जीवनसत्त्वांचे फायदे व त्यांच्या अभावी होणारे रोग
आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विविध जीवनसत्त्वांचे आपल्या शरीरात असणे खूप आवश्यक आहे. तेव्हा ही जीवनसत्वे कोणती, कुठल्या पदार्थांत ती असतात आणि त्यांची कमतरता असल्यास कुठले विकार होऊ शकतात याविषयी थोडक्यात जाणून घेऊ.
अ जीवनसत्व (Vitamin A)
शरीरातील रोग वाढू न देण्याचे काम अ जीवनसत्व करते. कान, डोळे, मूत्रपिंड, त्वचा, पोट, मूत्राशय, फुफ्फुसे, आतडी, दात आणि रक्तक्षयाचे विकार, भूक न लागणे हे रोग अ जीवनसत्वाच्या अभावी होऊ शकतात. अ जीवनसत्व डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय हितकारक असते.
साययुक्त दूध, लोणी, रताळी, गाजरे आणि हिरव्या भाज्या हे अ जीवनसत्वाचे प्रमुख स्रोत आहेत.
ब जीवनसत्व (Vitamin B)
भूक लागण्यासाठी अत्यंत महत्वाचे असे ब जीवनसत्व आतड्यांच्या कार्यासही अतिशय उत्तम असते. रोग वाढू न देणे व क्षीणता दूर करण्यात अत्यंत महत्वाची कामगिरी बी जीवनसत्व निभावते.
ब जीवनसत्वाची कमतरता असल्यास अपचन, बद्धकोष्ठ, वजन कमी होणे, अशक्तपणा येणे, स्नायूंची कमजोरता, मज्जातंतूचे विकार इत्यादी त्रास उद्भवू शकतात.
दूध, वाटाणे, पावटे, डाळ, कच्ची फळे, भाज्या ब जीवसत्वाच्या स्रोतांपैकी एक आहेत. याशिवाय गव्हाचे सत्व, हातसडीचा तांदूळ, हरबरा, सोयाबीन, कॉलीफ्लॉवर, बदाम, शेंगा, संत्रे, केळी, टोमॅटो, दूध, कोबी, सफरचंद, ओट्स, बाजरी, हरबरे, सोयाबीन, बटाटा, दही, ताक हे सुद्धा ब जीवन सत्वाचे स्रोत आहेत.
क जीवनसत्व (Vitamin C)
संत्रे, लिंबू, पेरू, आंबा, टोमॅटो, अननस, पालेभाज्या, हरभरे, दूध, कोबी, बटाटा हे क जीवनसत्वाचे स्रोत आहेत. क जीवनसत्व हाडांची व दातांची मजबुती तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. याची कमतरता असल्यास दात किडणे किंवा ठिसूळ होणे, चालताना दम लागणे, श्वासाचे विकार, हृद्रोग, रक्तवाहिन्यांचे रोग इत्यादी त्रास होऊ शकतात.
ड जीवनसत्व (Vitamin D)
हे जीवनसत्व प्रामुख्याने दूध, अंडी तसेच कोड लिव्हर ऑइल मध्ये सापडते याशिवाय सूर्यप्रकाशातही ड जीवनसत्वाचा लाभ होऊ शकतो. याची कमतरता भासल्यास क्षयरोग, मुडदूस, हाडांचा त्रास आणि मज्जातंतूचे विकार होऊ शकतात.
ई जीवनसत्व (Vitamin E)
दूध, बाजरी, कच्ची फळे यातून ई जीवनसत्वाचा लाभ होतो. अन्नातील लोहाचे पचन न झाल्यास रक्तक्षय होण्याचा संभव असतो अशावेळी ई जीवनसत्व हा त्रास कमी करू शकते.