नैऋत्य मान्सून म्हणजे काय
मान्सूनला मोसमी वारे अथवा नैऋत्य मान्सून या नावानेही ओळखले जाते. आपल्या भारतात पाऊस घेऊन येण्यास नैऋत्य दिशेकडून आलेले हे नियतकालिक वारेच कारणीभूत ठरतात. हे मोसमी वारे अथवा मान्सून म्हणजे काय हे जाणून घेण्याचा या लेखाच्या माध्यमातून प्रयत्न करू.

जून महिना सुरु झाला की उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या जनतेला पावसाचे वेध लागतात. मग दररोज पाऊस कधी येणार याची माहिती वेगवेगळ्या माध्यमांतून शोधणे सुरु होते. महाराष्ट्रात अदमासे ७ जूनच्या आसपास पाऊस दाखल होतो मात्र हा पाऊस येण्यासाठी जो महत्वाचा घटक कारणीभूत ठरतो तो मान्सून म्हणजे काय याची माहिती फार कुणास नसते.
मान्सूनला मोसमी वारे अथवा नैऋत्य मान्सून या नावानेही ओळखले जाते. आपल्या भारतात पाऊस घेऊन येण्यास नैऋत्य दिशेकडून आलेले हे नियतकालिक वारेच कारणीभूत ठरतात. हे मोसमी वारे अथवा मान्सून म्हणजे काय हे जाणून घेण्याचा या लेखाच्या माध्यमातून प्रयत्न करू.
साधारण १५ मार्चच्या दरम्यान सूर्य विषुवृत्तावर असतो. येथून तो हळूहळू उत्तर दिशेकडे प्रवास सुरु करतो आणि पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात उन्हाळा सुरु होतो. मे महिन्याच्या शेवटी सूर्य कर्कवृत्ताजवळ येतो आणि उत्तर भारतात कडाक्याचा उन्हाळा सुरु होतो. भारताच्या उत्तरेस हिमालय पर्वत आहे हे आपल्या सर्वाना ठाऊक आहेच. हिमालयाच्या पलीकडे तिबेट हा प्रदेश असून पलीकडे मध्य आशियामधील विस्तीर्ण वालुकामय प्रदेश आहे. या ठिकाणी समुद्र, जलाशय अथवा झाडे इत्यादी उष्णतेपासून वाचवणारे घटक नसल्याने उन्हाळ्यात या ठिकाणी भयंकर उष्णता असते. पंजाब, दिल्ली इत्यादी प्रांतात तर उष्णतेची भट्टी पेटते असेही म्हटले जाते.
अशा प्रकारे उत्तर भागात उष्णता अतिशय वाढल्याने तेथील हवा अत्यंत गरम व हलकी होते त्यामुळे तिची जागा भरून काढायला दक्षिणेकडील थंड आणि घन हवा येऊ लागते आणि जून महिन्याच्या सुरुवातीला थंड वाऱ्याचा एक मोठा प्रवाह सुरु होतो. मात्र हा प्रवाह दक्षिणेकडून न येता नैऋत्य दिशेने येतो व याच प्रवाहास नैऋत्य मान्सून या नावाने ओळखले जाते.
हा प्रवाह नैऋत्येकडून येणाचे कारण म्हणजे पृथ्वीच्या दैनंदिन वेगामुळे विषुवृत्तावरील पदार्थास अधिक गती असते तर विषुववृत्ताच्या उत्तरेस अथवा दक्षिणेस असलेल्या पदार्थास कमी गती असते. पृथ्वी पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे फिरते त्यामुळे विषुवृत्तावरील वाऱ्यांना पूर्वेकडे जाण्याची गती प्राप्त झाली असते. त्यामुळे अधिक गती असलेला हा वारा उत्तरेस जाऊ लागला की त्या बाजूस पृथ्वीची गती कमी असल्यामुळे हे वारे नैऋत्य दिशेकडून आल्यासारखे भासतात आणि त्यांना नैऋत्य मान्सून वारे असे उल्लेखले जाते.
जुलै महिन्याच्या अखेरीस उत्तरायण संपून दक्षिणायन सुरु होते आणि सूर्याचा दक्षिणेकडील प्रवास सुरु होतो आणि अशाप्रकारे सूर्याचा दक्षिण दिशेकडील प्रवास सुरु असेपर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत हे वारे वाहत असतात.
भारताच्या दक्षिणेस समुद्र असल्याने तेथील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. भारताच्या जवळ असलेल्या दक्षिण गोलार्धात उन्हाळा असल्याने बाष्पीभवन अधिक जोरात होत असते. यातून निर्माण झालेली वाफ अर्थात बाष्प हे हवेत मिसळते आणि ही बाष्पमिश्रित हवा भारताकडे येऊ लागली की पावसाळा खऱ्या अर्थाने सुरु होतो.