वाघळी येथील सूर्यमंदिर

चाळीसगावपासून फक्त १२ कि. मी. वर वाघळी हे छोटेसे गाव आहे. इथून वाहते तितूर नदी. या नदीच्या काठी वसले आहे हे सुंदर शिल्पांकित मंदिर.

वाघळी येथील सूर्यमंदिर
वाघळी येथील सूर्यमंदिर

चाळीसगावपासून फक्त १२ कि. मी. वर वाघळी हे छोटेसे गाव आहे. इथून वाहते तितूर नदी. या नदीच्या काठी वसले आहे हे सुंदर शिल्पांकित मंदिर.

इ.स. च्या १२ व्या शतकात बांधलेल्या या मंदिराला ‘मुधई देवीचे’ मंदिर असे म्हणतात. सध्या मंदिरात जरी देवीची मूर्ती विराजमान असली तरी मूळचे हे सूर्यमंदिर असणार.

कारण मंदिरावर भरपूर सूर्यमूर्ती शिल्पांकित केलेल्या आहेत. शिवाय मंदिरावरील पार्श्वदेवता म्हणजे गाभाऱ्याच्या भिंतीवर बाहेरच्या बाजूला असलेल्या कोनाड्यात देखणी सूर्यमूर्ती उभी आहे. गाभाऱ्याच्या उर्वरित दोन बाजूंवर असलेल्या देवकोष्ठात गणपती आणि चामुंडा देवीच्या मूर्ती दिसतात. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचा आकार तारकाकृती आहे. मंदिराला आता शिखर नाही. पण गाभाऱ्याच्या दरवाजावर नवग्रहांच्या मूर्ती आहेत. महाराष्ट्रात हा प्रकार अत्यंत दुर्मिळ.

मंदिर परिसर अतिशय शांत. आजूबाजूला काही अवशेष पडलेले आहेत त्यावरसुद्धा सूर्यप्रतिमाच दिसतात. मंदिराच्या सभागृहाला २४ खांब आहेत. एका बाजूला असलेल्या या मंदिराचा परिसर अतिशय रमणीय. शेजारीच तितूर नदी शांतपणे वाहते आहे. खान्देशच्या भेटीत इथे मुद्दाम थांबून हा परिसर आणि हे शिल्पांकित मंदिरवैभव अवश्य बघावे असे आहे.

- आशुतोष बापट