सुधागड - राजधानीच्या अंतिम यादीत समावेश असलेला किल्ला
महाराष्ट्राच्या दुर्गश्रुंखलेतील एक वैशिट्यपूर्ण गड म्हणजे सुधागड. सुधागड हा किल्ला रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यात आहे.

महाराष्ट्र हे दुर्गांचे राज्य आहे. दुर्गांची बांधणी गेली अनेक शतके होत असली तरी तिला मुख्य स्थान मिळाले शिवाजी महाराजांच्या काळात. शिवाजी महाराजांनी दुर्गांच्या साहाय्याने राज्य निर्माण केले यासाठी दुर्ग हा स्वराज्याच्या राज्यव्यवस्थेचा कणाच होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
शिवपुण्यतिथी निमित्ताने मराठी बझ टीम महाराजांना मानवंदना देण्यास सुधागड किल्ला चढत होती. महाराजांचे चरणस्पर्श लाभलेले किल्ले पाहणे म्हणजे महाराजांचेच दर्शन घेण्याचे भाग्य लाभल्यासारखे असते.
महाराष्ट्राच्या दुर्गश्रुंखलेतील एक वैशिट्यपूर्ण गड म्हणजे सुधागड. सुधागड हा किल्ला रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यात आहे. सुधागड तालुक्याचे नावच किंबहुना सुधागडावरून पडले आहे.
सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण म्हणजे पाली. पालीस पूर्वी मामलेदार कचेरी होती आणि मुस्लिम काळात तिचा उल्लेख मामले अमीनाबाद असा होत असे. पाली गावातच एक सर्वांगसुंदर किल्ला आहे ज्याचे नाव सरसगड. पगडीच्या आकाराचा असल्याने यास पगडीचा किल्ला अथवा सारसगड असेही म्हटले जाते मात्र अनेकदा सरसगड आणि सुधागड या दोन किल्ल्यांत गल्लत केली जाते. अनेक जण अज्ञातपणे सरसगडालाच सुधागड या नावाने उच्चरतात. एकाच तालुक्यात असले तरीही खरं तर दोन्ही किल्यांचे स्थान व आकार यामध्ये खूप फरक आहे.
सरसगड हा किल्ला पाली या गावातच असून सुधागड हा किल्ला पाळीच्या पूर्वेस सह्याद्रीच्या मूळ धारेपासून विलग झालेल्या एका डोंगरावर आहे. किल्ल्याच्या पूर्वेस पुणे जिल्हा आहे.
जुन्या साधनांत सुधागडासंबंधी पुढील उल्लेख सापडतो.
'साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.'
शिवाजी महाराजांनी सुधागड हा किल्ला सन १६४८ साली स्वराज्यात आणला. या किल्यास भोरपगड असे नाव होते, शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे सुधागड असे नामांतर केले. सुधागडाची उंची समुद्रसपाटीपासून अदमासे ६०० मीटर एवढी आहे.
विस्ताराच्या बाबतीतही सुधागड सरस आहे. गडाचा विस्तार हा ४०० हेक्टर किंवा त्याहून अधिक असावा. सुधागडावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत यापैकी एक म्हणजे धोंडसे मार्गे जाणारा मुख्य मार्ग तर दुसरा म्हणजे गडाच्या मागून जाणारा पाच्छापूर गावातील मार्ग. दोनही मार्गावरून पर्यटक हा किल्ला पाहण्यास येत असतात मात्र धोंडसे गावाहून गडाच्या पायथ्यापर्यंत चाल थोडी अधिक आहे किंबहुना पाच्छापूर येथील ठाकूरवाडी ही गडाच्या पायथ्याशीच असल्याने वेळ वाचवण्यासाठी अनेकजण या मार्गाने किल्ल्यावर जाणे पसंद करतात.
पाच्छापूरची वाट पूर्वी सोपी नव्हती. दोन ठिकाणी असलेले उभे व कठीण चढ म्हणजे जणू या मार्गावरून येणाऱ्या पर्यटकांसाठी परीक्षेसारखेच असत. आता या ठिकाणी मजबूत व लोखंडी शिड्या बसवल्याने हा मार्ग खूप सोपा झाला आहे. धोंडसे गावाहून येणारा मार्ग सुद्धा अतिशय सुरेख असा आहे मात्र गावापासून पायथ्याशी पोहोचण्यास थोडा वेळ लागत असल्याने अनेक जण पाच्छापूरची वाट धरतात. पाच्छापूरच्या दक्षिणेकडे असलेल्या ठाकूरवाडी गावापर्यंत आता डांबरी मार्ग झाला आहे. येथे आलो की डाव्या बाजूस बलदंड असा सुधागड आपल्या स्वागतासाठी उभा असलेला दिसतो. ठाकूरवाडीतून सुधागडाच्या माथ्यावर पोहोचण्यास अदमासे दीड ते दोन तास लागू शकतात. या मार्गावर पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे पहिल्या पाडावावर जंगलात असलेल्या काही समाध्या आणि पाच्छापूर दरवाजा.
पाच्छापूर दरवाजा पार केला की आणखी पंधरा वीस मिनिटात आपण मागील बाजूने सुधागडाच्या माथ्यावर दाखल होतो. सुधागडची उंची ६२० मीटर आहे आणि लोणावळ्याची ६२४ मीटर त्यामुळे सुधागडावरील हवा ही लोणावळ्याएवढीच थंड व सुखकर आहे. किल्ल्याचा घेर प्रचंड आहे. नवखा पर्यटक असल्यास कुठल्या दिशेने जायचे समजून येऊ शकत नाही. काही दुर्गसंवर्धक संस्थांनी किल्यावर दिशाफलक लावल्याने नवख्या पर्यटकांस खूपच मदत झाली आहे. पाच्छापूर मार्गे माथ्यावर आल्यास काही अंतर सरळ चालत गेल्यास उजव्या बाजूला सदाहरित वनराई आहे या वनराईच्या गर्भात पंतसचिवाचा चौसेपी वाडा आहे. या वाड्यातच राहण्याची सोय होऊ शकते. पिण्याच्या पाण्याची सोय येथील काही टाक्यांमध्ये होऊ शकते. सुधागडावर दोन तलाव आहेत. खोदीव आणि बांधीव यातील खोदीव तलाव उन्हाळ्यात सुकून जातो. बांधीव तलावात उन्हाळ्यातही पाणी असते.
राजवाड्याच्या बाजूलाच महादेवाचे मंदिर आहे. वाड्याच्या मागील बाजूस एक विहीरही आहे मात्र आता ती नादुरुस्त झाली आहे, हिची खोली पाहून डोळे गरगरल्याशिवाय राहत नाहीत. वाड्यापासून एक उत्तम असा पाषाणी मार्ग सुरु होतो ज्यास राजमार्ग असे नाव देता येईल, तो थेट भोराई देवीच्या मंदिरापर्यंत जातो. मंदिराच्या डाव्या बाजूस गजलक्ष्मी शिल्प आहे. भोराई देवीचे मंदिरही अतिशय जागृत व प्रेक्षणीय. नवरात्रात येथे मोठा उत्सव भरतो. मंदिराच्या प्रांगणात असंख्य वीरगळी व सतीशिळा आहेत आणि उजव्या बाजूच्या मैदानात असंख्य समाध्या सुद्धा. हा काळ पूर्वी नांदता असावा याचे हे पुरावे आणि येथे झालेल्या युद्धांचे अंदाज सुद्धा या वीरगळी व सतीशिळा पाहून येतॊ. असंख्य अज्ञात तालेवार येथे चिरविश्रांती घेत आहेत.
मंदिराच्या उजव्या दिशेने एक रस्ता दाट वनराईतून खाली जातो तेथे गेल्यास सुधागडाचा महादरवाजा दिसून येतो. हा दरवाजा गोमुखी पद्धतीचा आहे. येथून जाणारी वाट धोंडसे गावात उतरते. अलीकडेच एक चोरवाट सुद्धा आहे. सुधागडास तटबंदी सुद्धा उत्तम आहे. गडावर कारखान्याच्या व शिबंदीच्या इमारती तर असंख्य आहेत. दक्षिणेस डाव्या बाजूस रायगडाच्या टकमक टोकासारखेच एक टकमक टोकही आहे. एकंदरीत किल्ला पाहून खात्री पटते की हा किल्ला राजधानीच्या यादीत का घेतला असावा. सुधागडास रायगड किल्याचीच एक प्रतिकृती म्हणले तरी चुकीचे ठरणार नाही.
तीनही ऋतूंमध्ये पाहणीय असणारा सुधागड उर्फ भोरपगड हा किल्ला नक्की पहा. तुम्ही किल्याच्या प्रेमात पडाल हे नक्की.