फणसाड वन्यजीव अभयारण्य - वन्यजीवांचे नंदनवन

सह्याद्री अर्थात पश्चिम घाटातील वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने १९८६ साली फणसाड अभयारण्याची स्थापना करण्यात आली.

फणसाड वन्यजीव अभयारण्य - वन्यजीवांचे नंदनवन
फणसाड वन्यजीव अभयारण्य

महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात असलेल्या दोन प्रमुख अभयारण्यांपैकी एक म्हणजे फणसाड वन्यजीव अभयारण्य. फणसाड अभयारण्य ५२.७१ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले असून हे अभयारण्य विविध प्रकारच्या वनस्पती व प्राण्यांचे निवासस्थान आहे. फणसाड अभयारण्य हे आपल्या समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते.

सह्याद्री अर्थात पश्चिम घाटातील वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने १९८६ साली फणसाड अभयारण्याची स्थापना करण्यात आली. सह्याद्री व पश्चिम घाट हा आपल्या समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असून त्यास युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सुद्धा स्थान आहे. फणसाड अभयारण्य हे पश्चिम घाटाच्या उत्तरेकडील भागात असून पश्चिम घाटाच्या नैसर्गिक परिसंस्थेचा एक महत्वाचा भाग आहे.

फणसाड अभयारण्यात उडती खार अर्थात शेकरू, बिबट्या, बार्किंग डिअर, ठिपकेदार हरीण, सांबर, रानडुक्कर अशा अनेक प्राण्यांचा निवास आहे या शिवाय या अभयारण्यात पक्षांच्या १२० हुन अधिक प्रजाती आहेत त्यामुळे पक्षिनिरीक्षकांसाठी सुद्धा हे अभयारण्य एक आवडते स्थळ आहे. या अभयारण्यात सदाहरित, अर्ध सदाहरित आणि ओलसर पानझडी वृक्षांच्या प्रजातींचा समावेश होतो.

फणसाड अभयारण्य हे इको टुरिजम साठी सुद्धा लोकप्रिय स्थळ असून या अभयारण्यास भेट देणाऱ्या पर्यटकांना येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पायवाटा आहेत. वन्यजीवांचे निरीक्षण करण्यासाठी फणसाड अभयारण्यात जीप सफारी सुद्धा उपलब्ध असून निसर्गाच्या सानिध्यात दिवस व रात्र घालवू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी या ठिकाणी कॅम्पिंगची सुद्धा सुविधा येथील प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

फणसाड अभयारण्य हे पश्चिम घाटाच्या नाजूक परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी येत असलेल्या संवर्धनाच्या प्रयत्नांचा एक महत्वाचा भाग असून अभयारण्याच्या संवर्धन कार्यक्रमांमध्ये वनीकरण, वन्यजीव पुनर्वसन आणि लुप्तप्राय प्रजातींचा संवर्धन आदींचा समावेश होतो.

खऱ्या अर्थी फणसाड वन्यजीव अभयारण्य हे निसर्गप्रेमी आणि वन्यजीव प्रेमींसाठी एक आवडते ठिकाण असून ते महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील समृद्ध जैवविविधतेचे निरीक्षण करण्याची अनोखी संधी देते. पश्चिम घाटाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अभयारण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे ते निसर्ग वन्यजीव प्रेमी तसेच संशोधकांमध्ये विशेष लोकप्रिय बनले आहे. निसर्ग सौंदर्य आणि संवर्धनाच्या प्रयत्नांचे महत्व अनुभवू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने फणसाड अभयारण्यास एकदा तरी भेट द्यायलाच हवी.