पक्ष्यांशी बोलणारा अवलिया - काष्ठशिल्प संग्रहालय बुरंबी

माणसाचे आयुष्य समृद्ध होण्यासाठी त्याला कुठला ना कुठला तरी छंद हवा असं सांगितलं जातं. तो छंद जोपासताना तो माणूस त्यात रममाण होऊन जातो आणि आयुष्यातला तोच तो पणा कधीही त्याच्या वाट्याला येत नाही असं म्हणतात.

पक्ष्यांशी बोलणारा अवलिया - काष्ठशिल्प संग्रहालय बुरंबी
काष्ठशिल्प संग्रहालय बुरंबी

हे छंद त्या माणसाला आनंद तर देतातच पण त्याचबरोबर हे छंद समाजालासुद्धा समृद्ध करण्यासाठी उपयोगी ठरतात.

ही कथा आहे अशाच एका मनोभावे जोपासलेल्या निराळ्या छंदाची आणि तो जोपासणाऱ्या छांदिष्ट माणसाची. दिलीप म्हैसकर हे त्यांचे नाव आणि लाकडाच्या ओंडक्यातून निरनिराळी काष्ठशिल्पे बनवणे हा या माणसाचा छंद. संगमेश्वर वरून देवरुखला जायला लागले की 5 कि.मी. वर बुरंबी गाव आहे. या गावात आहे म्हैसकरांचे काष्ठशिल्प संग्रहालय. हे संग्रहालय त्यांच्या राहत्या घराच्या ओसरीवरच आहे. माध्यमिक शाळेत लिपिक असलेल्या म्हैसकरांना जंगलात, रस्त्यावर पडलेल्या लाकडाच्या ओंडक्यांमध्ये विविध आकार दिसू लागले. ते लाकडाचे ओंडके म्हैसकर घरी आणायचे आणि ते स्वच्छ करून, त्यावरील अनावश्यक भाग काढून टाकला की त्यात दडलेले विविध आकार उठून दिसत. काहीवेळेला त्यांनी त्या ओंडक्यांना सुडौल होण्यासाठी आकार दिलेले आहेत. काही ठिकाणी पक्षांच्या चोची किंवा प्राण्यांचे कान बाहेरून चिकटवलेले आहेत. जवळजवळ सव्वाशेपेक्षा जास्त वस्तू त्यांच्या संग्रहालयात आहेत.

दिलीप म्हैसकरांनी हा छंद ४० वर्षांहून जास्त काळ जोपासलेला आहे. त्यासाठी त्यांना कधीकधी वेंगुर्ल्यापासून लाकडे आणावी लागली आहेत. कधी रिक्षातून तर कधी टेंपो, गाडी अशा जमेल त्या वाहनातून त्यांनी ही लाकडे जमा केली. लाकूड आणल्यावर त्यावरचा अनावश्यक भाग काढून टाकणे, साधारण आकार आला की ते लाकूड उन्हात वाळवणे एवढी या सगळ्याची उस्तवार करावी लागते. लाकडाला साल असेल तर ती आधी काढून टाकावी लागते नाहीतर लाकूड लवकर खराब होते. बारीक भोके असतील तर त्यात औषधे मारावी लागतात. तसेह सगळ्या शिल्पांना वर्षातून ४ वेळा पॉलिश करावे लागते. शिवण किंवा सागवान लाकडे असतील तर ती ९०% चांगली असतात. आंब्याचे लाकूड लवकर खराब होते. एखादा छंद जोपासताना त्यातल्या बारीकसारीक गोष्टींची किती माहिती असावी लागते हे श्री म्हैसकरांशी बोलताना जाणवतं. त्यांनी आपल्या या संग्रहालयाला वुड वर्ल्ड फीस्ट (WWF) असे नाव दिलेले आहे. निश्चितच त्यांचा हा संग्रह पाहणे ही एक मोठी पर्वणी आहे.

खरंतर हे म्हैसकर कुटुंबीय मूळचे संकेश्वरचे. तिथल्या मंदिराचे हे पुजारी. पण तिथे आलेल्या प्लेगच्या साथीत दिलीप म्हैसकरांच्या आजी-आजोबांचे निधन झाले. म्हैसकरांचे वडील तिकडून देवरुख इथे आले आणि इथेच स्थायिक झाले. इथल्या माध्यमिक शाळेचे ते मुख्याध्यापक होते.

श्री. म्हैसकरांच्या काष्ठशिल्पांत गणपती, जिराफ, हरीण, उंट, मगर, डायनासोर, एकलव्य, गरुड, शिवाजी महाराज अशी विविध शिल्पे बघता येतात. त्यातले एक आगळेवेगळे काष्ठशिल्प म्हणजे लक्ष्मण या सुप्रसिद्ध व्यंगचित्रकाराने चितारलेल्या कॉमन मॅनचे. आश्चर्यकारकरित्या हुबेहूब तसेच लाकडाचे हे शिल्प आपल्याला आश्चर्यचकित करते.

काही माणसे खरोखरच अवलिया असतात. श्री. म्हैसकरांचे अजून एक थक्क करणारे वैशिष्ट्य म्हणजे ते पक्ष्यांशी बोलतात. त्यांनी शिट्टी वाजवली की त्यांच्या आजूबाजूला परिसरातले पक्षी, खारी जमा होतात आणि त्यांच्या मांडीवर बसून त्यांनी दिलेले दाणे टिपतात. कुठल्या पक्ष्याला कुठले धान्य आवडते हे देखील श्री. म्हैसकर सांगतात. हे पक्षी अगदी निर्धोकपणे त्यांच्या जेवणाच्या टेबलावरसुद्धा येतात. निसर्गाशी एकरूप झाले की माणूस समृद्ध होतो असे म्हटले जाते. श्री दिलीप म्हैसकर याचे चालतेबोलते उदाहरण आहे. निर्जीव लाकडाला सजीव प्राणी-पक्षांचे रूप देणारे म्हैसकर, सजीव पक्ष्यांसोबतसुद्धा तितक्याच तन्मयतेने रमलेले दिसतात.

आपले आयुष्य हे आपला छंद जोपासण्यासाठी वाहून देणारे श्री दिलीप म्हैसकर ह्यांना खरंच कोकणचा एक अनमोल दागिना म्हणायला हवा. कोकणात इतक्या आडबाजूला त्यांनी जोपासलेला काष्ठशिल्प संग्रह आवर्जून बघायला हवा. पक्ष्यांशी संवाद साधणारे म्हैसकर हे एकदातरी प्रत्यक्ष अनुभवायला हवेत.

श्री दिलीप म्हैसकरांचा संपर्क ९४०३८००६७६

-  श्री आशुतोष बापट