थळ येथील खुबलढा किल्ला
थळचा कोट हा अरबी समुद्रात आत शिरलेल्या एका भूशिरावर असून त्याची लांबी चाळीस मीटर व रुंदी त्रेचाळीस मीटर आहे व या कोटास चार बुरुज असून दक्षिणेकडे कोटाचे प्रवेशद्वार आहे.
दुर्गांचे जे विविध प्रसिद्ध प्रकार आहेत त्यामध्ये डोंगरी दुर्ग, वन दुर्ग, जल दुर्ग, स्थल दुर्ग आदी दुर्गांचा समावेश होतो. महाराष्ट्रात या चारही प्रकारातील दुर्ग विपुल प्रमाणात आहेत.
दुर्गांच्या या प्रकारांमध्ये स्थलदुर्ग हे भुईकोट या नावाने सुद्धा ओळखले जातात. शनिवार वाडा, पाचाडचा कोट हे भुईकोटच आहेत. भुईकोट हे सहसा जमिनीवर बांधले जातात व त्यांच्या चारही बाजूंना तटबंदी केली जाते.
महाराष्ट्रात एकेकाळी भुईकोट विपुल होते मात्र हे कोट सहसा एखाद्या गावात असल्याने जसजसा गावांचा विस्तार होऊ लागला हे कोट विस्मरणात जाऊ लागले त्यामुळे सध्यस्थितीत महाराष्ट्रात तुलनेने फार कमी भुईकोट पाहावयास मिळतात व ते सुद्धा आता नामशेष होऊ लागले आहेत.
महाराष्ट्रातील असंख्य भुईकोटांपैकी एक म्हणजे थळचा कोट. थळ हे गावं रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यात असून समुद्रकिनारी वसलेले आहे व येथील आर.सी.एफ. प्रकल्पामुळे प्रसिद्ध आहे मात्र या गावास एक संपन्न इतिहास सुद्धा आहे.
मराठेकाळात थळ हे एक मोठे लष्करी केंद्र असून मराठे सैन्याचा एक मोठा तळ या ठिकाणी होता व यावरूनच या गावास थळ हे नाव मिळाले असे म्हटले जाते. त्याकाळी थळ ला एवढे महत्व असण्याचे कारण हे की थळ च्या अगदी समोर उंदेरी आणि खांदेरी हे दोन जलदुर्ग असून या किल्यांना त्याकाळी मोठे महत्व होते. अरबी समुद्रावर वचक ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड जिल्ह्यात कुलाबा, पदमदुर्ग, खांदेरी आदी जलदुर्ग उभारले होते व आणि सिद्दीने जंजिरा, उंदेरी हे जलदुर्ग बांधले होते व खांदेरी व उंदेरी हे जलदुर्ग अनुक्रमे मराठ्यांच्या व सिद्दीच्या ताब्यात असल्याने या परिसरात उभय सैन्यांमध्ये अनेकदा चकमकी होत असत व यामध्ये मुंबईकर इंग्रजांची सिद्दीला कधी छुपी तर कधी उघड मदत होत असे.
सिद्दीच्या उंदेरी येथील कारवाया रोखण्यासाठी आणि त्याला कचाट्यात पकडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी उंदेरीच्या समोर समुद्रकिनाऱ्यावर मोक्याची एक जागा पाहून एक भुईकोट उभारला व हा भुईकोट म्हणजेच थळचा भुईकोट. थळचा भुईकोट आणि खांदेरी जलदुर्ग या दोहोंच्या मध्ये उंदेरी असल्याने दोन्ही बाजुंनी सिद्दीला कचाट्यात आणणे शक्य झाले.
मराठ्यांकडून खांदेरीचा किल्ला हा १६७८ साली बांधला गेल्यावर सिद्दीने उंदेरीचे बेट ताब्यात घेऊन तिथे किल्ला बांधला. याच कालावधीत थळ येथे मराठ्यांचा लष्करी तळ उभारून मराठ्यांनी थळच्या कोटातून उंदेरीवर तोफा डागल्या. सिद्दिनेही उंदेरीतून मराठ्यांच्या थळ येथील तोफांना उत्तर देण्यास सुरुवात केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचा तत्कालीन आरमारप्रमुख दौलतखान यास उंदेरीवर हल्ला करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
थळ कोटाचा अजून एक ऐतिहासिक उल्लेख १७५३ सालच्या एका लढाईत आढळतो. १७५३ साली सिद्दी इब्राहिम याने आबाजी घाडगे नामक सरदाराला आंग्रे यांच्यावर हल्ला करण्यासाठी धाडले आणि त्याने थळ येथे येऊन तेथील गढी काबीज केली. या गढीस त्याकाळी चौबुरुजी असेही म्हणत कारण या गढीला चार बुरुज होते.
मानाजी आंग्रे यांना ही माहिती मिळताच त्यांनी आपले सैन्य घेतले आणि थळ गाठले आणि येथे एक मोठी लढाई झाली मात्र या लढाईत आबाजी यांचा जय झाला आणि मानाजी आंग्रे यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले. यानंतर मानाजी यांनी परत सैन्याची जमवाजमव केली आणि पेशव्यांची कुमक मागवून पुन्हा थळच्या गढीवर हल्ला केला आणि या लढाईत आबाजी घाडगे यांचा दारुण पराभव झाला.
ही लढाई थळ कोटाच्या एका बुरुजाजवळ झाली त्या बुरुजास यानंतर खुबलढा या नावाने ओळखले गेले आणि सध्या थळ कोटास खुबलढा याच नावाने ओळखले जाते.
थळचा कोट हा अरबी समुद्रात आत शिरलेल्या एका भूशिरावर असून त्याची लांबी चाळीस मीटर व रुंदी त्रेचाळीस मीटर आहे व या कोटास चार बुरुज असून दक्षिणेकडे कोटाचे प्रवेशद्वार आहे. कोटाच्या दक्षिणेकडे थळ गावं असून कोटाच्या पूर्वेकडे आणि उत्तरेस खाडी आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे व पश्चिम दिशेने एक निमुळती वाट थेट अरबी समुद्रात शिरली आहे.
थळचा कोट अनेक वर्षे उपेक्षित होता मात्र गेल्या काही वर्षात या किल्ल्यास भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मराठ्यांच्या आरमारी इतिहासातील एक महत्वाचा किल्ला म्हणून थळच्या किल्ल्याचे महत्व आजही अबाधित आहे.