रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे

रायगड जिल्हा म्हणजे पर्यटनस्थळांची जणू खाणंच. असंख्य पर्यटनस्थळांनी नटलेल्या या जिल्ह्यात आलेला पर्यटक येथील सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेता घेता हरवून गेल्याशिवाय राहत नाही. खरं तर पर्यटनस्थळांची वर्गवारी करणे अतिशय अवघड काम मात्र त्यातही काही विशेष प्रसिद्ध अशी पर्यटनस्थळे आपल्यासमोर घेऊन येण्याचा एक प्रयत्न.

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे

अलिबाग

रायगड जिल्ह्याच्या राजधानीचे विद्यमान ठिकाण असलेले अलिबाग हे निसर्गसंपन्नतेसोबत पराक्रमाचा वारसा जपणारे शहर आहे. हे ठिकाण पुर्वीच्या चौल बेटावरील साखर या नावाने प्रसिद्ध असलेल्या खाडीच्या मुखावर वसले असून पुर्वी विलग असलेली ही बेटे आधुनिक युगात रस्ते व पुलांनि जोडली गेल्याने जवळ आली आहेत. खुद्द अलिबागला प्राचिन इतिहास नाही मात्र हा परिसर चौल या बंदरामुळे प्राचिन काळापासून प्रसिद्ध होता. अलिबाग हे नाव १७ व्या शतकात उदयास आले, पुर्वी या परिसराचे मुख्य गाव रामनाथ होते कारण गावात असलेले पुरातन राम मंदीर, याशिवाय गावठाण असल्यामुळे गावदेवी मंदीरही रामनाथ येथेच आहे. त्याकाळी अलिबाग ही फक्त एक बाग होती जी कुणा अली नावाच्या धनिक व्यापार्‍याची होती, याच नावावरुन या बागेस अलिबाग असे नाव मिळाले. सध्याचे अलिबाग शहर हे अशा अनेक बागा व वाड्या मिळून तयार झाले आहे ज्यामध्ये श्रीबाग, हिराबाग, मोतीबाग इत्यादी अनेक बागांचा समावेश होतो. अलिबागचा उत्कर्ष प्रामुख्याने सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात झाला, अलिबाग या बागेचे रुपांतर त्यांनी संपन्न अशा शहरात केले, आंग्रे काळात येथे अनेक विकासकामे व बांधकामे झाली तसेच मंदीरांची निर्मिती व जुन्या मंदीरांच्या जिर्णोद्धाराचे कार्यही झाले या मंदिरांत मारुती मंदीर, बालाजी मंदीर, राम मंदीर, काशि विश्वेश्वर मंदीर, गणपती मंदीर, काळंबिका मंदीर, विठ्ठल रखुमाई मंदीर, दत्तमंदीर, विष्णू मंदीर इत्यादींचा समावेध आहे. याशिवाय शहरात दोन मशिदी आहे ज्यातली एक २०० वर्षे जुनी असून एक १०० वर्षे जुनी आहे. अलिबागेत बेने इस्त्रायली लोकांची संख्या खुप मोठी आहे यांचे एक सिने गॉग सुद्धा येथे पहावयास मिळते. खुद्द अलिबागेत दोन किल्ले आहेत, एक म्हणजे प्रसिद्ध कुलाबा किला जो शिवाजी महाराजांनी बांधला व दुसरा हिराकोट किल्ला जो कान्होजींनी बांधला. अली याने बागायतीला पाणी मिळावे यासाठी अनेक विहीरी या बागेत बांधल्या त्यातल्या ११-१२ विहीरी आजही अस्तित्वात आहेत.

सन १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे आरमारप्रमुख झाल्यावर त्यांनि अलिबाग शहराची निर्मिती केलि मात्र त्यांचा निवास कुलाबा किल्ल्यातच होता मात्र राजवाडा, पागा व खजिन्यासाठी त्यांनि अलिबागची निवड केली. १८३९ साली कुलाबा संस्थान खालसा झाले व तेथे इंग्रजांचा अमल सुरु झाला १८४० साली अलिबागला कुलाबा एजन्सीचे मुख्यालय करण्यात आले व १८५२ सालि ते तालुक्याचे ठिकाण झाले. सन १८६९ साली निर्माण झालेल्या कुलाबा जिल्ह्याचे मुख्यालय म्हणुनही अलिबागचीच निवड करण्यात आलि व कुलाबा जिल्ह्याचे रायगड नामांतर झाल्यावरही मुख्यालय अलिबागच राहीले. अलिबाग शहराची प्रमुख आकर्षणे आहेत त्यामध्ये कुलाबा किल्ला, हिराकोट किल्ला, आंग्रे वाडा, छत्री बाग, चुंबकिय वेधशाळा इत्यादींचा समावेध होतो. कुलाबा किल्ल्याची निर्मिती १६६२ सालि शिवाजी महाराजांनि केली यानंतर दर्यासारंग व दौलतखान यांनी येथून कारभार पाहिला व नंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांनि कुलाब्यास आपल्या प्रमुख हालचालींचे ठिकाण केले. शहरातील प्रसिद्ध हिराकोट किल्ला व तलाव १७२० साली कान्होजी आंग्र्यांनी खजिन्याच्या ठिकाणासाठी बांधला येथे हिरा नामक एका स्त्रीची बाग होती. हा किल्ला बांधण्यासाठी जेथे खोदकाम करण्यात आले तेथेच नंतर तलाव बांधण्यात आला. या किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबूत असून वापरण्यात आलेले पाषाण प्रशस्त आहेत. किल्ल्यात देवीचे मंदीर असून बाहेर मारुती मंदीर व एक छोटा दर्गा आहे. सध्या याचा वापर तुरुंग म्हणुन केला जतो. येथील छत्रीबागेत कान्होजी आंग्र्यांसहित घराण्यातील पुरुषांच्या व स्त्रीयांच्या समाध्या आहेत. बस स्थानकावरुन थोड्याच अंतरावर जुन्या धाटणीचा आंग्रे वाडा आहे, आजही या वाड्याने आपले भव्यपण जपले असले तरी सध्या हा भग्नावस्थेत आहे. येथे पुर्वी आंग्रेकालीन टाकसाळ होती व त्यास 'अलिबागी रुपया' असे नाव होते. येथील चुंबकिय वेधशाळा विज्ञानाचा अजब नमुना आहे, १९०४ साली स्थापन झालेल्या या वेधशाळेचा जगात दुसरा क्रमांक लागतो. पृथ्वीच्या चूंबकिय शक्तीमधले फेरफार या शाळेत नोंद केले जातात यासाठी इमारतीची बांधणी विशिष्ट अशा दगडांनी केली असून लोखंडाचा बिलकुल वापर करण्यात आलेला नाही. अलिबागेस नैसर्गिक व ऐतिहासिक पार्श्वभुमी आहेच मात्र या भुमीने अनेक नररत्नांची निर्मिती सुद्धा केली आहे यामध्ये सरखेल कान्होजी आंग्रे, जनरल अरुणकुमार वैद्य, कै. नारायण नागू पाटील, कै. प्रभाकर पाटील व अनेकांचा समावेश होतो.

किल्ले रायगड

रायगड जिल्ह्यास 'रायगड' हे नाव ज्या किल्ल्यामुळे मिळाले तो अभेद्य व शिवछत्रपतींच्या राजधानीचे ठिकाण असलेला किल्ला हा रायगड जिल्ह्याची मुख्य ओळख आहे. याची किर्ती आजच नाही तर पुर्विही इतकी दुरवर पसरली होती की, पाश्चिमात्य यास 'पुर्वेकडील जिब्राल्टर' म्हणुन ओळखत. केळनृपविजयम या कानडी काव्याचा कर्ता रायगडचा उल्लेख 'भुतलावर आश्चर्यकारक म्हणुन गणला जाणारा रायरी' असे करतो. सह्याद्रीच्या मुख्य शाखेपासून विलग झालेला तरिही तब्बल एक मैलाची दरी असलेला हा किल्ला शिवाजि महाराजांनी त्यांच्या राजधानीचे स्थळ म्हणुन निवडला यात नवल ते काय? रायगडचे प्राचिन नाव रायरी, याशिवाय यादवकाळात या किल्ल्यास तणस व रासिवटा अशिही नावे होती. दुरुन हा किल्ला पाहिल्या एका तेवत्या नंदादिपासारखा दिसतो त्यामुळे यास नंदादिप असेही म्हणत. यादवकाळानंतर जेव्हा दुर्गांचे महत्त्व कमी झाले तेव्हा या किल्ल्यांचा वापर फक्त टेहळणी अथवा कैदखाना म्हणुन केला गेला, निजामशाही काळात रायगडाचाही वापर कैदखाना म्हणुनच केला गेला. आदिलशाही काळात हा परिसर जावळीच्या मोर्‍यांच्या अखत्यारित होता. या मोर्‍यांच्या प्रमुखास 'चंद्रराव' हा किताब असे, १६४८ च्या दरम्यान जेव्हा प्रमुख दौलतराव म्रन पावला तेव्हा त्याच्या वारसांमध्ये किताबासाठी झगडा सुरु झाला तेव्हा त्याच्या बायकोने शिवाजी महाराजांची मदत घेऊन त्यांच्या सल्ल्याने पोलादपुरकर घराण्यातला 'यशवंतराव' हा मुलगा दत्तक घेतला व त्यास चंद्रराव हा किताब दिला. मात्र एवढी मदत करुनही कालांतराने मोरे शिवाजी महाराजांना न जुमानते झाले त्यामुळे १६५५ नंतर जावळीवर हल्ला करुन शिवाजी महाराजांनि मोर्‍यांचा नि:पात केला व जावळी सोबत याच प्रांतातला रायगड सुद्धा ताब्यात घेतला. हा किल्ला स्वराज्यात आल्यामुळे शिवाजी महाराजांचा खुप फायदा झाला कारण रायगडपासून मुंबई, पुणे व सातारा ही प्रमुख शहरे सारख्याच अंतरावर आहेत, तसेच समुद्र येथून फक्त ४८ मैल असल्यामुळे सिद्दीवर वचक ठेवणे शक्य होणार होते. तसेच किल्ल्याचे भौगोलिक स्थान इतके दुर्गम आहे की सह्याद्रीच्या रांगानी वेढल्यामुळे अगदी जवळ जाईपर्यंत किल्ल्याचे दर्शन होत नाही.

रायगड किल्ल्यावर जाण्यास पुर्वी अनेक मार्ग होते, आजही हे दुर्गम मार्ग अनेक स्थानिकांकडून अथवा गिर्यारोहकांकडून वापरात आणले जातात मात्र आधुनिक काळात सर्वसामान्यांनाही जाण्यास सोपा असा मार्ग म्हणजे महाड मार्गे रायगडास जाणारा गाडीमार्ग, या मार्गे महाडपासून रायगड अदमासे १४ मैल अंतरावर आहे. पुर्वी हा मार्ग कोंझर पर्यंत होता व येथून पायी चालत जावे लागायचे मात्र आता थेट गडाच्या पायथ्यापर्यंत जातो, अबालवृद्धांना हा दुर्गम गड चढण्यास सोपा जावा म्हणुन काही वर्षांपुर्वी येथे रोप वे ची सुवीधा सुरु करण्यात आली आहे ज्याचा लाभ लक्षावधी नागरिकांनी घेतला आहे. गडवाटेवरुन जेव्हा चालत आपण रायगडावर जाण्यास सुरुवात करतो तेव्हा प्रथम लागतो खुबलढा बुरुज येथेच पुर्वि प्रसिद्ध चित दरवाजा होता. येथून पुढे गेल्यावर लागतो नाणे दरवाजा, पुढे काही बुरुज व नंतर महादरवाजा लागतो. येथे पहारेकर्‍याच्या चौक्या व कोठारे आहेत. पालखी दरवाज्यानंतर बालेकिल्ल्यास सुरुवात होते. रायगडावरील महत्त्वाची ठिकाणे म्हणजे शिवरायांची समाधी, जगदिश्वर मंदीर, राजवाडा, सिंहासनाची जागा, बाजारपेठ, टकमक टोक, हिरकणी टोक, भवानी टोक, गंगासागर तलाव, हत्ती तलाव, शिर्काई मंदीर. या किल्ल्याचे बांधकाम वास्तुतज्ञ हिरोजी इंदुलकर यांनि केले त्यांच्या नावाचा शिलालेख जगदिश्वर मंदीराच्या पायरीवर आहे. याशिवाय आणखी एक संस्कृत शिलालेख एका चौथर्‍यावर आहे. किल्ल्यावर एक पोलादी स्तंभ आहे ज्यास संभाजी महाराजांचा मल्लखांब म्हणतात त्यावर सुद्धा एक लेख आढळुन आला आहे. असा हा दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ला रायगड जिल्ह्याचेच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रियांचे एक तिर्थस्थानच आहे.

मुरुड-जंजिरा

रायगड जिल्ह्यात पर्यटनक्षेत्रे जागोजागी विखुरलेली आहेत, मात्र असे असले तरी या पर्यटनस्थळात अव्वल अशी काही ठरावीक पर्यटनस्थळे आहेत आणि त्यापैकीच एक आहे मुरुड्-जंजिरा. पर्यटक जेव्हा केव्हा कोकणात पर्यटनास येतो तेव्हा त्याच्या ज्या प्रमुख अपेक्षा असतात त्या म्हणजे राहण्याची उत्तम सोय, किल्ले, अभयारण्ये, समुद्र (बीच), ऐतिहासिक वास्तू, धबधबे इत्यादी व ही सर्वच आकर्षणे मुरुड जंजिरा परिसरात विस्तृत प्रमाणात असल्याने पर्यटकांच्या सर्व गरजा पुर्ण करणारे हे स्वर्गातित पर्यटनस्थळ रायगड जिल्ह्यातले नंदनवन आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

मुरुड जंजिरा परिसरात जी प्रमुख पर्यटनस्थळे आहेत त्यामध्ये जंजिर्‍याचा समावेश होतो. जंजिर्‍यास अतिशय मजबूत पक्या बांधणीचा तट आहे व १०० फुटाचे अंतर सोडून बांधलेल्या १९ अभेद्य बुरुजांमुळे हा किल्ला आणखी मजबूत झाला आहे. कमानदार अशा या बुरुजांच्या मधून बाहेरच्या दिशेला प्रचंड आकाराच्या तीन तोफा मांडल्या  आहेत यापैकी कलाल बांगडी व लांडा कासाम या तोफा मुख्य आहेत. याशिवाय किल्ल्यात दारुगोळ्याचे कोठार, खजिन्याचे कोठार, पाण्याची दोन तळी, दुमजली ईमला, किल्लेदाराचा वाडा, कोळीवाडा, काही हिंदू शिल्पे व बलुतेदारांच्या वस्त्या पहावयास मिळतात. मुरुड जंजिरा परिसराचे दुसरे प्रमुख आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दीवर वचक ठेवण्याकरीता मुरुड येथे बांधलेला कांसार उर्फ पद्मदुर्ग हा किल्ला. दांडा राजपुरी खाडी ज्या ठिकाणी समुद्रास मिळते तिच्या मुखावरील एका प्रचंड खडकावर हा किल्ला शिवाजी महाराजांनी सन १६६३ साली बांधला. जंजिरा किल्ल्यापासून हा किल्ला  २ मैल अंतरावर असून किल्ल्यास प्रवेशस्वार व काही बुरुज आहेत. किल्ल्यात अनेक तोफा पहावयास मिळतात व आतमध्ये गोड्या पाण्याचा एक तलाव आहे.

याच पद्मदुर्ग किल्ल्यात शिवाजी महाराजांच्या काळात समस्त मुरुडकरांचे श्रद्धास्थान ग्रामदेवता कोटेश्वरी देवीची स्थापना झाली होती, कोटेश्वरी अर्थात कोट (किल्ल्यातली) देवता मात्र कालांतराने पद्मदुर्ग सिद्दीच्या ताब्यात गेल्याने कोटेश्वरी देवीचे स्थान मुरुड गावाच्या वेशीपाशी आले. कोटेश्वरी ही देवी फक्त मुरुडच्याच नव्हे तर राज्यातल्या विवीध ठिकाणच्या ग्रामस्थांची कुलदेवता आहे, सिद्दी नवाबांच्या व त्यांच्या धर्मगुरुंच्या काही कबरी खोकरी या ठिकाणी आहेत. खोकरीचे घुमट म्हणुन या अरबी शैलीच्या वास्तू प्रसिद्ध आहेत. सिद्दी सिरुलखान, सिद्दी खैरियत व सिद्दी याकुतखान यांच्या कबरीसुद्धा याच ठिकाणी आहेत. या शिवाय जंजिरा संस्थानाचे भुतपुर्व नवाब सिद्दी अहमदखान यांनी विक्टोरिया राणीच्या भारत भेटीची आठवण म्हणून गारंबीच्या घनदाट जंगलात धरण बांधून त्यास "विक्टोरिया ज्युबीली वॉटर वर्क्स" हे नाव दिले. नैसर्गिकरित्या पाणी अडवून बांधलेले हे धरण गारंबीचे धरण म्हणुन प्रसिद्ध आहे. शहरास पिण्याचे पाणी याच ठिकाणावरुन पुर्णपणे नैसर्गिक प्रवाहाच्या वेगाचा वापर करुन केले जाते व पर्यटकांचे हे आवडीचे ठिकाण आहे. याशिवाय मुरुड जंजिरा संस्थानाच्या नवाबांनी आपली शिकारीची हौस पुर्ण करण्यासाठी उत्तर भागाकडूल जंगलाचा एक मोठा पट्टा फक्त खाजगी शिकारीकरीता राखिव ठेवला होता ज्याचे कालांतराने फणसाड अभयारण्यात रुपांतर करण्यात आले. मुरुड येथून जंजिर्‍याकडे जाताना एकदरा गाव डोंगर्‍याच्या पुर्वेस वसले आहे. हे एकदरा गाव म्हणजे जंजिरा किल्ला सिद्दीच्या ताब्यात गेल्यानंतर तेथील स्थानिक कोळ्यांनी केलेले वस्तीचे ठिकाण . याच ठिकाणी संभाजी महाराजांनी बांधलेल्या सामराजगडाचे अवशेष पहायला मिळतात. याच डोंगराच्या कपारीमध्ये गायमुख हे स्थान आहे. शहराच्या उत्तरेस दोन जुळ्या टेकड्या आहेत यापैकी एका टेकडीवर मुस्लिम बांधवांचे ईदगाह हे स्थान आहे तर दुसर्‍या टेकडीवर हिंदूं बांधवांचे दत्तमंदीर आहे, या निसर्गरम्य टेकड्यांवरुन मुरुड जंजिर्‍याचा संपुर्ण आसमंत दृष्टीक्षेपात येतो. दत्तमंदिराच्या टेकडीवरुन पुढे गेल्यावर एक पुरातन शिवमंदिर लागते ज्यास क्षेत्रपाल शिवमंदीर म्हणून ओळखतात, शिलाहारांच्या ताम्रपटात उल्लेख असलेले मरुदेश्वर शिवमंदीर कदाचित हेच असावे कारण या मंदिराजवळ असणारी दगडी विहीर फार पुरातन बांधणीची आहे. अलिबागमार्गे मुरुडमध्ये शिरताना डोंगरमाथ्यावरील एका कड्यावर एक भव्य नवाबकालिन राजवाडा आहे, जंजिरा संस्थानाचे नवाब यांच्या निवासाचे हे स्थान. स्वातंत्र्यानंतर नवाबांचे कुटूंब इतरत्र स्थालांतरीत झाले असले तरी हा राजवाडा आजही त्यांची खाजगी मालमत्ता आहे, काही काळापुर्वी पुर्वपरवानगीने वाड्याचे आतून दर्शन घेता येत असे मात्र सध्या ते बंद केले आहे. या राजवाड्यातल्या मुख्य दालनातील नवाबकालीन वस्तू पाहिल्या की जंजिरा संस्थानाच्या नवाबांच्या थाटाची कल्पना येते. याच राजवाड्यात व परिसरात पुर्वी पुराना मंदीर, पुरानी हवेली अशा काही भयपटांचे चित्रीकरण झाल्याने अनेक पर्यटकांचे हा राजवाडा खास आकर्षण आहे. याशिवाय येथील खोरा बंदर हे प्राचिन मुख्य बंदर व दंडाराजपुरी हे सिद्दींच्या वंशजांची वस्ती असलेले गाव इत्यादी पर्यटकांची प्रमुख आकर्षणाची ठिकाणे आहेत. मुरुड जंजिरा परिसर फार पुर्वीपासून प्रख्यात आहे तो येथील विस्तीर्ण, अथांग अशा सिंधूसागरास खेटून असलेल्या स्वच्छ व सुंदर अशा समुद्र किनार्‍यासाठी, पर्यटकांसाठी अतिशय सुरक्षीत असा हा किनारा कुशीत सुरुंच्या बनांच लेण परिधान करुन आहे. या किनार्‍यावरुन चौफेर नजर टाकली असतात विस्तीर्ण अरबी समुद्र, पद्मदुर्ग किल्ला, उजव्या बाजूस नवाबकालीन राजवाडा, डावीकडे दांडा राजपुरी टेकड्या आणि या सर्व  निसर्गदृश्यांची झालर पांघरुन नारळी पोफळींच्या बागांमध्ये लपून गेलेले मुरुड शहर पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडते व किनार्‍यावरील चकचकीत रुपेरी वाळू, जलचरांनी वाळूवर रेखाटलेल्या रांगोळ्या, रंगीबेरंगी शंख-शिंपले व मुरुड समुद्रकिनार्‍यावरील संध्याकाळचा सुर्यास्त अनुभवण्याचे भाग्य असंख्य पर्यटक दर सुट्टीत अनुभवत असतात. अर्थात या सौंदर्याची मजा फक्त वर्णन ऐकुन मिळणारी नाही तर प्रत्यक्ष भेट देऊनच अनुभवता येणारी असल्याने प्रत्येकाने एकदातरी पर्यटकांचे नंदनवन मुरुड जंजिर्‍यास भेट द्यावी, नक्कीच आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल.

माथेरान

निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न म्हणुन माथेरानचे वर्णन करावे लागेल. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून विलग झालेला एक डोंगर आहे, या डोंगरावरील घनदाट वनराईमुळे वर्षभर येथे थंड हवा असते. ब्रिटीशांची सत्ता भारतावर असताना भारतातील उष्ण हवा त्यांना मानवत नसे व त्यांना अशा थंड ठिकाणांची गरज असायची. सन १८५० मध्ये ठाण्याचा कलेक्टर मॅलेट याने माथेरानला भेट देऊन त्याचा थंड हवेचे ठिकाण म्हणुन विकास केला. १८५३ साली माथेरान येथे ब्रिटीशांनी व धनिकांनी खाजगी निवासस्थाने बांधली व माथेरानला वर्दळ सुरु झाली. इ. स. १९०५ मध्यें येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. माथेरान येथे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत मात्र पर्यटकांचा अतिशय आवड्ता मार्ग म्हणजे नेरळ्-माथेरान रेल्वे मार्ग, याची निर्मिती सन १९०७ मध्ये आदमजी पिरभाय यांच्या संकल्पनेतून झाली, आजही हि माथेरानची राणि अतिशय दिमाखात शेकडो प्रवाशांना घेऊन माथेरान चढते व उतरते. लाल माती व दाट गर्दराईने वेढलेल्या माथेरानात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत यामध्ये पोईंटस व तलावांचा समावेश होतो. माथेरान येथे पॅनोरमा पोईंट, गार्बट पॉईंट, दस्तुरी, माऊंट बेरी, गव्हर्नर हिल, सिमसन लेक, हार्ट मैदान, हार्ट पॉईंट, तुकाराम्-सखाराम पॉईंट, मंकी पाँईंट, पॉनसॉनबी स्प्रींग, मॅलेट स्प्रींग, अबर पाँईट, पॉर्क्युपाईन, लुईसा पॉईंट, लमली सिट, शारलोट लेक, पिसारनाथ मंदीर, वेल्वेडेअर पॉईंट, मार्जोरी नुक, वन ट्री हिल, मोठा चौक व छोटा चौक पाँईंट, रामबाग पॉईंट, अलेक्जांडर पॉईंट, कापडिया बाजार, माधवजी पॉईंट, सायरा पॉईंट, बिट्राईट्स क्लिक, पेमास्टर वेल, आर्टिस्ट पॉईंट, बर्ड्वुड पोईंट, शिवमंदीर, राम मंदीर, मारुती मंदीर, मशिद, सेंट पॉल चर्च, रोमन कॅथोलिक चर्च, पॅन्थर केव्ह, ऑलिंपिया, पेमास्टर पार्क, फर्दुनजी पंड्या ग्राऊंड, नवरोजी लॉर्ड गार्डन, बि.जे. मेडिकल हॉस्पिटल, युरोपियन जिमखाना, माथेरान क्लब, पारशि जिमखाना, वाचनालय व मढ फॉरेस्ट इत्यादी स्थळांचा समावेश आहे. हे सर्व पॉईंट्स पहाण्यासाठी संपुर्ण दिवस लागतो व घोड्यांवरुन सफारी करुन तुम्ही हे पॉईंट्स पाहू शकता मात्र घनदाट जंगलामुळे वानरांचे प्रमाण येथे अधिक आहे व काहीवेळा यांचा उपद्रव पर्यटकांस होतो. माथेरानच्या सभोंवार दाट अरण्य असल्यामुळें याचा एकंदर देखावा फारच मनोहर दिसतो.

श्रीवर्धन - दिवेआगर

निसर्गसंपन्नेतेने व ऐतिहासिक वारश्याने नटलेली ही दोन जुळी गावे एकाच तालुक्यात असून रायगड जिल्ह्याच्या दक्षीण्-पश्चिमेस आहेत. कालौघात अनेक गावांची प्राचिन नामे बदलली मात्र आजतागायत प्राचिन नाव मिरवणारे श्रीवर्धन हे एकमेव गाव असावे. श्रीवर्धन हे श्री व वर्धन या दोन शब्दांच्या संलग्नतेतून निर्माण झाले असावे. श्रीफळाच्या अर्थात नारळाच्या विपुल बागा या गावात असल्यामुळे या गावास हे समर्पक नाव मिळाले आहे. असेही म्हटले जाते की गावात उत्तरेस असलेल्या डोंगरावरुन न्याहळले असता खाली गावाचा आकार 'श्री' असा दिसतो म्हणुन गावास हे नाव मिळाले असावे मात्र हे जुन्या काळी शक्य असेल कारण आधुनिक काळात गावांचा विस्तार झाला त्यामुळे आता हा आकार दिसत नसावा. श्रीवर्धनास अर्जुनाने सुद्धा भेट दिली होती असे म्हटले जाते, युर्पोयन प्रवाशांनी या गावाचा 'जिफरदन' असा उल्लेख केला आहे यावरुन प्राचिन काळापासून हे गाव व्यापाराचे प्रमुख स्थळ होते हे निसंशय सिद्ध होते. प्राचिन महत्त्व असलेल्या या गावात अनेक पुरातन मंदीरे आहेत यामध्ये लक्ष्मी-नारायण, काळभैरव, गावदेवी सोमजाई, जिवनेश्वर शिवमंदीर, श्रीराम मंदीर इत्यादींचा समावेश आहे. जिवनेश्वर मंदीर हे हेमाडपंथी धाटणीचे आहे. श्रीवर्धन हे गाव पेशव्यांचे मुळ गाव बाळाजी विश्वनाथ यांच्या पुर्वजांकडे या गावाचे कुळकर्णीपद होते मात्र सिद्दीच्या त्रासाला कंटाळून त्यांनि हे गाव सोडले व देशावर गेले मात्र त्यांचे पुत्र बाजिराव जेव्हा पुण्यास आले तेव्हा त्यांनी श्रीवर्धनाच्या ग्रामरचने प्रमाणेच जुन्या पुण्याची रचना केली कारण पुण्याप्रमाणेच श्रीवर्धन येथेही कसबा व इतर पेठा असून जुन्या पुण्याची नगररचना व श्रिवर्धनची नगररचना यात विलक्षण साम्य आहे. ज्या ठिकाणी पेशव्यांचे जुने घर होते तिथे आता फक्त चौथरा असून तेथे बाळाजी विश्वनाथांचे स्मारक नगरपालिकेने बांधले आहे व सध्या येथे बालवाडी, व्यायामशाळा व टेबल टेनिस कोर्ट आहे. श्रीवर्धन मध्ये नारळी-पोफळीच्या अनेक पाखाड्या आहेत, आजही या गावाने आपली मुळ रचना व संस्कृती जोपासली असून या गावास तितकाच सुंदर असा समुद्र किनारा लाभला आहे. श्रीवर्धनची ग्रामदेवता म्हणजे सोमजाई देवी, नवसाला पावणारी अशी समस्त पंचक्रोशीतल्या भाविकांची श्रद्धा असून  हरिहरेश्वराचे दर्शन घेतल्यावर या देवीचे दर्शन घेण्याची जुनी प्रथा आहे. या देवीची स्थापना अगस्ती ऋषींनी केली असल्याचे म्हटले जाते, व नवरात्रात येथे मोठा उत्सव भरतो.

श्रीवर्धनपासून हाकेच्याच अंतरावर दिवेआगर हे निसर्गसंपन्न व समुद्राच्या काठी वसलेले सुरेख गाव आहे, येथील किनारा स्वच्छ व सुरक्षीत असल्याकारणाने येथे पर्यटकांची कायम मांदियाळी असते व अनेक स्थानिक घरगुती राहण्याची व जेवणाची सुवीधा पुरवतात. किनार्‍या शिवाय हे गाव सुवर्ण गणेशाचे गाव म्हणुन प्रसिद्ध होते. प्राचिन काळी शिलाहार यांच्या राजवटीत आरसपानी अशा सुवर्णगणेशाची निर्मिती येथे करण्यात आली होती, मुळात ही मुळ मुर्ती नसून उत्सवमुर्ती किंवा उत्सवाच्या वेळी मुळ मुर्तीस लावण्याचा मुखवटा असावा मात्र कालांतराने समुद्री चाचे व परकिय सत्ताम्चे परिसरात समुद्रमार्गाने हल्ले होत असत त्यांच्यापासून रक्षण व्हावे म्हणून सुवर्ण गणेशाची मूर्ती जमिनीखाली पुरून ठेवली गेली मात्र दरम्यान १९९७ साली बरोबर संकष्टी चतुर्थीच्या शुभदिनी श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या नारळसुपारीच्या बागेत खोदकाम करताना ही मूर्ती आढळली त्यांनि ही मुर्ती व तिच्या सोबत मिळालेली पेटी व रत्ने शासनाच्या हवालि केली व याच गावात एक मंदिर बांधण्यात आले. या मंदीरामुळे दिवेआगरचा जणू कायापालट झाला व पर्यटकांची व भाविकांची गर्दी वाढू लागली मात्र दुर्दैवाने काही वर्षांपुर्वी ही मुर्ती चोरीस गेल्यामुळे भाविकांच्या व नागरिकांच्या दु:खास पारावार राहिला नाही. प्राचिन काळी उत्तर कोकणाची सांस्कृतीक राजधानी असलेल्या या गावात एकूण आठ मंदीरे व एक मशिद आहे याशिवाय येथे एकुण पाच ताम्रपट व शिलालेख मिळाल्याने गावाच्या प्राचिन वैभवाची कल्पना येते हे ताम्रपट व शिलालेख प्रामुख्याने चालुक्य व शिलाहार कालीन आहेत. खर्‍या अर्थी श्रीवर्धन व दिवेआगर ही दोनही गावे रायगडचा सांस्कृतीक ठेवा आहेत.