आपल्या पूर्वजांची संतुलित दिनचर्या
अदमासे शंभर दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे ज्या काळात सध्याचे तंत्रज्ञान नव्हते त्या काळात त्यांची सरासरी दिनचर्या कशी होती हे आपण थोडक्यात जाणून घेऊ.
माणसाचे संपूर्ण आयुष्यमान हे मुख्यतः दिवस व रात्रीच्या २४ तासांत विभागले गेले असतात. या २४ तासांच्या काळात कुठल्या वेळी काय करावे याचे नियम फार पूर्वीपासून आखून देण्यात आले होते.
काळ बदलला तसे नियमही बदलले. आधुनिक काळात झालेल्या जागतिकीकरणामुळे मनुष्याला दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा लागतो कारण जर आपण काम करीत असलेली संस्था बाहेरील देशातील असेल तर त्या देशाच्या वेळेनुसार काम करणे भाग असते.
अशामुळे दिवसही मॉर्निग शिफ्ट, आफ्टरनून शिफ्ट, इव्हिनिंग शिफ्ट आणि नाईट शिफ्ट अशा चार भागांत विभागला गेला आहे. हल्ली पहाटेची शिफ्ट हा नवा प्रकार सुद्धा निर्माण झाला आहे.
तर ही झाली आजची दिनचर्या मात्र अदमासे शंभर दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे ज्या काळात सध्याचे तंत्रज्ञान नव्हते त्या काळात त्यांची सरासरी दिनचर्या कशी होती हे आपण थोडक्यात जाणून घेऊ.
त्याकाळीही दिवस २४ तासांचाच असे व तो सकाळी ५ वाजता सुरु होत असे.
- ५ वाजता उठण्याचा दंडक होता व यानंतर ७ वाजेपर्यंत शुचिर्भूत होणे, प्रातःस्मरण करणे, आजच्या दिवसात काय कामे करायची आहेत याचा विचार करणे, अभ्यास व नाश्ता करणे ही कामे करावी लागायची.
- यानंतर ७ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत शेती, व्यापार उदीम, चाकरी यामध्ये लक्ष द्यावे लागायचे.
- ११ ते दुपारच्या १ वाजेपर्यंत पुस्तके वाचणे, हिशोबाचे काम आणि दुपारचे जेवण ही कामे करावी लागायची.
- १ वाजल्यावर पुन्हा काम धंद्यास सुरुवात व्हायची व हे कार्य संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालायचे.
- ५ वाजल्यावर घरी येऊन सर्व वस्तूंची आवरा आवर, संध्याकाळचे जेवण, गायन, वाद्य, संभाषण, करमणूक आणि संपूर्ण दिवसांत आपण काय केले याचा हिशोब ही कामे करावी लागायची. हे सर्व रात्री १० पर्यंत चालत असे.
- रात्रीचे १० वाजले की सरळ बिछान्यावर जाऊन झोप घ्यायची आणि १० ते ५ म्हणजे ७ तास झोप घेऊन पुन्हा पुढील दिवसास सुरुवात करायची अशी एकूण दिनचर्या आपल्या पूर्वजांची असे.
आधुनिकीकरणाचा मुख्य प्रभाव भारतातील लोकांच्या दिनचर्येवर पडला आणि सर्व वेळापत्रकच बदलले मात्र जुन्या काळातील वेळापत्रक अतिशय अभ्यास करून तयार करण्यात आले होते व त्यामुळे सध्या दिसून येणारे आरोग्यावरील दुष्परिणाम जुन्या लोकांवर फारसे दिसत नसत व त्यांचे आरोग्य निरायमान असे असायचे. मात्र कालाय तस्मै नमः या उक्तीप्रमाणे आधुनिक काळाशी जुळवून घेण्यावाचून पर्याय नाही हे सुद्धा तेवढेच खरे.