शर्वरी रॉय चौधरी - एक अष्टपैलू शिल्पकार

मातीमधून वा दगडातून किंवा धातूवरही काम करून त्या निर्जीव गोष्टीमध्ये जणू कुणाचे प्राण फुंकून ती प्रतिमा जिवंत करणे ही कला आज कुठे दिसायलाही फार दुर्मीळ!

शर्वरी रॉय चौधरी - एक अष्टपैलू शिल्पकार

शिल्पकला ही अत्यंत अवघड, उत्तम पण कलाप्रेमींमध्ये थोडीशी दुर्लक्षिलेली अशी कला आहे. शिल्प साकारणारे कलाकार मात्र व्यासंगी असतात हे निर्विवाद कारण जी कलाकृती तयार करायची ती समजून उमजून त्याचे अंगभूत गुण त्या ‘शिल्प-साहित्यात’ उतरवणे हे फार कसबी काम आहे. समोरील व्यक्ती किंवा विषय, स्वतःचे विचार, हातातील कला व त्याची साधना आणि शिल्प घडवण्यासाठीचे साहित्य ह्या सर्वांचा संपूर्ण मेळ घडून कालांतराने उभी राहणारी अशी ही एक सुंदर कला आहे. 

माझा ह्या कलेवर जीव ज्या कलाकारामुळे जडला त्यांचा आज जन्मदिन! कै. शर्वरी रॉय चौधरी हे एक आनंदी व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि शिल्पकार होते. शास्त्रीय संगीत हा विषय त्यांना शिल्पकलेइतकाच जिव्हाळ्याचा होता. ह्या जिव्हाळ्यामुळेच त्यांनी उ. अली अकबर खान साहेब, विदुषी केसरबाई केरकर, आचार्य अल्लाउद्दीन खान साहेब व अशा कित्येक गुणीजन दिग्गजांची उत्तम शिल्पे घडवली. ही शिल्पे नुसती न्याहाळत बसण्यातही कुणी जिज्ञासू व्यक्ती अनंत काळ खर्ची घालू शकेल! 

२१ जानेवारी १९३३ साली आजच्या बांगलादेश येथील उलपूर ह्या गावी एका जमीनदार घराण्यात त्यांचा जन्म झाला. मोठ्या घरात जन्मूनही त्यांचा कलेप्रती असणारा ओढा वाखाणण्यासारखा होता. त्यांचे सर्व शिक्षण कलकत्ता येथील शासकीय कलामहाविद्यालय येथे झाले. १९५६ साली ते कला पदवीधर झाले. बडोदा येथील दिग्गज कलाकार, प्रदोष दासगुप्ता आणि शंखो चौधरी ह्यांच्याकडून १९६० आणि १९६२ साली त्यांनी पुढील मार्गदर्शन व शिक्षण घेतले. त्यानंतर ते विभाग प्रमुख म्हणून आर्ट कॉलेज कलकत्ता इथे रूजू होते. पण शर्वरीजी हे नित्य सापडत ते कलाभवन विश्वभारती, शांतिनिकेतन येथेच! १९६९ ते १९९७  इतक्या मोठ्या कालावधीत त्यांनी ह्या जागी उत्तमोत्तम कलाकृती तयार करत कलासाधना केली. ह्याच जागी, शास्त्रीय संगीताच्या प्रेमामुळे, त्यांचा वेगवेगळ्या कलाकार मंडळींशी घनिष्ठ स्नेह जमला. कितीही नावे लिहिली तरी ती कमीच असतील. महाराष्ट्र भूषण कै. पु. ल. देशपांडे ह्यांच्या बरोबर झालेली त्यांची घट्ट मैत्री इथेच जन्मास आली!

पु. ल., पं. मल्लिकार्जुन मन्सूर, उ. अली अकबर खान साहेब ही त्यांची काही जिवलग आप्तेष्ट मंडळी! कै. शर्वरी रॉय ह्यांची शिल्पे देश-विदेशात पसंत केली जातात. त्यांच्या जगावेगळ्या कलासक्त दृष्टीने त्यांनी घडवलेली शास्त्रीय संगीतकारांची शिल्पे पाहून जणू असे वाटते की तो कलाकार आपल्या समोरच उभा आहे. कै. शर्वरी रॉय ह्यांना त्यांच्या कलेच्या सेवेकरीता ‘गगन अबनी पुरस्कार’ आणि ‘आबानिंद्र पुरस्काराने’ गौरवण्यात आलेले आहे.

२१ फेब्रुवारी २०१२ ह्या दिवशी शर्वरीजी अनंतात विलीन झाले.

ज्यांची कलाकृती पाहून, नकळतपणे चेहऱ्यावर स्मित फुलते, त्यांनी घडवलेल्या कलाकारांच्या मूर्ती/ शिल्पे पाहून डोळ्यांच्या कडा त्यांच्या आठवणीने व्याकुळ होऊन ओल्या होतात असे कै. शर्वरी-दा ह्यांचा हा अल्प-परिचय! आपल्या सिध्दहस्त लेखणीमधून अष्टपैलू पु. ल. देशपांडे ह्यांनी कै. शर्वरी रॉय चौधरी ह्यांचा जो गौरव केलाय तो पुन्हा पुन्हा वाचण्यासारखा आहे. पु. लं ह्यांनी अतिशय मार्मिकपणे एका कलाकाराच्या कलागुणांचा गौरव केलाय, मी पामर यावर अजून काय लिहू..!!

- नंदन वांद्रे , पुणे