श्रीगुंडी - मुंबईतील एक जागृत देवस्थान

श्रीगुंडी हा परिसर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असून भाविकांना दर्शन घेणे शक्य व्हावे म्हणून कातळात पायऱ्या खोदण्यात आल्या होत्या.

श्रीगुंडी - मुंबईतील एक जागृत देवस्थान
श्रीगुंडी

मुंबईच्या अर्थात पूरीच्या प्राचिनतेचा पुरावा देणारे आणखी एक स्थळ म्हणजे वालुकेश्वर अथवा मलबार हिल परिसरातील श्रीगुंडी हे धार्मिक स्थान.

हे प्राचीन स्थान सध्याच्या राजभवन परिसरात असून त्याच्या नावात द्राविडी छाप दिसून येते.

श्रीगुंडी या स्थळाचा महिमा असा आहे की या स्थळाचे दर्शन घेतल्यास अथवा प्रदक्षिणा घातल्यास पापांचे क्षालन होते त्यामुळे फार पूर्वीपासून या स्थळाचे दर्शन घेण्यास दूरदूरहून लोक भेट देत असत.

मध्ययुगातील काही प्रसिद्ध व्यक्तींनी सुद्धा या स्थळास भेट दिल्याचे उल्लेख आढळतात.

हे ठिकाण अरबी समुद्रास खेटून असलेल्या एका टेकडीवर असून अतिशय अवघड अशा जागी आहे त्यामुळे पावसाळा अथवा खराब हवामान असेल तर येथे जाणे अशक्य असते.

हा परिसर सध्या राजभवनाच्या अखत्यारीत येत असल्याने पूर्वपरवानगी शिवाय येथे जाणे शक्य नसते मात्र श्रीगुंडी हे स्थान स्थानिक मुंबईकरांचे श्रद्धास्थान असल्याने गुरुपौर्णिमेच्या पहिल्या मंगळवारी या ठिकाणी एक जत्रा असते व यावेळी सर्व नागरिकांसाठी या स्थळाचे दर्शन उपलब्ध केले जाते.

श्रीगुंडी हा परिसर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असून भाविकांना दर्शन घेणे शक्य व्हावे म्हणून कातळात पायऱ्या खोदण्यात आल्या होत्या मात्र मुंबईच्या प्राचीन इतिहासाचा हा ठेवा सध्या मुंबईच्या इतिहासासारखाच अज्ञातवासात आहे.