मध्य रायगडचे भौगोलिक वर्णन

रायगड जिल्ह्राचे भौगोलिकदृष्ट्या दोन भाग पडतात. ज्यास उत्तर रायगड व दक्षिण रायगड असे म्हटले जाते. मध्य रायगड उत्तर रायगड आणि दक्षिण रायगड यांच्या बरोबर मध्यभागी वसलेला भाग आहे.

मध्य रायगडचे भौगोलिक वर्णन

मध्य रायगडमधील नागोठण्याच्या पश्चिमेकडून वाहणारी अंबा नदी लोणावळ्याच्या दक्षिणेकडे आंबवणे येथे उगम पावते आणि नैऋत्येस 48 कि. मी. वाहात जाते. पालीच्या दक्षिणेस रोहा तालुक्यातल्या वझरोली गावाखाली दिशा बदलून वायव्येस वाहाते.

नागोठण्यापासून पुढे नदीच्या खोर्‍याचा तळ रुंद होतो व नदी सपाट माथा असलेल्या डोंगररांगांमधून धरमतर खाडीला मिळते. यामुळे परिसरात दलदलीचा मोठा प्रदेश तयार झाला आहे.  अंबा नदी धरमतर खाडीस जाऊन मिळते. अंबा नदीच्या प्रवाहाचे दोन भाग आहेत. भरती ओहोटीचा परिणाम होणारा मुखाकडील भाग आणि भरती ओहोटीचा परिणाम न होणारा उगमाकडील भाग.

पूर्वी नागोठण्याच्या मुखापर्यंत 35 कि. मी. चा प्रवाह पाण्याच्या उपलब्धतेमुळे पूर्वी जलवाहतुकीस उपयोगी पडायचा. नागोठण्याच्या उत्तरेस 18 कि. मी. वर धरमतरच्या दक्षिणेस नदीचे पात्र रुंद होते. धरमतरपासून रेवसपर्यंतचा अंबा नदीचा प्रवाह दलदलमय प्रदेशातून जातो.

नागोठणे पासून अंबा नदीला एकही मोठी नदी येऊन मिळत नाही. पूर्वी अंबा नदीचा धरमतर पासून मुखापर्यंत 16 कि. मी. प्रवाह जलवाहतुकीस उपयोगी पडायचा. धरमतरच्या दक्षिणेकडील प्रवाह जलवाहतुकीचा दृष्टीने विशष सोयीचा नव्हता. भरतीच्या वेळी आवेटीपर्यंत आणि उधाणाच्या भरतीच्या वेळी नागोठण्यापर्यंत लाँचेस जायच्या.

ऑक्टोबर ते मे पर्यंत नागोठण्यापर्यंत बरीच जलवाहतूक चालायची.  याकाळी या नदीवर एकूण पाच तरसेवा उपलब्ध होत्या. सर्वात जवळ असलेली तरसेवा नागोठण्यापासून 5 कि. मी. अंतरावर बेणसे गावात होती, दुसरी 8 कि. मी. वर गांधे गावात, तिसरी 10 कि. मी. अंतरावरील आवेटी जवळ, चौथी धरमतरच्या दक्षिणेस 7 कि. मी. वर खारजुई आणि पाचवी मुखाच्या 5 कि. मी. दक्षिणेस माणकुळे गावाजवळ होती. धरमतर खाडीवर पूल बांधल्याने आणि नदीत गाळ साचल्याने तरसेवा बंद पडली.

परिसरातल्या प्रमुख डोंगररांगा सह्राद्रीच्या मुख्य शाखेपासून अलग झालेल्या उपशाखा आहेत. नागोठण्याच्या पूर्वेस जी डोंगररांग आहे. तिला महालमिरा डोंगररांग या नावाने ओळखले जाते. या डोंगररांगेत सुरगड, अवचितगड आणि सागरगड यासाखे तीन बेलाग दुर्ग नागोठणे परिसराचे पुरातन काळापासून संरक्षण करत आहेत.

याशिवाय नागोठण्याच्या पूर्वेस नागोठणे गावास लागूनच एक उपशाखा महालमिरा रांगेपासून अलग झालेली आहे हिला नागोठणे पूर्व डोंगररांग असे नाव आहे. अशा प्रकारे तीन बाजूंनी डोंगररांगांनी वेष्टित असलेल्या नागोठण्यातून दक्षिणेकडे सुकेळी खिंडीतून, पश्चिमेकडे भिसे खिंडीतून व उत्तरेकडे अंबा नदीच्या तटाला लागून जावे लागते. सुकेळी डोंगररांग अंबा आणि कुंडलिका नद्यांचे पाणलोट क्षेत्र विभागते.

मध्य रायगडचे हवामान उर्वरित रायगड जिल्ह्याच्या हवामानासारखेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. पावसाळ्यात जोरदार पर्जन्यवृष्टी, उन्हाळ्यात उष्ण हवामान आणि वर्षभर हवेत आद्र्रतेचे जास्त प्रमाण. मार्च ते मे उन्हाळा, जून ते सप्टेंबर पावसाळा, ऑक्टोबर मान्सुनोत्तर दमट उष्ण हवामान आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी हिवाळा असतो.