चांगदेव उर्फ चांग वटेश्वर - एक अलौकिक तपस्वी
चांगदेवांचे पहिले गुरु हे वटेश्वर तर दुसऱ्या गुरु संत ज्ञानेश्वरांच्या भगिनी मुक्ताबाई मानल्या जातात.
भारताच्या इतिहासात जे महान तपस्वी होऊन गेले त्यापैकी एक म्हणजे चांगदेव उर्फ चांग वटेश्वर. चांगदेव यांचा जन्म खानदेशातील तापीतीरावरील एदलाबाद जवळील चांगदेव नामक गावी झाला. खरं तर या गावाचे नाव हे चांगदेव यांच्या नावावरून पडले असल्याने चांगदेवांचा जन्म होण्यापूर्वी या गावाचे नाव सुंदरपूर असे होते. चांगदेवांचा जन्म या स्थळी झाला म्हणून या ठिकाणी त्यांचे एक पुरातन मंदिर सुद्धा आहे.
चांगदेवांचा जन्म केव्हा झाला याची माहिती मिळत नाही मात्र त्यांना अनेक सिद्धी प्राप्त असल्याने ते शेकडो वर्षे जगले असे उल्लेख जुन्या साधनांत आढळतात. चांगदेव हे महायोगी असल्याने आपल्या योगाच्या बळावर समाधिस्थ होऊन ते मृत्यू टाळत आणि अशाप्रकारे ते तब्बल चौदाशे वर्षे भूलोकी असल्याचे सांगितले जाते.
चांगदेवांचे पहिले गुरु हे वटेश्वर तर दुसऱ्या गुरु संत ज्ञानेश्वरांच्या भगिनी मुक्ताबाई मानल्या जातात. चांगदेवांनी मुक्ताबाई यांना आपले गुरु कसे केले याची एक प्रसिद्ध कथा आहे. चांगदेव हे स्वतः सिध्दपुरुष होते मात्र संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद बोलवून घेतल्याची वार्ता त्यांच्या कानी गेली आणि त्यांना खूप कौतुक वाटले.
संत ज्ञानेश्वरांचे कौतुक करणारे पत्र लिहावे असा विचार करून त्यांनी पत्र लिहावयास घेतले मात्र ज्ञानेश्वरांना चिरंजीव म्हणावे की तीर्थरूप हे न ठरल्याने त्यांनी कोरेच पत्र आपल्या शिष्यासोबत ज्ञानेश्वरांकडे पाठवले.
चांगदेवांचा शिष्य जेव्हा पत्र घेऊन ज्ञानेश्वरांकडे आला त्यावेळी मुक्ताबाई यांनी ते पत्र हाती घेतले आणि कोरे पत्र पाहून लहानग्या मुक्ताबाई म्हणाल्या की चौदाशे वर्षे वाचून चांगदेव कोराचा कोराच राहिला.
शिष्याने सदर घटना चांगदेवांना सांगितली त्यावेळी ते संतप्त होऊन आपल्या वाघावर बसले आणि हाती सर्पाचा आसूड घेऊन ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांस भेटावयास आळंदीस आले.
चांगदेव जेव्हा आळंदीस आले त्यावेळी ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई एका भिंतीवर बसल्या होत्या आणि समोरून चांगदेव वाघावर बसून आपल्या असंख्य शिष्यांसह आपल्याकडे येत असल्याचे पाहून ते भिंतीस 'चल बये' असे म्हणाले आणि साक्षात ती भिंत चालू लागली.
हे दृश्य पाहून चांगदेव अत्यंत आश्चर्यचकित झाले कारण सिद्धीच्या व योगाच्या बळावर चांगदेव हे सचेतन वस्तूंवर सत्ता गाजवू शकत मात्र भिंतीसारख्या अचेतन वस्तूवर सत्ता गाजवताना पाहून चांगदेवांना समजले की ही बालके नक्कीच असामान्य आहेत.
यानंतर चांगदेव ज्ञानेश्वरांना शरण गेले यावेळी ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना चांगदेव पासष्टीचा बोध केला मात्र त्यांच्या भक्तिमार्गातील सद्गुरू मुक्ताबाई झाल्या कारण मुक्ताबाईंनी त्यांना उपदेश केला त्यामुळे ती माता व चांगदेव पुत्र असे गुरु शिष्याचे नाते निर्माण झाले.
चांगदेवांनी अनेक ग्रंथांची निर्मिती देखील केली होती. तत्त्वसार नामक त्यांनी लिहिलेला ग्रंथ १३१२ सालातील असून या ग्रंथाची रचना हरिश्चन्द्र गडावर झाली होती. आजही गावोगावी ग्रामदेवतेच्या नावाने जयजयकार करताना चांग भलं असे म्हटले जाते त्यामधील चांग हा शब्द चांगदेव यांनाच उद्देशून असतो. चांगदेवांनी १३२५ साली गोदावरीच्या तीरावर पुणतांबे येथे समाधी घेतली.
चांगदेव हे असे अलौकिक तपस्वी होते की आपल्या योगसिद्धीच्या सामर्थ्याने त्यांनी दर शंभर वर्षांनी जुना देह टाकून नवा देह धारण केला त्यामुळे चांगदेवांची वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल चौदा समाधीस्थळे व चौदा नावे आहेत. चांगदेव हे खऱ्या अर्थी त्या काळातील सर्वांच्या आदरास प्राप्त झालेले तपस्वी होते.