पनवेलची प्रसिद्ध कलिंगडे

पनवेल हे शहर ऐतिहासिक महत्व असलेले ठिकाण होतेच मात्र तेथील मातीचे वैशिट्य म्हणजे तेथे फार पूर्वीपासून कलिंगडाचे पीक घेतले जात असे व ही परंपरा कमी प्रमाणात का होईना आजही सुरु आहे.

पनवेलची प्रसिद्ध कलिंगडे
पनवेलची प्रसिद्ध कलिंगडे

आपल्या महाराष्ट्रास कृषी व फलोत्पादन क्षेत्राची खूप जुनी परंपरा आहे व महाराष्ट्रातील प्रत्येक विभागाची जशी स्वतःची एक वेगळी संस्कृती आहे तशीच त्या त्या विभागातील जमिनीची सुद्धा स्वतःची एक वेगळी खासियत आहे. असे म्हणतात की मनुष्य ज्या मातीत जन्म घेतो त्या मातीचा स्वभाव त्यामध्ये उतरतो अशाच प्रकारे वेगवेगळी पिके आणि फळे सुद्धा वेगवेगळ्या मातीच्या कुशीतच फुलू व बहरू शकतात.

महाराष्ट्राच्या विविध भागांतील मातीत विविध प्रकारची पिके, फळे व फुले निर्माण होतात व त्या त्या मातीत निर्माण होणाऱ्या पिके, फळे आणि फुलांची सर ही दुसऱ्या भागात निर्माण होणाऱ्या त्याच प्रकारच्या पिकांना नसते कारण त्या त्या मातीचा कस आणि गुणधर्म यावर आपल्या पूर्वजांनी फार अथक संशोधन केले आणि मगच ही उत्पादने घेण्याची सुरुवात केली त्यामुळे या सर्वांचे श्रेय आपल्या कृषिप्रधान पूर्वजांना द्यावे लागेल.

महाराष्ट्रातील अनेक पिकांना त्यांचे उत्पादन ज्या मातीत घेतले जाते तिच्या गुणधर्मामुळे भौगोलिक चिन्हांकन दर्जा प्राप्त झाला आहे व यात महाबळेश्‍वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्षे व वाइन आणि लासलगावचा कांदा, नागपूरची संत्री, जळगावचे भरीत वांगे आणि केळी, सासवडचे अंजीर, सोलापूरचे डाळिंब, सांगलीचा बेदाणा आणि हळद, जालन्याची मोसंबी, बीडचे सीताफळ, वेंगुर्ल्याचा काजू, घोलवड-डहाणूचे चिकू, मराठवाड्यातील केशर आंबा, कोकणातील हापूस आंबा, सातारामधील वाघ्या घेवडा, रत्नागिरी व सिंधुदुर्गचे कोकण, नागपूर-भिवापूरची मिरची, वर्धा-वायगावची हळद, कोल्हापूरचा गूळ आणि आजराचा घनसाळ तांदूळ, नवापूरची भिवापूर तूरडाळ, पुण्याचा आंबेमोहर तांदूळ आदींचा समावेश होतो.

असे असले तरी महाराष्ट्रात अशी अनेक पिके आहेत ज्यांची नोंद हवी तशी घेतली गेली नाही व भौगोलिक चिन्हांकन मिळण्यापासून ती कायमच वंचित राहिली व अशा असंख्य पिकांपैकी एक म्हणजे पनवेलची कलिंगडे.

वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल कारण रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई शहराचा एक भाग असलेले पनवेल शहरीकरणाच्या गजबजाटात इतके हरवून गेले आहे की तेथील मातीची ओळख सुद्धा आता अस्पष्ट होऊ लागली आहे. पनवेल हे शहर ऐतिहासिक महत्व असलेले ठिकाण होतेच मात्र तेथील मातीचे वैशिट्य म्हणजे तेथे फार पूर्वीपासून कलिंगडाचे पीक घेतले जात असे व ही परंपरा कमी प्रमाणात का होईना आजही सुरु आहे.

आजही आपण पनवेल परिसरात गेल्यास रस्त्यावर दुतर्फा कलिंगड विक्रीची दुकाने दिसून येतात आणि बाहेरून हिरवीगार आणि आतून लालभडक अशी ही कलिंगडे पाहून तोंडाला पाणी सुटते. अनेक विक्रेते सुटी कलिंगडे सुद्धा या ठिकाणी विकताना दिसतात मात्र ही कलिंगडे कुठून तरी बाहेरून पनवेल येथे आयात होत असावीत असे प्रथमदर्शनी कुणालाही वाटते मात्र या कलिंगडाची निर्मिती ही पनवेल तालुक्यातच केली जाते. पनवेलशिवाय आजूबाजूच्या तालुक्यातील म्हणजे जेथील मातीचा गुणधर्म समान आहे अशा ठिकाणीही कलिंगडांची लागवड विपुल प्रमाणात केली जाते.

आधुनिकीकरणाच्या काळात कलिंगड लागवडीची प्रक्रिया बदलली असली तरी फार पूर्वी पारंपरिक पद्धतीने येथे कलिंगडाची शेती घेतली जात असे आणि त्यासाठी तालुक्यातील पड जमिनीचा वापर करण्यात येतो. ही जमीन अनेक दिवस वापरात नसलेली आणि थोडीशी चिकट असते. सुरुवातीस या जमिनीची नांगरणी करून त्यावर मैद फिरवला जातोआणि या नंतर पुन्हा एकदा नांगरणी करून मग दुसऱ्यांदा मैद फिरवला जातो. जमीन भुसभुशीत झाल्यावर कलिंगडाचे शेत तयार करण्याचे काम सुरु होते.

ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यांत शेतात कलिंगडाच्या बिया पेरल्या जातात व ज्यावेळी कलिंगडाची सर्वाधिक गरज असते अशा उन्हाळ्याच्या सुरुवातीस कलिंगडे तयार होतात व त्यांची विविध ठिकाणी विक्री होते. कलिंगड आणि पनवेलचे नाते जुने आहे व या ठिकाणी तयार होणाऱ्या कलिंगडाची चव ही अप्रतिमच असते तेव्हा येथील कलिंगडांना लवकरच भौगोलिक चिन्हांकन मिळावे हीच विनंती.