गोकर्ण महाबळेश्वर - शिवाच्या आत्मलिंगाचे स्थान

स्वर्गलोकातून विष्णू, ब्रम्हा, इंद्र आणि सर्व देव हे दृश्य पाहत असताना सर्वांच्या साक्षीने गणपतीने हे आत्मलिंग जमिनीवर ठेवले व यानंतर ते लिंग तिथेच स्थिर झाले.

गोकर्ण महाबळेश्वर - शिवाच्या आत्मलिंगाचे स्थान

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

भारतातील विख्यात देवस्थानांपैकी एक असलेले गोकर्ण महाबळेश्वर हे शिवमंदिर कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात स्थित आहे. सप्तकोकणांपैकी एक कोकण विभाग कर्नाटक राज्यात येतो व या ठिकाणी अरबी समुद्राच्या सानिध्यात हे मंदिर असून देवस्थानाच्या तीनही दिशांना डोंगरांचे वेष्टन आहे. ज्या ठिकाणी हे मंदिर आहे ती जमीन दोन बाजुंनी खाडी असल्याने गायीच्या कानासारखी भासते व यामुळे या भागास गोकर्ण असे नाव मिळाले असावे.

गोकर्ण महाबळेश्वराच्या उत्पत्तीचा इतिहास सुद्धा रंजक असून तो रामायण काळात जातो. रावणाचा पित्याचे नाव पुलत्स्य असून तो ब्राह्मण होता आणि त्याची पत्नी व रावणाची माता केकया ही होती. केकया ही अतिशय धार्मिक वृत्तीची असून शिवभक्त होती आणि दररोज शिवलिंगोपासना केल्याशिवाय ती अन्नप्राशन करीत नसे. केकयास शिवाचा आशीर्वाद प्राप्त असल्याने तिला नित्य पूजेस स्वयंभू लिंगाचा लाभ होत असे मात्र एके दिवशी तिला पूजेस स्वयंभू लिंग मिळाले नाही त्यामुळे तिने मृत्तिकेचे लिंग तयार करून त्याची उपासना केली.

यावेळी रावण तेथे आला व आपल्या मातेस मृतिक्का लिंगाची पूजा करताना पाहून म्हणाला की मृत्तिकेच्या लिंगाऐवजी मी तुझ्यासाठी थेट कैलास पर्वतात जाऊन कैलास पर्वतासहित ईश्वरास लंकेस घेऊन येतो आणि मग तू नियमीत साक्षात ईश्वराची पूजा नित्य करू शकशील.

यानंतर रावणाने कैलास पर्वताकडे प्रस्थान केले व आपल्या बलाच्या वापराने तो कैलास पर्वत उपटण्याचा प्रयत्न करू लागला. कैलास पर्वतावर आरूढ शंकरास हे समजताच त्याने आपल्या डाव्या हाताने वरून दाब दिला आणि त्यामुळे रावण कैलास पर्वताखाली दबला गेला आणि त्यास शंकराच्या शक्तीची कल्पना येऊन त्याने शिवस्तुती सुरु केली. ही स्तुती ऐकून शंकर प्रसन्न झाले व रावणाकडे वर मागितला व यावेळी रावणाने सांगितले की माझी लंका सर्व गोष्टींनी समृद्ध आहे मात्र आपले आत्मलिंग तेथे असल्यास लंकेस परिपूर्णता येईल व माझ्या आईला आपली सेवा करता येईल तेव्हा आपण कैलास पर्वतासहित तेथे येऊन माझी इच्छा पूर्ण करावी.

यावर शंकर म्हणाले की मी कैलास सोडून कुठेही कायमचा राहू शकत नाही मात्र तुला वर दिल्यानुसार माझे आत्मलिंग मी तुला देतो व ते तू मार्गात कुठेही जमिनीवर न ठेवता थेट लंकेस जाऊन त्याची स्थापना कर आणि तीन वर्षे तीन काळ त्याची पूजा केल्यास तुला साक्षात शिवपद प्राप्त होईल.

रावणाने आनंदाने आत्मलिंग घेतले व त्याने लंकेस प्रस्थान सुरु केले मात्र ही गोष्ट देवादिकांना समजली आणि सर्व चिंतेत बुडाले कारण रावण हा राक्षस कुळातील असल्याने त्याला जर शिवपद प्राप्त झाले तर तो देवांचा नाश केल्याशीवाय राहणार नाही त्यामुळे सर्व देवता मदत मागण्याकरिता विष्णूकडे गेल्या व करुणा भाकली. पुढील काळात रामावतार धारण करून रावणाचा वध करण्याची योजना पूर्वीच तयार झाली होती व जर रावणास आत्मलिंगाच्या उपासनेने अमरत्व प्राप्त झाले तर ही योजना सफल होणार नाही असा विचार करून विष्णूने नारदास सांगितले की तू त्वरित रावणाच्या मागावर जाऊन त्यास गाठून बोलण्यात गुंतवून ठेव आणि नंतर विष्णूने गणपतीस आवाहन केले व ब्रह्मचाऱ्याचे रूप घेऊन रावणास भेटून ते आत्मलिंग स्वतःकडे घ्यावे. 

यानंतर नारद रावणाच्या दिशेने निघाला व एका स्थळी दोघांची भेट झाली आणि नारदाने रावणासोबत गप्पा मारण्यास सुरुवात केली व त्याची स्तुती सुरु ठेवली आणि जवळ असलेल्या आत्मलिंगाची महानता कथन करून रावणास मार्गात रोकुन ठेवले आणि संध्याकाळ झाल्यावर नारदाने तेथून निरोप घेतला आणि गणपती ब्रह्मचारी बालकाच्या रूपात तेथे आला. रावण स्वतः अत्यंत धार्मिक असल्याने संध्याकाळ च्या समयी संध्यापूजा करीत असे मात्र हातात आत्मलिंग असल्याने संध्या कशी करता येईल असा विचार करताना त्याला बालकरूपातील गणेश दिसला व माझी संध्या समाप्त होईपर्यंत हे लिंग धरून ठेव अशी विनंती करून रावणाने संध्या सुरु केली आणि यानंतर हातात बराच वेळ आत्मलिंग घेतलेल्या गणेशाने रावणास एकूण तीन वेळा हाक मारली मात्र रावण संध्येत मग्न असल्याने त्याने गणपतीस काही काळ वाट पाहावयास सांगितले.

याचवेळी स्वर्गलोकातून विष्णू, ब्रम्हा, इंद्र आणि सर्व देव हे दृश्य पाहत असताना सर्वांच्या साक्षीने गणपतीने हे आत्मलिंग जमिनीवर ठेवले व यानंतर ते लिंग तिथेच स्थिर झाले. लिंगाची स्थापना झाल्यावर स्वर्गलोकातून पुष्पवृष्टी झाली. संध्या झाल्यावर रावण परत आला आणि त्याने पहिले की लिंगाची जमिनीवर स्थापना झाली आहे आणि तो बाल ब्रह्मचारी नाहीसा झाला आहे. यानंतर रावणाने ते लिंग उचलण्याचे अथक प्रयत्न केले मात्र त्यास ते शक्य झाले नाही व शेवटी निराश होऊन रावणास लंकेस प्रस्थान करावे लागले.

अशाप्रकारे साक्षात कैलासाहून शंकराच्या हस्ते रावणास भेट मिळालेले आत्मलिंग गणपतीद्वारा ज्या ठिकाणी स्थापन झाले त्यास महाबळेश्वर असे नाव प्राप्त झाले आणि ते ज्या ठिकाणी स्थापित झाले त्यास गोकर्ण महाबळेश्वर या नावाने ओळखले जाते.