचा तो सध्याचे हेटवणे धरण जेथे आहे तिथे येऊन या लेण्यांमार्गे खरबाची वाडी करून पुढे जायचा व खोपोली जवळ उंबर खिंडीमार्गे देशावर जायचा. 

पावसाळ्यात आणि नंतर एकूण सहा महिने या लेण्या पूर्णतः पाण्याखाली असतात. पाण्याची पातळी उतरल्यावरच त्या दृष्टीस पडतात. रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील या लेण्या अतिशय महत्वपूर्ण ऐतिहासिक ठेवा आहेत. या लेण्यांबद्दल अधिक प्रमाणात जनजागृती झाल्यास संरक्षित असे पर्यटनस्थळ म्हणून त्याची शासनदरबारी नोंद झाली तर या परिसरातील पर्यटनास चालना मिळून परिसरातील आदिवासी बांधवांचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास होऊ शकतो म्हणून या लेण्यांचा जागतिक स्तरावर जागर होणे काळाची गरज आहे.