मोहरीचे अमृतेश्वर मंदिर व कुंड

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात प्राचीन शिवमंदिरांची एक शृखंलाच आहे. रायरेश्वरचा रायरेश्वर, भोरचा भोरेश्वर, आंबवडेचा नागनाथ/ नागेश्वर, भांबटमाळचा शंभू महादेव, नसरापूरचा बनेश्वर व मोहरीचा अमृतेश्वर ही भाविकांची श्रद्धास्थाने असून भक्तांना आत्मिक समाधान देणारी शक्तीपीठे आहेत.

मोहरीचे अमृतेश्वर मंदिर व कुंड
मोहरीचे अमृतेश्वर मंदिर व कुंड

ऐतिहासिक गुंजन मावळातील किल्ले राजगड मधून उगम पावणा-या गुंजवणी नदीच्या तीरावर वसलेले मोहरी हे गाव. अमृतेश्वरच्या पौराहित्याची जबाबदारी वंशपरंपरेने शिवकाळापासून सांभाळणारे राजगुरु हे राजगड किल्ल्यावरील पद्मावती मातेच्या पुजेचे देखील सेवेकरी.

मध्ययुगात न्यायदानाचे "अग्नी साक्ष" व दैव साक्ष असे दोन प्रकार होते. अग्नी साक्ष दिव्याचे देखील तीन प्रकार होते. १) रवा दिव्य २) अग्नी दिव्य ३) ऐरणी दिव्य यातील रवा दिव्य प्रकारात उकळत्या तेलातून लोखंडाचा गोळा किंवा सोन्याचा लहान गोळा हाताने बाहेर काढण्याची प्रक्रिया वादी व प्रतिवादी या दोघांनाही करावी लागे. ज्याच्या हातास कमी इजा होई तो सत्य तर दुसरा कथला होई.अशा प्रकारचे रवा दिव्य या मंदिरात व शिरवळ येथील केदारेश्वर मंदिरात झाल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. शिवकाळात गुंजन मावळातील मोहरी बुद्रुक येथील या मंदिरात एक दिव्य झाल्याचे सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.

पुरंदर तालुक्यातील सोनोरी व दिवे या गावच्या गावकुलकर्णचे हक्क गिधवे यांच्याकडून वंशपरंपरेने गोविंद विश्वनाथ पानसे यांना मिळाले होते, परंतु रामाजी गावखंडेराव हे आपला हक्क सांगत होतो. हा वाद सर्व प्रकारांनी सुटत नव्हता तेव्हा शेवटचा मार्ग म्हणजे दिव्य करणे. या बाबतची तक्रार छत्रपति शिवाजी महाराज यांच्याकडे इ.स.१६६८ मधे राजगडावर आली. तेव्हा छत्रपतिंनी या तंट्याचा निवाडा करण्यासाठी सरकारातून बाबाजी मोरदेव चिटणीस व मलकोजी कदम नावाच्या अंमलदारास सरकारतर्फेचे अधिकारी म्हणून नियुक्त करून मोहरी येथील अमृतेश्वर मंदिर येथे पाठविले. याशिवाय अष्टप्रधानांचे कारकून व हुजरे देखील पाठविले. या दिव्य प्रसंगी सोनोरी व मोहरी या दोन्ही गावचे मोकादम व बलुतेदार उपस्थिती होते. दोन्ही वादी-प्रतिवादी यांच्या हाताची नखे काढून पाण्याने स्वच्छ केले व हातावरील अवस्था कशी याची तपशिलवार टिपणे नोंदवून घेतली.त्यानंतर दोघांच्या हातांना तेल लावून हातावर हिरवी पाने बांधली. बांधलेल्या कापडावर सरकारतर्फे मोहर उमटवून सील करण्यात आले. दुसऱ्या दिवशी मंदिर परिसरात सात गोल आखून घेतले. सातव्या गोलात कढईत उकळते तेल होते. वादी व प्रतिवादी यांच्या हाताचे सील खोलून पुन्हा तपासणी केली गेली. त्यात कोणताही बदल झालेला नसल्याने ते खोलून काही पदार्थ लावले नसल्याची पंचासमक्ष खात्री केली जाते. मग पुन्हा एकदा आपापला हक्क सांगणे होते. त्यावेळी त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेऊन ते दोघांच्या डोक्याला बांधले जाते. प्रथम गोविंद विश्वनाथ यांनी उकळत्या तेलातून दोन मास वजनाचे रवा काढून त्या सात गोलातून चालत बाहेर आले त्यानंतर रामाजी हे तेलातून रवा काढण्यास गेल्यावर हाताला भाजल्याने त्यांनी रवा बाहेर काढला नाही.मग दोघांच्या हाताला पाने गुंडाळून कापडाने बांधून अधिकाऱ्यांनी सील केले. दुसरे दिवशी पंचासमोर दोघांचेहि सील पाहून हात सोडले गेले. त्यानंतर दोघांच्याहि हातांचे परिक्षण केले. गोविंद पानशेचे हातास कुठेहि फोड किंवा जखम नव्हती मात्र रामजीच्या हाताला मोठे फोड आले होते. या दिव्य किंवा मजहर पानसे यांच्या बाजूने होऊन ते वतनदार म्हणून सिद्ध झाले तर रामजी खोटे निघाले. मग दोघेहि राजगडावर जाऊन छत्रपति समोर हजर झाले. महाराजांनी पानसे यांना व संबंधितांना कारकूना मार्फत निवाड्याचे कागदपत्र तयार करून दिले. या वादात अनेक साक्षीदार होते, परंतु त्यातील जानोजी हौजी पाटील सोनोरीकर याने रामाजी गावखंडेराव याच्या बाजूने गोतसभेत साक्ष दिली होती तर बारा गावच्या मोकादम, मोख्तेकर, बलुते यांनी गोविंद विश्वनाथ पानसे यांच्या बाजूने साक्षदिली होती. जानोजीने खोटी जबानी किंवा साक्ष दिल्यामुळे त्या राजगडाच्या दरबार राजसभा व छत्रपति महाराज शिक्षा करीत होते पण तेथे गोविंद विश्वनाथ यांनी विनंती केल्याने त्याची शिक्षा टळली. त्याच्या जबानीमुळे अमृतेश्वर येथे दिव्य करावे लागले होते.

पुढील काळात शिवाजीमहाराजांचे राजपत्र, गिधव्यांचे दानपत्र, मोहरी येथील थळपत्र व रामाजी गावखंडेरावांचे अजीतपत्र अशी चार पत्रे जीर्ण झाल्यामुळे, गोविंद विश्वनाथ पानसे यांचे नातु खंडो शिवदेव यांनी छत्रपति शाहुकडे साता-याला जाऊन नुतनिकरण इ.स.१७४२ मधे करून घेतले.( संदर्भ - पानसे घराण्याचा इतिहास १९२९ मधे प्रकाशित )

अमृतेश्वर मंदिर शिल्पसौंदर्याचा खजिना असलेले ठिकाण आहे. दगडी बांधकामातील मंदिरावर शक्तीचे प्रतिक असलेले गंडभेरुड, वाघ, हत्ती, गाय, बैल, कमळ अशी शिल्प कोरलेली आहेत. पूर्वाभिमुखी असलेल्या अमृतेश्वराच्या पिंडींखालून पाण्याचा प्रवाह सतत वाहत असतो मात्र ते पाणी मंदीराच्या जवळच उत्तरेस असलेल्या कुंडात येते. येथे दगडी बांधकामातील सुरेख तीन कुंड आहेत. कलात्मक पद्धतीने बांधलेली ही कुंड प्रेक्षणीय आहेत. या कुंडातील पाणी वर्षभर असते असे येथील स्थानिक व देवस्थानचे पुजारी श्री.किरण राजगुरु हे सांगतात.

- सुरेश नारायण शिंदे, भोर ([email protected])

मराठी भाषेतील लोकप्रिय व वाचनीय पुस्तके

इतिहास भवानी तलवारीचा Buy from Amazon Buy from Flipkart
मुंबईचा अज्ञात इतिहास Buy from Amazon Buy from Flipkart
नागस्थान ते नागोठणे Buy from Amazon Buy from Flipkart
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट Buy from Amazon Buy from Flipkart
रुळलेल्या वाटा सोडून Buy from Amazon Buy from Flipkart
इतिहासावर बोलू काही Buy from Amazon Buy from Flipkart
शिवकाळातील अपरिचित प्रसंग Buy from Notion Press
महाराष्ट्रातील देवस्थाने Buy from Notion Press
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा Buy from Notion Press
दुर्ग स्थल माहात्म्य Buy from Notion Press

मराठी भाषेतील लोकप्रिय व वाचनीय पुस्तके

इतिहास भवानी तलवारीचा Buy from Amazon Buy from Flipkart
मुंबईचा अज्ञात इतिहास Buy from Amazon Buy from Flipkart
नागस्थान ते नागोठणे Buy from Amazon Buy from Flipkart
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट Buy from Amazon Buy from Flipkart
रुळलेल्या वाटा सोडून Buy from Amazon Buy from Flipkart
इतिहासावर बोलू काही Buy from Amazon Buy from Flipkart
शिवकाळातील अपरिचित प्रसंग Buy from Notion Press
महाराष्ट्रातील देवस्थाने Buy from Notion Press
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा Buy from Notion Press
दुर्ग स्थल माहात्म्य Buy from Notion Press