गडदूदेवी आणि वेळ नदीचा उगम

नवरात्र संपलं दसरा उजाडला... घरात अडकून पडलेल्या मंडळींना सीमोल्लंघनाचे वेध लागले. जागतिक संकट हळूहळू निवळू लागलेलं...अशा वेळी वेगळ्याठिकाणी भेट द्यायला हवी..... सवंगडी जमले आणि भटकंतीला बाहेर पडले....खेड आणि आंबेगाव तालुका इतका जवळ असूनही बघायचा राहिला होता.

गडदूदेवी आणि वेळ नदीचा उगम

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

अगदी अनवट ठिकाणं फिरायची होती. राजगुरुनगरला गेली ४०० वर्षे उभी असलेली वास्तू म्हणजे दिलावरखानाचा घुमट. दिलावरखान हा जहांगीरचा सेनापती. त्याची आणि त्याच्या भावाची कबर राजगुरुनगरला आहे. प्रवेशद्वारावर त्रिकोणी भागात फारसी लेख आहे. “रहमतके हक शुदबर खजा दिलावरखाना....वगैरे वगैरे....” शिलालेखात कालोल्लेख हिजरी १०२२ म्हणजे इ.स. १६१३ असा आहे. वास्तूभोवती कोट असून त्यात अनेक चिंचेची झाडे आहेत. तिथून पुढे वाडा रोडला एल आय सी ऑफिससमोर मिसळ..कटवडा… एकदम भार्री चव....त्यासोबत पापड आणि जिलबीपण...फुकट !!.. मग पुढे चासकमान धरणाच्या बाजूने वाडा गाव येते. इथून उजवीकडे डोंगरावर रस्ता जातो. डोंगरावर आहे एका मोठ्या खडकाच्या कपारीत वसली आहे गडदूदेवी. वाडेदरा असे परिसराचे नाव....गडद म्हणजे कपार...जसा गडदचा बहिरी तशी ही गडदूदेवी. कपारीत देवीचे दोन तांदळे..समोर वाघाची मूर्ति...बाजूला फरसबंदी केलेली...पाऊस नुकताच संपल्यामुळे डोंगरावरून पाणी वाहत होतं... इथून आजूबाजूचा परिसर मोठा रमणीय दिसतो.

इथून पुढे घोडेगावच्या दिशेला जाताना नवीनच बांधलेलं सरस्वतीचे मंदिर दिसतं. सरस्वती देवीचं देऊळ बांधणं म्हणजे आश्चर्यच. दाक्षिणात्य पद्धतीने बांधलेलं हे मंदिर. इथून पुढे साल सिद्धेश्वर हे शंकराचं पुरातन मंदिर. आता जीर्णोद्धार झाला असला तरी मूळ गाभारा जुनाच. मंदिराच्या बाहेर बरेच वीरगळ शेंदूर फासून लावून ठेवलेले. त्यांना देवाचे वाजंत्री म्हणतात असं पुजारी म्हणाला....लोकांच्या समजुतींना अंत नाही !!!

वाटेत लहान-मोठी विविध शिवालये...हरिश्चंद्रेश्वराचे जुने तर काहींचा जीर्णोद्धार झालेला....पुढे गेल्यावर अजून एका डोंगरावर एक मंदिर दिसते. ते आहे वेळेश्वराचे. वेळ नदीचा उगम आहे हा. डोंगर चढून गेल्यावर मंदिर...त्याच्या बाजूलाच एक विहीर...हाच वेळ नदीचा उगम. इथून नदी गुप्त होते आणि डोंगराखाली एकदम प्रकट होऊन वाहू लागते. ही पेठ गावाशी पुणे-नाशिक रस्ता ओलांडून पुढे वाफगाव मार्गे प्रवाहित होऊन शिक्रापूरजवळ भीमेला मिळते. छोटेसेच आयुष्य पण आजूबाजूचा परिसर मोठा समृद्ध केलेला आहे. सर्वत्र भात, पावटा, मेथी, बटाट्याची शेती...पेप्सी कंपनी इथला सगळा बटाटा उचलते. वेळेश्वर मंदिराच्या खालच्या अंगाला डोंगरात अजून एक गुहा...भिंतीने बांधून बंदिस्त केलेली....दत्ताची आणि शंकराची मूर्ति ठेवलेली...सगळाच परिसर अत्यंत शांत आणि रमणीय.

परत येताना राजगुरूनगरच्या शेजारीच तुकाईदेवी मंदिराने दर्शन दिले...खूप खांब असलेले प्राचीन मंदिर....पुण्याहून अगदीच जवळ...कुणीही पर्यटक नाही गोंगाट नाही...शांत रमणीय ठिकाणे....नदीच्या उगमस्थानी असावी अशी नीरव शांतता आणि पावित्र्य. रानजाई, भारंगी, झिनिया अशी विविध रानफुले फुललेली....खेड आंबेगाव तालुक्याच्या पश्चिमेकडचा हा भाग...शेतीभातीने समृद्ध.....भीमाशंकरकडे जाणारे रस्ते.....ती ओढ पण वेगळीच....सीमोल्लंघन तर जोरदार झाले. आता ओढ विविध मोहिमांची.....देवाक काळजी !!!!