माशांचे प्रकार व नावे

महाराष्ट्रास विस्तीर्ण अशा सागरकिनाऱ्याबरोबच विपुल अशी सागर संपत्ती सुद्धा लाभली आहे. आपल्या भारतात माशांचे अनेक प्रकार आहेत. मत्स्योत्पादन हा महाराष्ट्राच्या उत्पन्नातील एक महत्वाचा घटक आहे आणि महाराष्ट्रात जे प्रसिद्ध मासे सापडतात त्यांची ख्याती जगभर आहे. जाणून घेऊ या आपल्या कडे सापडणाऱ्या माशांचे विविध प्रकार व नावे.

माशांचे प्रकार व नावे
माशांचे प्रकार व नावे

बोंबील 

भारताच्या मत्स्योत्पादन क्षेत्रात तब्बल ७ ते १० टक्के वाटा ज्या माशाचा आहे तो म्हणजे बोंबील. बोंबील हा मासा प्रामुख्याने महाराष्ट्र व गुजरातच्या समुद्रामध्ये सापडतो याशिवाय आंध्रप्रदेश, ओरिसा आणि बंगाल च्या समुद्रातही थोड्या प्रमाणात याचे अस्तित्व आहे. हा मासा लांबट आकाराचा असून अतिशय मऊ असतो. याचे डोके मोठे मात्र डोळे छोटे असतात. वरच्या जबड्यापेक्षा खालचा जबडा तुलनेत मोठा असतो. जबड्यात अतिशय बाकदार असे दात असून ते अतिशय टोकदार असतात. 

बोंबलाचे प्रमुख अन्न म्हणजे कोळंबी मात्र जसजशी त्याची वाढ होते तसे त्याचे अन्नही बदलत जाते. बोंबील हा मासा अतिशय खादाड असा मासा असून तो मिळेल ते अन्न खातो. कधीकधी तो स्वजात भक्षण सुद्धा करतो. 

बऱ्याचदा बोंबील कापल्यावर त्याच्या पोटात अनेक वेगवेगळे मासे व त्यांची अंडी सापडून येतात. बोंबलाची मादी तब्बल चोवीस हजार ते एक लाख अंडी घालते आणि तिच्या प्रजननकाळात अंडी घालण्याची प्रक्रिया दोन वेळा होते. सहसा बोंबील वर्षभरात कधीही प्रजनन करतात मात्र ऑक्टोबर ते एप्रिल या दरम्यान प्रजननाचे प्रमाण सर्वाधिक असते.

बोंबील हे ताजे अथवा सुकवून खाल्ले जाते ज्यास ताजा बोंबील अथवा सुका बोंबील असे स्थानिक नाव आहे. मुळात बोंबील अतिशय मऊ मासा असल्याने व त्याच्या शरीरात पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने तो लवकर सुकतो यामुळे तो फुकट जाऊ नये म्हणून त्यास सुकवण्याची प्रक्रिया करण्यात येते. सुक्या बोंबिलाना खूप मागणी असून त्यांची निर्यात अगदी श्रीलंका, बांगलादेश, ब्रिटन आणि इतर राष्ट्रांमध्ये केली जाते.

पापलेट

पापलेट माशास सारंगा असेही म्हटले जाते. समुद्री माशांमध्ये सर्वाधिक किंमत असलेला हा मासा आहे आणि याचे कारण म्हणजे यामध्ये काट्यांचे कमी असलेले प्रमाण व याची चव. दिसावयासही हा मासा सुंदर असतो. भारताच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीवर याचे वास्तव्य असले तरी महाराष्ट्र व गुजरात मध्ये हा विपुल प्रमाणात सापडतो. 

पापलेटच्या एकूण तीन जाती आहेत ज्यांना अनुक्रमे पापलेट अथवा सारंगा, कापरी पापलेट आणि हलवा असे म्हणतात. पापलेट माशाचे तोंड अतिशय लहान असून आत छोटे दात असतात. पापलेट माशाचे आवडीचे खाद्य म्हणजे सालपा नावाचे एक प्लवंग, हलवा मासा जवळा खूप आवडीने ग्रहण करतो. त्यामुळे ज्याठिकाणी या प्लवंगाचे व जवळ्याचे प्रमाण अधिक असते तिथे खात्रीने पापलेट मासे मिळतात.

पापलेट मध्ये नर व मादी यांना ओळखणे सहजासहजी शक्य नसते मात्र पापलेटची मादी सुमारे ६५००० ते १७५००० इतकी अंडी देऊ शकते. पापलेट माशाचा अंडी घालण्याचा काळ ऑक्टोबर ते डिसेंबर असतो. भारतात सुमारे ३४ हजार टन एवढे पापलेटचे उत्पादन होते व हे एकूण मस्त्योत्पादनाच्या २ टक्के एवढे आहे.

बांगडा 

बांगडा हा मासा सुद्धा खवय्यांचा आवडीचा असून अरबी समुद्रापासून पॅसिफिक महासागरापर्यंत तो सापडतो. आपल्याकडे बांगडा केरळ, गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात विपुल प्रमाणात सापडतो. यातही कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग आणि गोवा ही बांगडा माशाची महत्वाची मत्स्योत्पादन ठिकाणे आहेत. 

बांगडा हा आकाराने चपटा असून त्याचे तोंड निमुळते व जीवनी मोठी असते. बांगडा हा सहसा किनारी भागात आपले अन्न मिळवण्याच्या शोधात येत असतो. सहसा त्याच्या खाण्यात समुद्री प्लवंग आणि इतर समुद्री चतुष्पाद प्राणी दिसून येतात. बांगड्याची मादी सुमारे दीड लाखांच्या आसपास अंडी देऊ शकते आणि अंडी घालण्यासाठी बांगडे खोल समुद्रात जातात. 

बांगडा हा थव्याने राहणार मासा असून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना ते थव्याने प्रवास करतात. बांगड्याचे वार्षिक उत्पादन १२३००० टन असून एकूण मासेमारीच्या ७ टक्के वाटा फक्त बांगड्याचा आहे.