होळी सणाची संपूर्ण मराठी माहिती

होळी हा सण भारतभर निरनिराळ्यापणे साजरा करण्यात येतो. बंगाल प्रांत वगळता बाकी सर्व ठिकाणी होळी पेटविण्यात येते. अशा या लोकप्रिय होळी सणाची माहिती मराठी मध्ये जाणून घेऊ.

होळी सणाची संपूर्ण मराठी माहिती
होळी

बंगाल प्रांतात फाल्गुन पोर्णिमेला "दोलायात्रा" नावाचा विधी करण्यात येतो. तेथे या दिवशी श्रीकृष्णाच्या मुर्तीला झोपाळ्यावर ठेवून झोके देण्यात येतात. परंतु हा प्रकार भारतात इतर कुठेही केला जात नाही. होळी हा फार प्राचीन सण आहे. याचे विविध उल्लेख सापडतात.

होळीचे प्राचीन उल्लेख

१. प्रारंभी या सणाचे नाव "होलाका" असे होते. याबाबत चा उल्लेख जैमिनीच्या पूर्वमिमांसा सूत्रावरील १. ३. १५ - २३

शबरीस्वामींच्या भाष्यात आला आहे.

२. काठकगृह्य ७३ - १ यामधे "राका होलाके" असे एक सूत्र असून त्या वरील टीकेत स्त्रियांच्या सौभाग्याकरीता करावयाचा एक विशिष्ट विधी असून त्यात "राका होलाका" ही देवता असते असा उल्लेख केला आहे.

३. वात्सायनाच्या कामसूत्रात १. ४. ४२ यात वीस प्रकारच्या विविध खेळात शिंगातून रंगीत पाणी उडविण्याच्या खेळाचा समावेश केला आहे.

४. हेमाद्रीने काल पान १०६ उधृत केलेल्या बृहद्मयाच्या एका श्लोकात होलिका पोर्णिमेला "हुताशनी" असेनाव दिले आहे. हे नाव आजपर्यंत वापरण्यात येते.

५. लिंग पुराणात हेमाद्री-काल- पान ६४२ फाल्गुन पोर्णिमेला फाल्गुनिका असे म्हटले आहे. हा सण बालिश चेष्टांनी परिपूर्ण असतो आणि त्यामुळे भरभराट होते असा उल्लेख आहे.

६. वराह पुराणात हेमाद्री - काल पान ६४२ या सणाला "पटवालविलासिनी" असे म्हटले आहे.

७. भविष्य पुराणात हेमाद्री - व्रत खंड २ पान १८४ - १९० कृष्ण युधिष्ठिर संवादात एक ढुंढा नावाच्या राक्षसीणीची एक कथा दिली आहे. ती पुढील प्रमाणे -

ढुंढा राक्षसीणीला मनुष्य वा देवांपासून मृत्यू येणार नाही असा वर ब्रम्हदेवाने दिला होता. या वराचा दुरूपयोग करून ती रघु नावाचा राजा राज्य करत असताना लहान मुले, माणसे यांना त्रास देऊ लागली. या राक्षसीणीची पिडा निवारणार्थ एका पुरोहिताने उपाय सुचविला की फाल्गुनी पोर्णिमेच्या दिवशी घराबाहेर लाकडांचा ढीग रचून तो पेटवावा.

त्या अग्निच्या भोवती फेऱ्या मारून नाचावे, गाणी गावीत, ग्रामीण अश्लील भाषेतील शब्द उच्चारावेत, टाळ्या बाजवाव्यात, बोंबा माराव्यात. अशा प्रकारे तयार झालेल्या ध्वनीनिर्मिती व अग्नी होमाने ती राक्षसी मरेल. हा उपाय रघु राजाने केला व ती राक्षसी मरण पावली. तोदिवस "अडाडा" आणि "होलिका" या नावाने प्रसिद्ध झाला.

८. हिरण्यकशपू -प्रल्हाद- होलिकाची कथा सर्वज्ञात व प्रसिद्ध आहेच. त्यामुळेच पून्हा येथे देत नाही.

९. हिवाळ्याचा ऋतू फाल्गुन पोर्णिमेला म्हणजेच हुताशनी पोर्णिमेला समाप्त होऊन वसंत ऋतूला सुरुवात होते. यावेळी जो मनुष्य राखाडीला वंदन व कामदेवाची पूजा करतो आणि चंदनाच्या गंधासह आंब्याचा मोहोर भक्षण करतो तो सुखांत राहतो. असे होलिकाव्रताच्या शेवटच्या श्लोकात म्हटले आहे.

गेल्या काही शतकातील होळी -

कोकणप्रांतात होळीच्या निमित्ताने पुरूष स्त्रियांची सोंगे घेऊन कार्यक्रम करतात. "दशावतारी नाटक" हा कोकणातील एक अत्यंत प्रसिद्ध सांस्कृतिक प्रकार आहे. होळी रचण्याच्या विविध पध्दती आहेत. ठाणे - रायगड जिल्ह्यातील आगरी समाजात होळीचा आजोबा म्हणून होळी पासून काही अंतरावर एक नवीन झाड लावण्यात येते. मला तरी ही पारंपरिक चालीरितीतून वृक्षसंवर्धन करण्याची ही सुंदर पध्दत वाटली व भावली ही..

होळीची रचना

सर्वसाधारणपणे एक खड्डा करून लाकडे उभी रचून, ती पेंढ्याने शाकारून सजविण्यात येते. होळी भोवती रांगोळ्या काढल्या जातात.

त्यानंतर होळीची पुजा करतात. होळी पेटविल्यावर स्त्रिया होळीला प्रदक्षिणा घालतात. यावेळी हातात तांब्या घेऊन त्यातून बारीक धार जमीनीवर पडेल याची काळजी घेतात. येथेही आग इतरत्र पसरू नये यासाठीची ही धार्मिक रिवाजावर आधारित योजना असावी असं वाटतं.

स्त्रिया, पुरूष पेटत्या होळीत श्रीफळ अर्पण करतात. काही वेळाने ते अर्धवट भाजलेले श्रीफळ काढून ते प्रसाद म्हणून वाटून खातात. पेटत्या होळीतून नारळ बाहेर काढणं हा मावळ्यांचा आवडता खेळ होता.

पूर्वी फाल्गुन कृष्ण पंचमीला रंगपंचमी खेळत असत. होलिकोत्सव पाच दिवस चालत असे. हल्ली फाल्गुन कृष्ण प्रतिपदेलाच रंगपंचमी खेळली जाते.

संदर्भ -

  • जैमिनी सूत्र
  • काठकगृह्य सूत्र
  • वात्सायनाचे कामसूत्र
  • हेमाद्री पंडीत
  • लिंग पुराण
  • भारतरत्न महामहोपाध्याय डाॅ. काणे कृत धर्मशास्त्राचा इतिहास {उत्तरार्ध}

- श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक