झिटकु मिटकी - बस्तरची अमर प्रेमकहाणी

कोणे एके काळी बस्तर प्रदेशात मिटकी नावाची एक मुलगी रहात होती. सात भावांची ती लाडकी बहिण. हे सगळेजण एकत्र राहायचे. तेव्हा दुसऱ्या एका गावात झिटकू नावाचा एक तरुण कोका सारखे वाद्य वाजवत गावोगावी हिंडायचा.

झिटकु मिटकी - बस्तरची अमर प्रेमकहाणी
झिटकु मिटकी

छत्तीसगडचा बस्तर प्रदेश हा जितका निसर्गाने समृद्ध आहे, तितकाच तो आदिवासी संस्कृती, त्यांच्या रूढी-परंपरा, त्यांच्या विविध देवतांनीसुद्धा बहरलेला आहे. अनेक लोककथा या प्रदेशी आपल्याला ऐकायला मिळतात. आपल्या देशात विविध प्रांतात अनेक प्रेमकथा प्रसिद्ध आहेत. त्यातल्या काही राजांच्या, काही सरदारांच्या तर काही सामान्य जनांच्या असतात. बस्तर या निसर्गरम्य प्रदेशात अशीच एक अमर प्रेमकथा रुजलेली आहे. ती आहे झिटकु आणि मिटकी या निरागस प्रेमींची. त्यांच्या प्रेमाची आणि त्यांच्या बलिदानाचीसुद्धा. त्यांची प्रेमकथा आता अमर झाली आहे. बस्तरच्या जनतेने त्यांना आता देवत्व बहाल केले आहे.

कोणे एके काळी बस्तर प्रदेशात मिटकी नावाची एक मुलगी रहात होती. सात भावांची ती लाडकी बहिण. हे सगळेजण एकत्र राहायचे. तेव्हा दुसऱ्या एका गावात झिटकू नावाचा एक तरुण कोका सारखे वाद्य वाजवत गावोगावी हिंडायचा. लोकांचे मनोरंजन करायचा आणि त्यावर आपली गुजराण करायचा. असाच तो एकदा मिटकीच्या गावात आला असताना दोघांनी एकमेकांना बघितले आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मिटकीच्या भावांना अर्थातच हे पसंत नव्हते. पण बहिणीचा आग्रह त्यांना मोडवेना. त्यांनी या दोघांच्या लग्नाला परवानगी दिली पण झिटकूला त्यांच्याच सोबत घरजावई म्हणून रहायला सांगितले. झिटकू तयार झाला आणि झिटकु-मिटकीचा संसार सुरु झाला.

काही वर्षांनी गावात दुष्काळ पडला. गावच्या तलावातले पाणी आटले. लोक गावच्या मांत्रिकाकडे गेले. मांत्रिकाने सांगितले की नरबळी दिला तरच पाऊस पडेल. गावकऱ्यांना प्रश्न पडला की कुणाचा बळी द्यायचा. मिटकीच्या भावांच्या मनात पाप आले. ते मिटकीला काहीच न सांगता झिटकूला घेऊन तळ्याकाठी गेले. आणि तिथे त्याचा बळी दिला. धो धो पाऊस सुरु झाला. तळे सगळे भरून गेले. इकडे मिटकी झिटकूची वाट बघत होती. तो शेतात गेला असेल असे समजून शेताकडे गेली. तळ्याकाठी गेल्यावर तिला झिटकूचे डोके दिसले. तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तिने सरळ आपला देह त्या ओसंडून वाहणाऱ्या तळ्यात झोकून दिला. त्यानंतर गावात कधीही दुष्काळ पडला नाही. तलावाचे पाणी कधीही आटले नाही. झिटकु-मिटकी दोघांनी गावासाठी सहगमन केले.

गावकऱ्यांना हे समजल्यावर ते अतिशय दुःखी झाले. पण आता उपयोग काहीच नव्हता. गावचा दुष्काळ संपवायला दोन प्रेमी जीवांचा बळी गेला होता. गावकऱ्यांनी त्या दोघांना देवत्व दिले. त्यांना "गप्पादेई–लक्कादेई’ किंवा 'डोकरा -डोकरी' अशी नावं दिली गेली. मिटकीला सतीदेवी म्हणूनही पूजले जाते. झिटकु-मिटकीची कथा सगळ्या बस्तरमध्ये ऐकायला मिळते. दरवर्षी '१४ फेब्रुवारीला' बस्तरमध्ये झिटकु-मिटकीच्या स्मरणार्थ जत्रा भरते. या दोघांची प्रेम कहाणी आणि त्यांचे बलिदान या दिवशी आठवले जाते. योगायोग बघा हा दिवससुद्धा कुठला निवडला गेलाय !

बस्तरच्या कलेतही त्याची प्रतिबिंब दिसते. कादंबरीकार, चित्रकार, शिल्पकारांनी आपल्या कलेतून झिटकु-मिटकीचे सादरीकरण केलेले दिसते. हे अमर झालेले प्रेमी जीव आजही आपल्याला बस्तरच्या कलेतून भेटत राहतात. कोका सारखे वाद्य वाजवणारा झिटकू आणि हातात बांबूची टोपली घेतलेली मिटकी या आदिवासी कलेतून शिल्पांकित केलेले असतात. कोंडागाव इथे तर झिटकु-मिटकी या नावानेच आदिवासी कलाकेंद्र राजेंद्र बघेल या कलाकाराने स्थापन केले आहे.

अजरामर झालेली ही प्रेमकहाणी बस्तरमध्ये आजही सगळीकडे ऐकायला मिळते. त्यांना देवत्व प्राप्त झालेले असले तरी त्यांचे बलिदान हे चटका लावून जाते.

- आशुतोष बापट