हिंदू धर्मातील चार पुरुषार्थ

आपल्या धर्मात एकूण चार पुरुषार्थ मानले गेले आहेत व ते म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे आहेत.

हिंदू धर्मातील चार पुरुषार्थ
हिंदू धर्मातील चार पुरुषार्थ

हिंदू धर्मात प्राचीन काळापासून ज्या संकल्पना प्रचलित आहेत त्यापैकी एक म्हणजे पुरुषार्थ. पुरुषार्थ या संकल्पनेवर आपल्या धर्मग्रंथांत अनेक उल्लेख आढळतात तेव्हा या लेखात आपण ही संकल्पना काय आहे हे समजून घेऊ.

पुरुषार्थ या शब्दाची उत्पत्ती ही पुरुषे अर्थ्यते इति अर्थात पुरुष ज्याची इच्छा करतात तो पुरुषार्थ अशी आहे.

आपल्या धर्मात एकूण चार पुरुषार्थ मानले गेले आहेत व ते म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे आहेत. पुरुषार्थ संकल्पनेच्या उगमावेळी मोक्ष हा स्वतंत्र पुरुषार्थ म्हणून गणला जात नसे त्यामुळे धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थाना त्रिवर्ग असे म्हटले जात असे मात्र कालांतराने मोक्ष या पुरुषार्थाचा समावेश पुरुषार्थाच्या संकल्पनेत होऊन चतुर्विध पुरुषार्थाची संकल्पना उदयास आली.

तेव्हा अशा या चार पुरुषार्थांतील धर्म म्हणजे शुद्ध नैतिक आचरण हा आहे. धर्म शास्त्राने ज्या धार्मिक कृत्यांचे आचरण महत्वाचे मानले आहे ते सुद्धा याच पुरुषार्थात समाविष्ट होतात. याच धर्म पुरुषार्थातून मोक्ष पुरुषार्थाची निर्मिती उपनिषदातील अध्यात्मिक तत्वांचा समावेश होऊन त्यातून प्रवृत्तिपर आणि निवृत्तिपर असे दोन विभाग झाल्यावर झाली. यापैकी प्रवृत्तिपर पुरुषार्थ हा धर्म पुरुषार्थ तर निवृत्तिपर पुरुषार्थ हा मोक्ष पुरुषार्थ म्हणून ओळखले जाऊ लागले.

भारतीय नीतिशास्त्रात मांडलेल्या पुरुषार्थाचा संकल्पनेनुसार फक्त धर्म आणि मोक्ष हे जीवनाचे साध्य होऊ शकत नाही तर मोक्ष आणि धर्मास काम आणि अर्थ यांचा सुद्धा आधार लागतो. त्यामुळे काम आणि अर्थ नावाचे दोन पुरुषार्थ या संकल्पनेत आले व यापैकी अर्थ म्हणजे उपयुक्ततावादाशी जुळणारे साध्य आणि काम म्हणजे प्रत्यक्ष उपभोग्य वस्तू अथवा उपभोगस्वरूप जीवनक्रम होय.

काम व अर्थ हे मानवाला कितीही उपयोगाचे असले तरी त्यांचे आचरण हे धर्मास अनुसरूनच हवे हा सुद्धा नियम आहे. आपस्तंबाच्या मतानुसार सर्व पुरुषार्थ व्यापक अर्थी धर्म पुरुषार्थातच अंतर्भूत होतात. 

वृक्ष हा फळांसाठी वाढवला जातो हे सत्य असले तरी छाया आणि गंध यांचा त्या वृक्षामुळे लाभ होतो त्याप्रमाणे धर्माच्या आचरणाने अर्थ आणि काम दोन्ही पुरुषार्थ सिद्ध होतात. 

धर्मशास्त्रातील गृहस्थाश्रम या आश्रमात काम अंतर्भूत होतो आणि त्याचबरोबर अर्थ सुद्धा सिद्ध होतो. मोक्ष पुरुषार्थाच्या रूपाने या संसारातून कायमची सुटका करून घ्यावी जेणेकरून धर्मशास्त्रात मोक्षास साध्य व सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे.

धर्मशास्त्रातील एका ऋचेनुसार धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थातील एक तरी पुरुषार्थ प्रत्येकास साधता यायला हवा आणि या चौघांपैकी एकही पुरुषार्थ ज्यास साधता आला नाही त्याचा जन्म निरर्थक असे म्हटले गेले आहे त्यावरून आपल्या धर्मशास्त्रात या चार पुरुषार्थाचे महत्व किती आहे हे लक्षात येईल.